– प्रणाली देशमुख
चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. गॅलरीत झुल्यात झुलत झुलत चहा संपवला. मनात कसलाच विचार नव्हता, फक्त पावसाचे थेंब मोजण्याचा अट्टाहास सुरू होता; जे शक्य नाही, नेमकं तेच करायचं असतं. जरा तंद्री लागलेली, इतक्यात आवाज आला, आई, भूक लागली, काहीतरी वेगळं दे खायला! ’वेगळं’ हा शब्द रोजचाच असला तरी रोज एक नवीन फील किलकिल करून जातो. मधल्या वेळेत तूप-साखर पोळी, साखरआंबा पोळी, दूधपोहे वगैरे जणू प्रागैतिहासिक काळातील पदार्थ असल्यासारखे हावभाव दाखवल्याने ती यादी वाचणेच मूर्खपणाचे लक्षण ठरते. शिवाय, आपल्या आईचे नॉलेज फारच कमकुवत आहे, असे सारखे पिल्ल्याला वाटत राहते.
काहीतरी चटकमटक मंचुरियन, पिझ्झा, नूडल्स असलं काहीतरी त्याला अपेक्षित असते. दुपारी ओटा, गॅस सगळं आवरलेलं असताना परत बाजार भरवायची इच्छा नसतानाही उसनं अवसान आणून चिरावे, करावे, तळावे आणि झाले की आवरावे, इतकेच उरते. शेवटी लेकराला नाही म्हणवत नाही. आई गनिमी काव्यात माहीरच असते! मग काय, पोळीवर जरा सॉस, भाज्यांचे स्लाइस आणि खूप सारी चीज किसून पोळीचा पिझ्झा केला की लेकरू पण खुश! इकडे आईपणाची ऐन वेळी परीक्षा घेत कामगिरी फत्ते केल्याचे समाधान मानत, तुझ्या आवडीचं करून दिलंय, आता रात्री मात्र मी जेजे बनवीन ते पानातलं सगळं जेवावं लागेल, या लेकाच्या होकारावर विश्वास ठेवून मनाला आत्मिक शांती लाभत असते.
आमच्या लहानपणी जून-जुलैमध्ये पावसाची सुरुवात आणि मस्त कैरीच्या लोणच्याची बरणी भरलेली असायची. जेव्हा मुरेल तेव्हा मुरेल, पण साध्या मीठ-हळदीत न्हालेल्या फोडीही जबरदस्त लागायच्या. घरभर फिरता फिरता कैरीची फोड चवीचवीने, मिटक्या मारण्यात एक वेगळीच मजा होती. आईच्या हाताची चव जगात कुठेच नसते. तिने तव्यावर पोळी टाकली रे टाकली, की ताटली हातात घेऊन, ती टम्म फुगताना येणारा पोळीचा सुगंध पोटातल्या कावळ्यांची संख्या वाढवायचा. लोणच्याच्या बरणीला हात लावायची परवानगी नसायची, कारण आधीच एका छोट्या बरणीत लोणचं काढलेलं असायचं. मग काय, तव्यावरची मस्त गरम गरम, वाफाळलेली, लुसलुशीत पोळी ताटलीत आली रे आली की, अहाहा! चमच्यात तवंग, हिंगाचा सुगंध, ती रसरशीत मसाल्याने वेढलेली फोड पोळीच्या मधोमध आणि वरून एक चमचाभर तेल… पहिलाच घास घेतल्यावर पंचपक्वान्नही फिकेच वाटावे!
दरवर्षी कैर्या आणायची घाई, लोणचं करायची घाई आणि शेजार्यापाजार्यांकडे चव दाखवायची घाई-या रोजच्या धावपळीत कित्येक वर्षे निघून गेली. पण तशी तव्यावरची पोळी प्लेटमध्ये घेताना, आधी हे उरकून जाऊ दे, डबे भरू दे, ओटा आवरू दे, असे म्हणत म्हणत पोळी गार व्हायची. ती खाण्याची खरी मजा लोणच्यातच मुरलेली असते.
अंधार दाटून आला की दिवेलागणीला असे उदास बसू नये, असे आई सांगायची. पोळीचे जितके पदर, लोणच्यात जितके मसाले, तितक्याच सुगंधित आठवणी लोणचं-पोळीच्या असतात. आठवणींच्या गल्लीबोळीतून वाट काढत परत ओट्याजवळ घुटमळत, तीन वेळा फ्रिजचे दार उघडून ’कोणती भाजी करावी?’ हा यक्षप्रश्न आ वासून उभा ठाकतो. इतक्यात स्वारीचा आवाज येतो, आज माझा स्वयंपाक करू नको गं, मित्राकडे पार्टी आहे!
एका वाक्याने 80 टक्के मोकळी झाले, कारण एक दिवस घरातला पुरुष जेवायला नसला की 80 टक्के कामे कमी होतात. दोघंच मायलेक! दुपारीच त्याच्याकडून तोंडी करारावर सही घेतलीच होती की, रात्री मी म्हणेल ते जेवण खावे लागेल.
माहीत नाही का, कणिक मळणे नवीन नसले तरी आज कणिक मळताना, ती डब्यातून घेताना अगदीच लाडेलाडे परातीत टाकली आणि चिमूटभर मीठ जणू साखरेसारखेच वाटले. कणिक मळून झाली. तितक्याच नवलाईने पोळी लाटायला सुरुवात केली. गरगर फिरत पोळी तव्यावर भाजली आणि तव्यावरून प्लेटमध्ये आली. प्लेटमध्ये एक पिल्लुशी, लोणच्याची रसरशीत फोड आणि तेलाची धार! एक घास लेकाला भरवून, हे संपव, मग तुझ्या आवडीचं करून देईन असा पुन्हा एकदा करार झाला.
दोन पोळ्यांचा एकच गोळा करून जरा जाडसर घडीची पोळी लाटली. तव्यावर फुगल्यावर जरा खरपूस भाजली. मोकळे झालेले पदर, पट्टकन प्लेटमध्ये टाकून मध्ये दोन फोडी ठेवल्या. तेल जरा जास्तच पडलं बाई! म्हणून मग मनानेच स्वतःची समजूत काढली. अहाहा, लोणचं-पोळीच ती!
लोणचं-पोळी ही अॅॅडजेस्टमेंट किंवा ऑप्शनल जरी वाटत असली, तरी भाजी आवडली नाही म्हणून खाल्लेली असली, तरी तिच्या चवीमध्ये कधीच अॅडजेस्टमेंट नसते; ती नेहमीच पहिल्या पसंतीची असते.
आपणच आपल्यासाठी वेळ काढून आपल्या चवीचा हिशोब ठेवावा, म्हणजे आयुष्याच्या खात्यात आनंदाची रक्कम जमा होत राहते.
Pickle and Chapati