– अमोल जगताप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावरची आंब्यांची रांग, विहिरीकडे जाणारी ती परिचित पायवाट आणि दूरवर पसरलेले हिरवेगार शेतं हे सगळं वर्षभर सुंदर दिसायचंच, पण पावसाळा सुरू झाला की जणू या सगळ्या परिसराला नवं आयुष्य मिळायचं..
पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध दरवळायचा आणि संपूर्ण मळा जणू एकाच रात्रीत बदलून जायचा. कालपर्यंत कोरडी दिसणारी जमीन अचानक हिरवा शालू नेसायची. झाडांच्या फांद्यांवर नवी पालवी फुटायची. पाटातल्या पाण्याचा वेग वाढायचा आणि त्या पाण्याबरोबर आमचं बालपणही पुन्हा एकदा धावत सुटायचं.
आमच्या लहानपणी पावसाचा अर्थ फक्त भिजणं नव्हता. पावसाचा अर्थ होता तो म्हणजे घराबाहेर निसर्गाने उघडलेलं एक नवीन विश्व..!!
ढग दाटून आले की आम्ही ओसरीवर बसून त्यांच्याकडे बघत राहायचो. दूरवर एखादी वीज चमकायची. तिच्या पाठोपाठ कडकडाट व्हायचा. आजी म्हणायची, आता जोराचा पाऊस येणार… आणि खरंच, काही क्षणांत पावसाच्या सरी जमिनीवर धावून यायच्या. सुरुवातीला हलक्या सरी मग रिमझिम आणि काही वेळातच मुसळधार पाऊस.. घराच्या कौलांवर आदळणार्‍या थेंबांचा आवाज इतका सुंदर वाटायचा की त्यातच एखादं गाणं दडलं आहे, असं वाटायचं. पाटातलं पाणी क्षणाक्षणाला वाढत जायचं. शांत वाहणारा पाट अचानक काठोकाठ भरून जोशात धावू लागायचा. त्याच्या काठावरची गवतं पाण्याबरोबर डोलायची. पाण्याचा रंग बदलायचा. माती मिसळल्यामुळे ते पाणी तपकिरी व्हायचं, पण त्यात एक जिवंतपणा असायचा.. खळखळाट असायचा..
पावसाळ्यात आमच्या मळ्याभोवती अनेक छोटेमोठे ओढे तयार व्हायचे. वर्षभर जिथे फक्त पायवाट दिसायची, तिथे अचानक खळखळत पाणी वाहू लागायचं. त्या ओढ्यांना कायम नाव नसायचं. पाऊस असेपर्यंत ते जगायचे आणि पाऊस संपला की पुन्हा मातीमध्ये विरून जायचे.
आमच्यासाठी मात्र ते ओढे म्हणजे साहसाची सुरुवात असायची. पावसाचा जोर थोडा कमी झाला की आम्ही भावंडं बाहेर पडायचो. कुठे नवीन ओढा सुरू झालाय, कुठे पाणी जास्त आहे, कुठे छोटासा धबधबा तयार झालाय, याचा शोध सुरू व्हायचा.
एखाद्या छोट्याशा उतारावरून पाणी खाली कोसळताना आम्हाला तोही धबधबाच वाटायचा.
आजच्या मापाने तो कदाचित दोन-तीन फुटांचा असेल. पण आमच्या नजरेत तो जगप्रसिद्ध नायगारा धबधब्यापेक्षा कमी नव्हता..!!
त्या पाण्याजवळ उभं राहायचं, पाणी डोक्यावर घ्यायचं. मग डोक्यावरून ओघळणारे थंडगार पाणी अंगावर घ्यायचं आणि मोठमोठ्याने ओरडायचं… त्या आनंदाला किंमत नव्हती.
आई, बाई , ताई कुणी कितीही ओरडलं तरी आम्ही पावसात भिजणं काही सोडत नव्हतो.
कारण त्या पावसाचं आमच्याशी वेगळंच नातं होतं.
पावसानंतर मोठ्या ओढ्याच्या काठावर अनेक छोट्या छोट्या गोष्टी सापडायच्या. कुठे एखादा गुळगुळीत दगड, कुठे पाण्याबरोबर वाहत आलेली झाडाची फांदी, कुठे लहान मासे, तर कुठे बेडकांची पिल्लं.. आम्ही त्या प्रत्येक गोष्टीकडे आश्चर्याने बघायचो.
निसर्ग आमचा पहिला शिक्षक होता. कोणतंही पुस्तक न उघडता तो आम्हाला दररोज काहीतरी नवीन शिकवत होता.
कधी पावसाचा जोर खूप वाढला, पाट त्याचे पात्र सोडू लागला की तात्या आम्हाला पाटाजवळ जाऊ देत नसत. पाणी खेळायला नसतं, ते वाहून नेतं, – असं ते कायम सांगायचे.
पावसाळ्यात विहिरीचं रूपही बदलायचं.. ती काठोकाठ भरायची.. तिच्या काठावरची माती ओली व्हायची. झाडांच्या फांद्या आणखी खाली झुकायच्या. विहिरीत पाण्याची पातळी वाढलेली पाहून तात्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसायचं.
पावसानंतर मळ्यात फिरताना प्रत्येक पान स्वतंत्र धुतल्यासारखं वाटायचं. आंब्याच्या झाडावरून थेंब टपकत राहायचे. जांभळाच्या पानांवर मोत्यासारखे दवबिंदू चमकायचे. ओढ्याच्या काठावर उभं राहून ते दृश्य पाहताना वेळ कसा जायचा, ते कळायचंच नाही.
संध्याकाळ झाली की त्या ओढ्यांचा आवाज आणखी स्पष्ट ऐकू यायचा. रातकिड्यांच्या किरकिरात मिसळलेली पाण्याची खळखळ…
तो आवाज आम्ही आजही मनात कुठेतरी जपून ठेवला आहे. आज शहरात कृत्रिम धबधबे पाहायला मिळतात. रिसॉर्टमध्ये पाण्याचे फवारे असतात. लोक सुट्ट्या काढून धबधबे पाहायला जातात.
पण आमच्या बालपणी पावसाळा आला की धबधबे स्वतः आमच्याकडे यायचे.. त्यासाठी कुठलेही तिकीट लागतं नव्हतं.. किंवा प्रवेश शुल्क नव्हतं… फक्त निसर्गाची उधळण होती.
आजही पाऊस सुरू झाला की मन नकळत त्या मळ्यात जाऊन पोहोचतं. डोळ्यासमोर पुन्हा तोच पाट दिसतो… तोच ओढा… अन् तोच छोटासा धबधबा… आणि त्या धबधब्याखाली उभा राहून हात पसरलेला एक निष्पाप मुलगा…
तो मुलगा अजूनही माझ्यातच आहे.. फरक एवढाच… पूर्वी तो पावसात भिजायचा.. आज तो आठवणींमध्ये भिजतो आणि प्रत्येक पावसाळ्यात, त्या ओढ्यांच्या खळखळत्या पाण्याबरोबर, माझ्या बालपणाचाही एक छोटासा प्रवाह पुन्हा वाहू लागतो..

Rain Showers

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago