संपादकीय

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने निर्माण केलेला ‘अंतराळ कचरा’  ही गंभीर जागतिक समस्या बनली आहे. उपग्रह, रॉकेटचे तुकडे, वापरातून बाद झालेली याने आणि त्यांच्या धडकांमधून निर्माण झालेले लाखो तुकडे पृथ्वीभोवती वेगाने फिरत आहेत. हा कचरा आता केवळ वैज्ञानिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. उपग्रहांवर अवलंबून असलेली दळणवळण, इंटरनेट, हवामान अंदाज, जीपीएस, बँकिंग, संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अत्यावश्यक सेवा या धोक्याच्या छायेत आल्या आहेत.
सध्या पृथ्वीच्या कक्षेत दहा सेंटिमीटरपेक्षा मोठ्या आकाराच्या सुमारे 36 हजार निष्प्रयोज्य वस्तू फिरत आहेत. याशिवाय एक ते दहा सेंटिमीटर आकाराचे लाखो तुकडे आणि त्याहूनही लहान कोट्यवधी कण अंतराळात विखुरलेले आहेत. या सर्व कचर्‍याचे एकत्रित वजन सुमारे 13,486 टन असल्याचा अंदाज आहे. या कचर्‍याचा सर्वांत मोठा हिस्सा अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या अंतराळ मोहिमांमधून निर्माण झाला आहे. अंतराळातील हा कचरा पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सरासरी सात किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच सुमारे 25 ते 28 हजार किलोमीटर प्रतितास या वेगाने फिरतो. या वेगाने एखादा छोटासा धातूचा तुकडा कार्यरत उपग्रहावर आदळला तरी त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. मोठ्या तुकड्याची धडक तर संपूर्ण उपग्रहाचा चुराडा करू शकते. धडक झाल्यानंतर निर्माण होणारे हजारो नवीन तुकडे पुन्हा इतर उपग्रहांना धडकतात आणि कचर्‍याचे प्रमाण झपाट्याने वाढते.
आज पृथ्वीभोवती 15 हजारांहून अधिक उपग्रह परिभ्रमण करत आहेत. यांपैकी जवळपास दहा हजार उपग्रह स्पेसएक्सच्या स्टारलिंक प्रकल्पाचे आहेत. जगभरात इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही उपग्रहांची विशाल साखळी उभारण्यात आली आहे. याहूनही महत्त्वाचे म्हणजे भविष्यात आणखी दहा लाख उपग्रह अंतराळात पाठविण्याची महत्त्वाकांक्षी योजना मांडली गेली आहे. अंतराळ कचर्‍याशी संबंधित सर्वांत धोकादायक संकल्पना म्हणजे ‘केसलर सिंड्रोम’. या परिस्थितीत एका उपग्रहाची किंवा रॉकेटची धडक झाल्यावर निर्माण झालेला कचरा दुसर्‍या वस्तूंना धडकतो. त्यातून आणखी तुकडे तयार होतात आणि ही साखळी सतत वाढत राहते. जर ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर पृथ्वीच्या काही कक्षा कायमस्वरूपी वापरण्यायोग्य राहणार नाहीत. परिणामी नवीन उपग्रह प्रक्षेपित करणे, मानवी अंतराळ मोहिमा राबविणे आणि भविष्यातील अनेक वैज्ञानिक संशोधन प्रकल्प अशक्य होऊ शकतात.
अंतराळ कचर्‍याचा धोका आता केवळ उपग्रहांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला दरवर्षी किमान एकदा तरी संभाव्य धडक टाळण्यासाठी स्वतःची कक्षा बदलावी लागते. अंतराळवीरांसाठीही हा धोका गंभीर आहे. अगदी काही मिलिमीटर आकाराचा धातूचा कणदेखील अतिवेगामुळे अंतराळयानाच्या भिंतीला भेदू शकतो. सध्या वापरात असलेली सर्वांत सामान्य पद्धत म्हणजे मुदत संपलेले उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू देणे. उदाहरणार्थ स्टारलिंकचा किमान एक उपग्रह जवळपास दररोज वातावरणात प्रवेश करून नष्ट होतो. मात्र, या प्रक्रियेत कार्बन आणि अ‍ॅल्युमिना यांसारखे सूक्ष्म कण वातावरणात मिसळतात. सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करणार्‍या ओझोन थरासाठी हा एक नवा पर्यावरणीय धोका मानला जात आहे. अंतराळ कचरा कमी करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रभावी उपाययोजना राबवत आहे. पीएसएलव्ही-सी56 मोहिमेदरम्यान इस्रोने उपग्रह यशस्वीपणे कक्षेत स्थापित केल्यानंतर रॉकेटचा शेवटचा टप्पा नियोजितरीत्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणला. त्यामुळे तो दीर्घकाळ अंतराळात कचरा म्हणून फिरत राहिला नाही. याशिवाय, मेघा-ट्रॉपिक्स-1 उपग्रहाला सुरक्षितपणे पृथ्वीच्या वातावरणात आणून त्याचे प्रशांत महासागरावर विघटन करण्यात आले. ही मोहीम जगभरात कौतुकास्पद ठरली. भारताने उपग्रहांचे आयुष्य संपल्यानंतर त्यांचे नियोजित विसर्जन करण्याची जबाबदार भूमिका स्वीकारली आहे. अंतराळ कचरा हटविण्यासाठी अनेक देश व खासगी कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत आहेत. यात विशेष जाळे (नेट) वापरून कचरा पकडणे, चुंबकीय प्रणालींचा वापर, सौर पाल, इलेक्ट्रोडायनामिक टेथर, लेझर तंत्रज्ञान, रोबोटिक हात यांसारख्या तंत्रज्ञानांवर संशोधन सुरू आहे.

The Growing Crisis of Space Debris: A New Challenge for Earth’s Future

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

20 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

20 hours ago