वर्गात विद्यार्थी, शिक्षणात गुणवत्ता येईल कशी?

वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षक भरतीतील गोंधळ दूर होणे, पेपरफुटी रोखणे आणि शैक्षणिक जबाबदारीचा पुनर्विचार करत रोजगाराभिमुख व गरजेनुसार अभ्यासक्रमांची निर्मिती होणे आवश्यक आहे. अन्यथा परदेशी विद्यापीठांशी स्पर्धा करताना आताची संपूर्ण शिक्षक व प्राध्यापकांची पिढी कायमची घरी बसेल.
महाराष्ट्रातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणव्यवस्था आज एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती घटत चालली आहे म्हणून शिक्षक व प्राध्यापकांना घरोघरी प्रवेशासाठी धाडले जात आहे, तर दुसरीकडे शिक्षक भरती प्रक्रियेबाबत निर्माण होणारे यक्षप्रश्न आहेत. नीट परीक्षेसारखे पेपर लिकमुळे वीसपेक्षा जास्त विद्यार्थांच्या आत्महत्यांमुळे शिक्षणमंत्र्यांना काही फरक पडलेला दिसत नाही, खासगी क्लासेसबरोबर अकॅडमिक टायअपचे वाढते जाळे आणि शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणामुळे शिक्षणव्यवस्थेच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ’गुरूं’ना नवीन तंत्रज्ञान शिकण्याची गरज अजूनही न वाटावी हे आत्मघातकी आहे.
शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याचा मार्ग नसून निसर्गाशी तादात्म पावत, व्यक्तिमत्त्व विकास, विश्वाचा पसारा समजण्याची, विचारक्षमता आणि समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे. रोजगारनिर्मिती व पायावर उभे राहत अर्थार्जनाने स्वावलंबी बनविणारे वाघिणीचे दूधदेखील शिक्षणच आहे. मात्र, आज अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नियमितपणे प्रवेश घेतात, परीक्षा देतात, पण वर्गात हजर राहत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. ही बाब केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे. वर्कलोड नाही तरी फुकटचा पगार मिळावा असे अपवाद वगळता असंख्य लोकांंना वाटते. ग्रँट-सीएचबीमुळे शासनावर पगाराचा भार सोपवून काही शिक्षणसंस्थादेखील निर्धास्त झाल्या आहेत.
घटती उपस्थिती
गेल्या काही वर्षांत ऑनलाइन शिक्षण, यू-ट्यूब व्हिडीओ, शिक्षकांची रटाळ पोपटपंची, नावीन्याचा व सामाजिक गरजांवर उकल शोधण्याचा अभाव असलेले अति जुनाट अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी, पार्टटाइम नोकर्‍या, डिजिटल साधनांचा वाढता वापर आणि काही प्रमाणात शिक्षणाविषयीची बदललेली मानसिकता यामुळे विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती कमी होत असल्याचे दिसते. अनेक विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यापेक्षा नोट्स, यू-ट्यूब व्याख्याने, तसेच लाखो रुपये फी भरत कोचिंग क्लासेस अधिक उपयुक्त वाटू लागले आहेत.
पालकांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची जबाबदारी केवळ महाविद्यालय किंवा शिक्षकांवर टाकून चालणार नाही. पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत पालकांकडून लेखी हमी घेण्याचा प्रस्ताव काही शिक्षणतज्ज्ञांनी मांडला आहे. त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. विद्यार्थी महाविद्यालयात जातो का, वर्गात बसतो का, अभ्यासात सहभागी होतो का याबाबत पालक, शिक्षक आणि संस्था यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असणे आवश्यक आहे. पुरेसे शिक्षक आहेत का, ते वर्गात शिकवितात का, संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करतात का, हेही तपासायला हवे.
समन्वयातूनच समाधान
विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था व्यवस्थापन, विद्यापीठे आणि शासन या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात. नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण अध्यापन, पारदर्शक भरती, जबाबदार अकॅडमिक टायअप्स आणि शिक्षणातील नैतिक मूल्ये यांवर भर दिल्यास शिक्षणव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल.
आज शिक्षण क्षेत्रासमोर असलेली आव्हाने गंभीर असली, तरी ती अजेय नाहीत. विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थित राहणे, शिक्षकांनी अध्यापन अधिक प्रभावी करणे, भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवणे आणि शिक्षणाला व्यवसाय नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचे साधन मानणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *