संपादकीय

जागा एक, इच्छुक अनेक!

राज्यातील बहुप्रतीक्षित विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. मात्र, नाशिकच्या जागेवरून आता महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. भाजपने शिंदेसेनेने जिंकलेल्या नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे. परिणामी यावरून युतीत मिठाचा खडा पडला आहे. 2018 मध्ये शिवसेनेने स्वबळावर लढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा खेचून आणली. त्यामुळे भाजपने काहीही म्हणो, आम्ही लढणारच, असा पणच शिंदेसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केलेला दिसतोय.
शिंदेसेनेकडून लढण्यासाठी माजी आमदार नरेंद्र दराडे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, नांदगाव तालुक्याचे आमदार तथा लोकसभा संपर्कप्रमुख सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांची नावे पुढे येत आहेत. भाजपकडून माजी स्थायी सभापती गणेश गिते यांचे नाव आघाडीवर आहे. नीलेश बोरादेखील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. ओबीसी आरक्षणामुळे महापालिका व नगरपालिका निवडणूक लांबल्यामुळे विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून संबोधल्या जाणार्‍या विधान परिषदच्या निवडणुकांना फुल स्टॉप लागला होता. मात्र, राज्यातील नगरपालिका व तद्नंतर महापालिका निवडणुका पार पडताच विधान परिषदेची वाट मोकळी झाली. उमेदवारी देताना विशेषतः शिंदेसेनेत नाट्यमय घडामोडी पहायला मिळू शकतात. एकाच कुटुंबात दोन पदे नको, या मागणीने शिंदेसेनेत जोर धरला आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्ष नेतृत्वाचा कस लागणार आहे. याशिवाय शिंदेसेनेत अचानक इच्छुक वाढल्याने दराडे यांची अस्वस्थता वाढली असणार! गेल्या वेळी ते निवडून आले असले तरी यंदा त्यांच्यासमोर स्वपक्षातच आव्हान आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने महायुतीतील भाजप व शिंदेसेनेत हालचालींना वेग आला आहे. भाजपने नाशिकच्या जागेवर दावा करत शिंदेसेनेवर लोकसभेप्रमाणे दबावाचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, नाशिकची जागा गतवेळी शिवसेनेने जिंकली असल्यामुळे ती आम्हीच लढवणार, असा पवित्रा शिंदेसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. नाशिक विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदेसेनेत कमालीची चुरस आहे. परिणामी उमेदवारी मिळविण्यासाठी गेल्यावेळी विजयी झालेले माजी आमदार नरेंद्र दराडे यांची वाट यामुळे अवघड होताना दिसत आहे. पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात असल्याने चौधरी यांना संधी मिळावी याकरिता त्यांचे समर्थक आग्रही आहे. जिल्हाप्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते यांचीदेखील उमेदवारीसाठी अपेक्षा आहे. नाशिकमध्ये पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. नांदगाव तालुक्याचे आमदार तथा लोकसभा संपर्कप्रमुख सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या नावाची पक्षात चर्चा सुरू आहे. मनमाड, नांदगाव नगरपालिकेत कांदे यांचा एकतर्फी अंमल आहे. यांसह नाशिकमधील काही नगरसेवक कांदे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कांदे विधान परिषदेची उमेदवारी घेण्यासाठी मागे हटणार नाहीत, हे निश्चित. उमेदवारी मिळविण्यासाठी संबंधित नेते वजन वापरत आहेत. विधान परिषद निवडणुकीत चांगल्या-चांगल्याची गणिते चुकतात. त्यामुळे उमेदवारी देताना पक्ष सर्वच बाजूंनी विचार करणार आहे. विधान परिषद निवडणुकीत एकूण 623 मतदार असून, यात सर्वाधिक भाजपकडे 190 एवढी संख्या आहे. त्याखालोखाल शिंदेसेनेकडे 170, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडे 107 मतदार आहेत. उद्धवसेनेकडे 45, काँग्रेस 13, मालेगावच्या इस्लाम पार्टीकडे 35, एमआयएम 21 अपक्ष 16, व इतर 41 असे मतदार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी (अ. प.) पक्ष निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावेल. भाजप व शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यास अशावेळी राष्ट्रवादी ’किंगमेकर’च्या भूमिकेत असणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ज्या पक्षासोबत जातील त्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय सुकर होईल. विधानसभा निवडणुकीनंतर भुईसपाट झालेल्या महाविकास आघाडी या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण या आघाडीकडे पुरेसे संख्याबळच नसल्याने मविआतील नेते संभ्रमावस्थेत आहेत. शिंदेसेनेकडून मागील काही दिवसांत पक्षसंघटन बळकट करण्याच्या दृष्टीने एक- दोन महिन्यांच्या कालावधीत पक्ष मेळावे घेतले. शिंदेसेनेने जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात मेळावे घेतले तरी यामागे विधान परिषद निवडणुकीची रणनीती आहे. नाशिकच्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थित घेण्यात आला. हा कार्यक्रम होत नाही तोच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील इगतपुरी, चांदवड, नांदगाव येथे जाऊन बैठका घेतल्या. म्हणूनच या बैठका केवळ जिल्हा परिषदेसाठी नव्हे, तर विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने सुरू केलेली तयारी आहे.
भाजपचे लक्ष नाशिकच्या जागेवर असल्याने युतीत तणतण सुरू झाली आहे. परिणामी नाशिकची जागा अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. या जागेसाठी महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट (शिवसेना) यांच्यात तीव्र रस्सीखेच आणि चुरस निर्माण झाली आहे. नाशिकसह राज्यातील 17 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून, 22 जूनला लगेचच निकाल जाहीर होणार आहे. नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी भाजप पदाधिकार्‍यांची मागणी आहे, तर शिंदे गटानेही या जागेवर दावा सांगत स्वतःचा उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत सिंहस्थ कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पडद्यामागे हलचाली सुरू केल्या आहेत. महाजन ठरवतील तोच निर्णय पक्षाकडून दिला जाणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत. निवडणूक जाहीर होताच इच्छुकांची संख्या वाढली असून, भाजपमध्ये जुन्या आणि नव्या चेहर्‍यांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस आहे. या निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर महाविकास आघाडीतही जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे संकेत आहेत. नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी महायुती कोणता ’फॉर्म्युला’ ठरवणार आणि ही जागा कोणाच्या वाट्याला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे.
नाशिकची जागा भाजपला आणि जळगावची शिंदेसेनेला हा फॉर्म्युला मात्र नाशिकच्या सेनेला मान्य नाही. आमच्या हातातली सीट सोडणार नाही आणि कुणाला देणार नाही असा पवित्रा घेतल्याने यंदा नाशिक विधान परिषद निवडणूक चांगलीच गाजणार यात काही संशय नाही.

One place, many applicants!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago