मंदिर महासंघाच्या कायदेशीर लढ्याला यश

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या 13 कोटी रुपयांची बचत

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या भाविकांच्या देणगीतून प्राप्त झालेला 13 कोटी रुपयांचा निधी त्र्यंबक नगरपरिषदेकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्याच्या प्रस्तावाला मंदिर महासंघ, महाराष्ट्र यांनी केलेला कायदेशीर विरोध यशस्वी ठरला आहे. भाविकांनी अर्पण केलेला पैसा केवळ देवस्थान आणि हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठीच वापरला जावा, तो नागरी कामांसाठी वळवणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे, अशी ठाम भूमिका महासंघाने घेतली होती.
यासंदर्भात महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री, विधी व न्याय राज्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्त यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी धर्मादाय आयुक्तांना सखोल चौकशीचे स्पष्ट निर्देश दिले. शासनाकडून सुरू झालेली चौकशी आणि महासंघाचा विरोध यामुळे अखेर नगरपरिषदेला 13 कोटी रुपयांची मागणी मागे घ्यावी
लागली आहे.
पाठपुराव्यासाठी महासंघाच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची भेट घेऊन कायदेशीर व प्रशासकीय मुद्दे मांडले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने 34 हजार कोटींचा निधी मंजूर केला असून, त्यापैकी 277 कोटी रुपये त्र्यंबकेश्वरच्या रस्ते व घनकचरा व्यवस्थापनासाठी राखीव आहेत. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी कर आकारणीचा अधिकार नगरपरिषदेला असून, भांडवली खर्चापैकी 25 टक्के निधी घनकचरा व्यवस्थापनासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे.
सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयानुसार मंदिराचा पैसा अन्य विकासकामांसाठी देता येत नाही, असा दाखलाही यावेळी देण्यात आला. या बैठकीस मंदिर महासंघाचे संदीप वाघ, सकल हिंदू समाजाचे कैलास देशमुख, अधिवक्ता प्रेरणा वाघ, अमोल शिंदे, श्रेयस दाणी व संजीवनी दाणी उपस्थित होते.

भक्तांचा पैसा भक्तांच्या सेवासुविधांवरच खर्च व्हावा

त्र्यंबक नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचे वार्षिक वीजबिल, थकीत रक्कम व सुरक्षा अनामत देवस्थानच्या दानातून भरले जात असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकाराचीही सखोल चौकशी होऊन भक्तांचा पैसा भक्तांच्या सेवासुविधांवरच खर्च व्हावा आणि हे वीजबिल भरणे तातडीने थांबवावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

नगरपरिषदेने असा कोणताही ठराव केलेला नाही आणि यापुढे असा निर्णय घेण्यापूर्वी मंदिर महासंघाशी चर्चा केली जाईल.
– गोविंद जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर

 

Success for the Temple Federation’s legal battle.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *