तपोवनातील निवारा केंद्रात बेघरांना मिळणार आधार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील बेघरांना निवार्‍याची व्यवस्था करून देण्यासाठी शहरातील पंचवटीतील इंद्रकुंड व संत गाडगे महाराज आश्रम येथे बेघरांसाठी निवारा केंद्र आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी गाडगे महाराज आश्रमाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यातच पावसाचा हंगाम असल्याने तपोवनातील निवारा केंद्र लवकरच सुरू केले जाणार असून, गाडगे महाराज निवारा केंद्रातील बेघरांना नव्याने झालेल्या इमारतीत हलवले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली.
पावसाळ्यात बेघर असलेल्या व्यक्तींचे हाल होऊ नये याकरिता तपोवनात नुकतीच नव्याने दोन मजली इमारत निवारा केंद्रासाठी बांधली आहे. तेथे बेघर व्यक्तींची जेवणासह राहण्याची सोय असणार आहे. या इमारतीच्या समोरील भागात सिटीलिंक बसचे टायर व इतर साहित्य पडले असल्याने ते लवकर उचलून घेण्यात यावे, असे पत्र पालिकेने सिटीलिंकला धाडले आहे. शहरात अजून चार निवारा केंद्र होणार असून, त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळ्णार आहे.
तपोवन येथील निवारा केंद्र दोन मजली असून, तेथे 280 व्यक्ती एकाचवेळी राहू शकतात. त्यांना दोन वेळेचे जेवण, नाष्टा दिला जातो.
केवळ निवारा न देता त्यांच्यामध्ये उमेद निर्माण करणे, स्वत:च्या पायावर उभे राहता यावे हा देखील निवारा केंद्राचा उद्देश आहे. यापूर्वी नाशिक शहरात 2019 मध्ये व्ही मॅक्स संस्थेने शहरात बेघर व्यक्तींचा सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांना 894 बेघर आढळून आले होते. पालिकेने चेहेडी पंपिंग, सातपूर परिसरातील महादेववाडी, पंचवटी व वडाळागाव येथे निवारा केंद्र करण्याचे ठरवले आहे. यासाठी सुमारे 22 कोटींचा खर्च येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *