तरुण

सीमारेषेपलीकडचं वैभव..

भारतीय क्रिकेटच्या विशाल आकाशात दरवर्षी अनेक नवे तारे चमकतात. काहींची चमक क्षणिक असते, तर काहींचा प्रकाश दूरवर पोहोचतो. अलीकडच्या काळात क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरलेलं एक नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. वयाच्या अवघ्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा तरुण क्रिकेटपटू केवळ आपल्या फलंदाजीमुळेच नव्हे, तर त्यामागील संघर्ष, जिद्द आणि समर्पणामुळेही लक्ष वेधून घेतो.

बिहारमधील समस्तीपूर येथे वाढलेल्या वैभवचे बालपण इतर मुलांसारखेच साधे होते. मात्र, त्याच्या हातात आलेली बॅट ही केवळ खेळण्याची वस्तू नव्हती, ती त्याच्या स्वप्नांची पहिली पायरी होती. अनेक मुलं मैदानावर खेळत असतात; पण काहींच्या डोळ्यांत वेगळं स्वप्न असतं. वैभवच्या डोळ्यांतही तेच स्वप्न होतं-भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं..!
वैभवच्या जडणघडणीत कुटुंबाचा वाटा मोठा आहे. एका छोट्या गावातून मोठ्या क्रिकेटविश्वात प्रवेश मिळवणे सोपे नसते. त्याच्या वडिलांनी मुलाच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. सरावासाठी लागणारा वेळ, प्रवास, प्रशिक्षण यासाठी त्यांनी अनेक त्याग केले. अनेकदा पालकांच्या स्वप्नांचा भार मुलांवर असतो; पण वैभवच्या बाबतीत मात्र मुलाच्या स्वप्नांना पालकांनी आधार दिला.
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपते, तेव्हा प्रेक्षकांना त्याच्या फटक्यांमधील ताकद दिसते. पण त्या फटक्यांमागे किती त्याग, किती संघर्ष आणि किती प्रेम दडलेलं आहे, हे फार कमी लोकांना माहीत असतं. कारण वैभवची कथा ही फक्त एका प्रतिभावान क्रिकेटपटूची नाही; ती एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी केलेल्या निःशब्द बलिदानाची कथा आहे.
वैभवच्या क्रिकेटप्रवासाची खरी सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला चांगलं प्रशिक्षण मिळावं म्हणून शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला. समस्तीपूरहून पटण्यापर्यंतचा प्रवास, सरावाची फी, क्रिकेट साहित्य आणि स्पर्धांचे खर्च भागवण्यासाठी त्यांनी अनेक आर्थिक अडचणी झेलल्या. इतकंच नाही तर मुलाचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी कुटुंबाची शेतजमीनही विकली.
वैभवच्या यशामागे त्याच्या आईचंही योगदान तितकंच मोठं आहे. क्रिकेटपटू घडवताना केवळ प्रशिक्षक किंवा मैदान महत्त्वाचं नसतं; त्यामागे घरातली एक निःशब्द शक्तीही असते. वैभवला पहाटे सरावासाठी जाता यावे म्हणून त्याची आई रोज पहाटे तीन वाजता उठून त्याच्यासाठी जेवणाचा डबा बनवायची, त्याच्या दिनचर्येची काळजी घ्यायची आणि त्याच्या प्रत्येक यश-अपयशात खंबीरपणे उभी राहायची. वयाच्या चौथ्या वर्षी क्रिकेटची सुरुवात केलेल्या वैभवने पुढे पटण्यातील अकादमीत प्रशिक्षण घेतलं. रोज जाण्या-येण्याचा खर्च परवडत नसल्याने दर दुसर्‍या दिवशी शंभर किलोमीटरहून अधिकचा प्रवास करून त्याचे वडील त्याला सरावासाठी घेऊन जात असत. तोही तितक्याच जिद्दीने दिवसाला शेकडो चेंडू खेळत स्वतःला घडवत राहिला.
यानंतर बिहारच्या वयोगट क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून त्याने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी खेळताना त्याने झंझावाती शतकं झळकावली आणि अखेर राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर विश्वास दाखवत आयपीएलमध्ये संधी दिली.
आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा आणि अवघ्या चौदा वर्षांच्या वयात शतक झळकावणारा वैभव आज भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा चेहरा मानला जातो. पण स्वतः वैभव मात्र यशाचं श्रेय स्वतःकडे घेत नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, मी आज जे काही आहे ते माझ्या आई-वडिलांमुळे आहे. त्याचे वडील काम सोडून त्याच्यासोबत राहिले, तर आईने स्वतःच्या गरजांपेक्षा मुलाचं स्वप्न
मोठं मानलं.
आज जेव्हा वैभवच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेपलीकडे उडतो, तेव्हा त्या प्रत्येक षटकारात आई-वडिलांची मेहनत मिसळलेली असते. म्हणूनच वैभव सूर्यवंशीची कथा ही केवळ क्रिकेटची नाही; ती स्वप्नांवर विश्वास ठेवणार्‍या आई-वडिलांच्या प्रेमाची आणि त्यागाचीही कहाणी आहे. वैभव सूर्यवंशी हा मुलगा आज भारतीय क्रिकेटच्या भविष्याची आशा बनला आहे.

 

The glory beyond the borders..

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago