राणेनगरमधील प्रकार : दोघांना अटक, दोन दिवसांची पोलिस कोठडी
सिडको : प्रतिनिधी
सिडकोतील राणेनगर, स्वामी विवेकानंदनगर येथील एस-2 सेक्टरमध्ये महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ग्रीन जिमच्या लोखंडी फलकाची कोयत्याने तोडफोड करून त्याच ठिकाणी पिस्तुलांच्या छायाचित्राचा आणि ‘एस-2 कंपनी’ असा उल्लेख असलेला बोर्ड लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अंबड पोलिसांनी रोहन गोठी आणि साहिल सूर्यवंशी या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांची संबंधित परिसरातून धिंड काढली. याप्रकरणी चेतन गणू ठेपणे (वय 40) यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि प्रभागाच्या नगरसेविका छाया देवांग यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आदित्य मटण भाकरी हॉटेलच्या मागील बाजूस, साईबाबा मंदिराजवळील एस-2 सेक्टरमध्ये हा प्रकार घडला. नागरिकांच्या व्यायामासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ग्रीन जिमच्या लोखंडी फलकाची कोयत्याने तोडफोड करण्यात आली. या फलकावर आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून ग्रीन जिम उभारण्यात आल्याचा उल्लेख असून, नगरसेविका छाया देवांग यांचेही नाव आहे.
या फलकाचे नुकसान केल्यानंतर त्याच ठिकाणी ‘एस-2 कंपनी’ असा मजकूर असलेला बोर्ड लावण्यात आला. या बोर्डावर दोन पिस्तुलांची छायाचित्रे असलेला प्लास्टिकचा फलकही लावण्यात आला होता. हातातील कोयते दाखवून नागरिकांना धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकाराची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तुलांच्या छायाचित्रांचा फलक ताब्यात घेतला. दरम्यान, परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या वायर कापण्यात आल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात एका अल्पवयीनासह चौघांना ताब्यात घेण्यात आले. रोहन गोठी आणि साहिल सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर अंबड पोलिसांनी दहशत निर्माण झालेल्या परिसरातून त्यांची धिंड काढली.
या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. समाजकंटकांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलकाची तोडफोड, पिस्तुलांच्या छायाचित्रांचा फलक लावणे आणि सीसीटीव्हीच्या वायर कापण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
The crowd of vandals of the billboard
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…