ग्रंथ निघाले ब्रिस्बेनला

 

ब्रिस्बेन , ऑस्ट्रेलिया येथे २१ ग्रंथपेट्या रवाना

नाशिक : प्रतिनिधी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ ग्रंथ तुमच्या दारी ‘ या दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध करून देणाऱ्या वाचकप्रिय योजनेमुळे अडीच कोटींपेक्षा जास्त रुपयांची पुस्तके वाचनासाठी भारत आणि भारताबाहेर १५ देशांत फिरत्या ग्रंथपेट्यांच्या स्वरूपात आहेत . ब्रिस्बेन , ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असलेले पण मूळचे भारतीय असलेले श्रुती- तुषार काळवीट हे दाम्पत्य मागच्याच महिन्यात कुसुमाग्रज स्मारक , नाशिक येथे ‘ ग्रंथ तुमच्या दारी ‘ योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांची भेट घेण्यासाठी आले होते . ब्रिस्बेन येथील मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता ब्रिस्बेन येथील १६ वाचक कुटुंबांनी देणगीरूपाने आर्थिक पाठबळ देऊन सक्रिय सहभाग नोंदवला . त्यामुळे श्रुती काळवीट , समन्वयक ब्रिस्बेन यांच्या पुढाक २१ ग्रंथपेट्या ब्रिस्बेन , ऑस्ट्रेलिया येथे रवाना होत आहेत . तसेच अंजली घुर्ये यांच्या ‘ ओ झेड किराणा ‘ या उद्योग समूहाद्वारे ग्रंथपेट्या ब्रिस्बेन येथे त्यांच्या कंटेनरमधून नेण्यासाठी सहकार्य केल्याने वायुमार्गाने ग्रंथपेट्या पाठवण्याच्या खर्चात बचत होणार आहे . २१ ग्रंथपेट्यांनी ब्रिस्बेन येथे ग्रंथ तुमच्या दारी ‘ योजनेचा शुभारंभ होत आहे . एका ग्रंथपेटीत २५ पुस्तके आहेत . प्रत्येक पेटीतील पुस्तके वेगळी असतात . विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यांसाठी उपलब्ध होतात . दर ३ महिन्यांनी पेट्या परस्परांमध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वांना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *