आस्वाद

अंतर कमी झाले, मनं जवळ आली का?

– आशा नवले

एक काळ असा होता की दूरच्या नातेवाइकांची खुशाली समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पत्र. एखाद्याला सविस्तर लिहायचे असेल तर आंतरदेशीय पत्र लिहिले जायचे आणि फक्त एखादी महत्त्वाची बातमी कळवायची असेल तर पोस्टकार्ड. म्हणूनच घरात सहज शब्द निघायचा, आज कार्ड आलं! त्या काळात दळणवळणाची साधने मर्यादित होती. त्यामुळे नातेवाईकही बहुतांशी आसपासच असायचे. एखादी महत्त्वाची बातमी सांगायची असेल तर घरातील कोणी तरी सायकलवर, बसने किंवा चालत जाऊन ती सांगून यायचे.
हळूहळू दळणवळणाची साधने वाढली. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी माणसे दूर जाऊ लागली. नातेसंबंधांची व्याप्ती वाढली आणि दूरवर नाती जोडली जाऊ लागली. मग पत्र हेच दूरच्या माणसांशी जोडून ठेवणारे महत्त्वाचे माध्यम बनले. एखादी आनंदाची बातमी समजायला तीन-चार दिवस, तर कधी आठ-दहा दिवसही लागायचे. पत्र येण्याची वाट पाहण्यातही आपुलकी होती. वेळ लागायचा, पण मनात संयम होता. नंतर टेलिफोन आला. पत्राची जागा फोनने घेतली. आवाज काही क्षणांत दूरवर पोहोचू लागला. त्यानंतर मोबाईल आला आणि जग आणखी जवळ आले. इंटरनेटने तर अंतराची संकल्पनाच बदलून टाकली. व्हिडिओ कॉल सुरू झाले. समोरची व्यक्ती हजारो किलोमीटर दूर असूनही आपल्या डोळ्यांसमोर दिसते. पण याच सुविधेने नात्यांमध्ये एक वेगळाच बदल घडवून आणला.
पूर्वी भेट झाली की प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातील घडामोडी सांगायचा. त्यामुळे भेटीला एक वेगळीच उत्सुकता असायची. आता मात्र भेटीपूर्वीच जवळजवळ सगळे काही माहिती असते. मोबाईलमुळे रोजच्या छोट्या-छोट्या गोष्टी शेअर होऊ लागल्या. पण हळूहळू सतत संपर्कात राहण्याची अपेक्षा वाढली. फोन का केला नाही?, मेसेज पाहून उत्तर का दिले नाही?, स्टेटस पाहिलं, पण रिप्लाय केला नाहीस? असे प्रश्न नात्यांमध्ये शिरले.
पूर्वी नोकरीसाठी बाहेरगावी असणारा मुलगा काय करतो हे रोज कळत नसे. आता स्टेटस, फोटो आणि व्हिडिओमुळे प्रत्येक गोष्ट लगेच समोर येते. पण प्रत्येक गोष्ट समोर दिसणे म्हणजे नातेसंबंध अधिक चांगले होणे असे नाही. कधी कधी दुसर्‍याचे सुख पाहून तुलना सुरू होते. तो एवढा फिरतो, आपला मुलगा मात्र… किंवा सगळे बायकोसाठी करतो, आई-वडिलांसाठी काय? अशा भावना नकळत निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे मुलांनाही पालकांच्या आयुष्याबद्दल सतत माहिती मिळू लागली. कोण कुठे गेले, कोणाला भेटले, काय केले याची चौकशी वाढली. मोबाईलने माहिती वाढवली; पण त्याचबरोबर गैरसमज आणि तुलना करण्याची संधीही वाढवली. सगळ्यात मोठा बदल कदाचित मेसेजमध्ये झाला. पूर्वी एखादे पत्र आले की ते पुनः पुन्हा वाचले जायचे. आता दिवसाला कितीतरी मेसेज येतात. सकाळी उठल्यावर अनेकांचे पहिले काम मोबाइल पाहणे असते. सतत मेसेज करणार्‍या व्यक्तीचा मेसेज सहज दुर्लक्षित होतो- नंतर उत्तर देतो म्हणून राहून जातो. पण एखाद्या व्यक्तीचा क्वचितच मेसेज येतो आणि अचानक तो मेसेज दिसतो, तेव्हा तो लगेच उघडून पाहिला जातो. कारण मनाला खात्री असते-यांचा मेसेज म्हणजे काहीतरी विशेष असेल. म्हणजेच संदेश पोहोचवणे सोपे झाले, पण संदेशाची किंमत कमी झाली. आज मोबाईल, कॉल आणि मेसेज हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र त्यांचा वापर करताना काही साधी माणुसकी जपणे गरजेचे आहे. उगाच कोणाला त्रास देण्यासाठी सतत मेसेज करू नयेत. एखाद्याने विश्वासाने मनातील गोष्ट मेसेजमधून सांगितली असेल तर तिचा स्क्रीनशॉट घेऊन दुसर्‍यांना दाखवू नये. कोणाचे कॉल रेकॉर्ड करून त्याचा गैरवापर करू नये. आणखी एक गंभीर बदल म्हणजे परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडिओ काढणे. आज कोणालाही न विचारता त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला जाऊ शकतो. एका रात्रीत एखाद्याची बदनामी होऊ शकते, तर त्याच वेगाने एखादी व्यक्ती प्रसिद्धही होऊ शकते. तंत्रज्ञानाने आपल्याला संवादाची ताकद दिली आहे, पण त्या ताकदीसोबत जबाबदारीही दिली आहे. मोबाइलमुळे दूरचे माणूस जवळ आले, हे खरे. पण जवळ असलेली माणसे मनाने दूर जाऊ नयेत, याची काळजी घेणे आता आपली जबाबदारी आहे. पत्र लिहिण्यासाठी वेळ लागायचा, म्हणून शब्द जपून लिहिले जायचे. आज मेसेज काही सेकंदांत पाठवता येतो, म्हणून कदाचित शब्दांची किंमत कमी झाली आहे. पूर्वी पत्राची वाट पाहताना माणूस संयम शिकला. आज मेसेजच्या उत्तराची वाट पाहताना आपण अस्वस्थ होतो. पूर्वी अंतर जास्त होते, पण नात्यांमध्ये आपुलकी होती. आज अंतर कमी झाले आहे, संपर्क वाढला आहे; पण कधी कधी मनांमधील अंतर वाढताना दिसते. तंत्रज्ञानाचा उपयोग आपण माणसांना जोडण्यासाठी करणार की त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी, तुलना करण्यासाठी आणि गैरसमज वाढवण्यासाठी, हे शेवटी आपल्या हातात आहे.

 

 

 

The distance has decreased—but have hearts truly come closer?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

5 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

5 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

5 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

5 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

5 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

5 hours ago