संपादकीय

‘डेडलाइन’चे आव्हान

– गोरख काळे
सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून शहरात 28 ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, एकाचवेळी कामे सुरू असल्याने नाशिककर मेटाकुटीला आले आहे. नियोजित ठिकाणी जाताना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी शहरात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. अन्यथा शहरवासीयांची काय अवस्था झाली असती, हे सांगणेही कठीण आहे. प्रशासनाने रस्तेकामांच्या ठेकेदारांना कामासाठी मार्च 2027 पर्यंत डेडलाइन दिली आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यर्ंत अवघे दहा ते पंधरा टक्के रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यामुळे पुढील नऊ महिन्यांत कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान कसे पेलवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत नाशिक महापालिका प्रशासनाने काम न केल्यास त्याचे खापर प्रशासनावरच फुटणार आहे. सोबत नाशिककरांच्या संतापालाही सामोरे जावे लागेल.

अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने सर्वत्र पाठ फिरवली आहे; परंतु येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय झाल्यास शहरात सुरू असलेल्या रस्तेकामांवर परिणाम होऊ शकतो. मागील दोन-तीन वर्षांतील परतीच्या पावसाचा अनुभव पाहता महापालिकेला याचा विचार करूनच कामाचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या कामाचा जर वेग पाहिला तर ही कामे वेळेत होतील का? याबाबत साशंकताच आहे.
नाशकात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येणार आहेत. तीन अमृतस्नान व वर्षभराचा विचार करता यंदाच्या सिंहस्थात 12 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. अमृतस्नानाच्या दिवशी तर सव्वा कोटी भाविकांचा अंदाज आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, याकरिता महापालिका प्रशासनाकडून सर्वच आघाड्यांंवर नियोजन सुरू आहे. यात रस्ते, पुलांच्या कामांना वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागतो. यादृष्टीने शहरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून कामाला सुरवात झाली आहे. कोट्यवधी भाविकांची श्रद्धा सिंहस्थावर असल्याने राज्यातील भाजप सरकारने सिंहस्थासाठी कोणतीच कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली आहे. यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी 35 हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. आजवर नाशकात जेवढे सिंहस्थ झाले, त्या तुलनेने राज्य सरकारने सर्वाधिक निधी यावेळच्या सिंहस्थाला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिककडे विशेष लक्ष आहे. सिंहस्थ नियोजनासंदर्भात ते अधूनमधून बैठका घेत असतात. सिंहस्थापूर्वी सुरू असलेली कामे मुदतीत होणे आवश्यक असतानाही ठेकेदारांकडून कामात दिरंगाई होताना दिसत आहे. ही बाब महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निदर्शनास येताच सात ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना दणका दिला. प्रथम तीन व नंतर चार ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. इतर कामातील हलगर्जी सहन केली जाऊ शकते; परंतु सिंहस्थासारख्या विषयात केलेली दिरंगाई महापालिकेला परवडणारी नाही. मुळात सिंहस्थ हा संवेदनशील विषय आहे. कोट्यवधी भाविकांच्या भावना या धार्मिक उत्सवाशी जुळलेल्या आहेत. असे असतानाही ठेकेदारांकडून कामात कासवगती होतेच कशी, असा सवाल उपस्थित केला जातोय. यापूर्वी सिंहस्थात काम करणारे ठेकेदार कुठले, त्यांना कोणी काम दिले, ते कोणाच्या जवळचे? यावरून विरोधकांकडून आरोप केले आहेत व अजूनही केले जात आहेत. ठेकेदारांनी गांभीर्य दाखवत 28 ठिकाणचे रस्ते पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात पूर्ण करायलाच हवेत. पण विहित मुदतीत ठेकेदार काम मार्गी लावणार का? हे लवकरच समजणार आहे. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यात जमा आहे. या महिन्यात कंत्राटदारांनी ज्या तत्परतेने कामे करायला हवी होती ती होताना दिसली नाही. जुलैमध्ये वरुणराजाने कृपा केल्यास रस्तेकामे बंद ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे जोपयर्ंंत पाऊस नाही तोपर्यंत कामाला चाल देण्याची आवश्यकता आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सतराशे कोटींचा सांडपाणी प्रकल्प सुरू आहे. सोबतच पाणीपुरवठा विभागाची मुकणे पाणी योजनेचे कामे सुरू असून, थेट विल्होळी येथून साधुग्राममध्ये जलवाहिनी टाकली जाणार आहे. सोबतच अमृत योजनेंंतर्गत ड्रेनेजचे काम सुरू आहे. मात्र, वरील ही सर्व कामे पावसाळ्यातही सुरू ठेवण्याचे निर्देश मक्तेदारांना देण्यात आले आहेत. पाणीपुरवठ्याप्रमाणेच बांधकाम विभागानेदेखील रस्तेकामे करणार्‍या संस्थांनाही त्यांनी पावसाळ्यात काम सुरू ठेवण्याच्या सूचना देणे अपेक्षित आहे. रस्त्यांची मुदतीत कामे झाल्यावरच शहरवासीयांची त्रासातून सुटका होईल. याकरिता महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यावर या कामाबाबत जबाबदारी आहे. ते ओळखूनच आयुक्त मागील काही दिवसांपासून थेट कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. रस्तेकाम करताना अनेक ठिकाणी वाहनधारकांच्या सुरक्षेकडे डोळेझाक होत आहे. गरवारे पॉइंट चौक परिसरात यामुळेच अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासह दुचाकीस्वारांचे अपघात होऊन ते जखमी होत आहेत. बहुतेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला असून, याबाबत कुठलाही दिशादर्शक फलक तेथे लावत नसल्याचे चित्र आहे. स्थायी सभेत यावरून नगरसेवकांनी ठेकेदारांनी रस्ते सुरक्षेबाबत कुठेही काळजी घेतली जात नसल्याचे गंभीर आरोप केले असता, प्रशासनाने सुरक्षा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण त्याकडे काहींनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. शहरात गंगापूर रोड, बारदान फाटा ते सुला वाइनयार्ड चौक, त्र्यंबक रोड पपया नर्सरी सिग्नल ते एक्स्लो जंक्शन, रेल्वे स्थानक, मुंबई महामार्ग, एक्स्लो पॉइंट ते गरवारे पॉइंट, वडनेर गेट ते विहितगाव मार्ग, विहितगाव ते बिटको चौक ते जेलरोड, नांदूर पूल ते जत्रा हॉटेलकडे जाणारा रस्ता, लेखानगर ते वडाळागाव, रविशंकर मार्ग, संगम पूल ते मिर्ची हॉटेल चौक ते अमृतधाम चौक ते गुंजाळ बाबा चौक, केटीएचएम पूल ते जुना गंगापूर नाका, विजय ममता चौक ते टाकळी गाव-संगम पूल, अशोक स्तंभ ते जेहान सर्कल, गंगापूर रोड-जेहान सर्कल ते गंगापूर गाव, खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका ते आयटीआय सिग्नल, निमाणी चौक ते दिंडोरी रस्ता, पुणे रोड ते दत्तमंदिर चौक, पेठरोड कालवा ते मेहेरधाम चौक ते सिन्नर फाटा, जनार्दन स्वामी मठ ते लक्ष्मीनारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक, नाशिकरोड येथील मालधक्का परिसरातील जोडरस्ते विकसित करणे आदींसह इतर ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. वरील सर्वच भागांतील रस्ते शहराच्या जीवनवाहिन्या आहेत. मात्र, चुकीच्या काही ठिकाणी अयोग्य पद्धतीने कामे सुरू असल्याने त्याचा वाहनधारकांना मनस्ताप होतो. या कामांसाठी पुढील वर्षाची मार्चची मुदत दिली आहे. मात्र, ठेकेदारांनी मुदतीत कामे पूर्ण न केल्यास प्रशासनाने त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलावीत. सिंहस्थ हा नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे सर्व शहर खोदून ठेवले असले, तरी त्याविरोधात कुठेही आंदोलन किंवा विरोध होताना दिसत नाही. नाशिककर संयमी आहेत, हे प्रशासनाने डोक्यातून काढावे. कारण नाशिककर जसे चांगल्या गोष्टीचे उत्स्फूर्तपणे समर्थन करतात, तसेच चुकीच्या गोष्टींचा करेक्ट कार्यक्रमही करतात. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून जर सांगायचे म्हटले तर भले तरी देऊ कासेची लंगोटी… नाठाळाच्या माथी हाणू काठी. हे प्रशासनाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

The Challenge of the ‘Deadline’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago