सिंहस्थापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कोकाटेंचे फडणवीसांना पत्र
सिन्नर : प्रतिनिधी
ऐतिहासिक श्री गोंदेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी 2022 मध्ये 5 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही विकासकामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे सिंहस्थ महाकुंभ 2027 पूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मंजूर कामे नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभ प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात समाविष्ट करून निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी
केली आहे.
सिन्नरची ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या गोंदेश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाने 2022 मध्ये निधी मंजूर केला होता. मंदिर परिसराचा बृहत विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे. मंदिराचे ऐतिहासिक व वास्तुशिल्पीय स्वरूप जतन करण्यासोबत भाविकांसाठी सुविधा, परिसर सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाची विविध कामे प्रस्तावित आहेत. मात्र, निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामांना अद्याप गती मिळालेली नाही.
मंजूर विकासकामांची निविदा प्रक्रिया प्रलंबित असल्याने ती तातडीने सुरू करण्यासाठी पुरातत्त्व विभाग, छत्रपती संभाजीनगर यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. सुधारित अथवा एकत्रित विकास आराखड्यास मंजुरी देऊन कामांना गती देण्याची मागणीही कोकाटे यांनी केली आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ महाकुंभासाठी देशभरातून भाविक व पर्यटक येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गोंदेश्वर मंदिराचा विकास केल्यास सिन्नरच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे पूर्वी मंजूर असलेली कामे महाकुंभ प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात घेऊन त्यात सिंहस्थाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा समावेश करावा, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.
Development of Gondeshwar stalled despite sanction of ₹5.58 crore!