संपादकीय

नेतृत्व बदलले, परिस्थिती बदलेल का?

– अश्विनी पांडे

काँग्रेसने संघटना सृजन अभियान राबवत नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न करत संघटनात्मक बदल केले. शहराध्यक्षपदी नीलेश खैरे यांची नियुक्ती केली. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत घरघर लागलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या अतिशय वाईट झालेली आहे. नाशिकमध्ये संघटनात्मक बांधणीपेक्षा गटातटातच पक्ष विखुरला गेला आहे. त्यामुळे पक्षाचा पाया भुसभुशीत झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रभारी असलेल्या शहराध्यक्षपदावर आता नीलेश खैरे यांची नियुक्ती झाली आहे. काल त्यांचा पदग्रहण सोहळाही पार पडला. नाशिक शहरातील काँग्रेसने संघटनेचे नेतृत्व बदलले, त्यामुळे संघटनेची परिस्थिती बदलेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ ही केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नाही, तर ती संघटनात्मक कमकुवतपणाचे प्रतीक म्हणून पाहिली जात गेली.. या पाश्वर्र्भूमीवर काँग्रेसने संघटन सृजन अभियान राबवत नव्याने उभारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, नाशिक शहरात पक्षांतर्गत बदल करत शहराध्यक्षपदी नीलेश उर्फ बबलू खैरे यांची नियुक्ती केली.त्यामुळे पक्षाला उभारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी पक्षातील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. नीलेश खैरे यांनी शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन केले. पण या आंदोलनातही गटबाजीचे दर्शनच घडल्याने सरकारविरोधात लढण्यापेक्षा स्वपक्षातील मंडळींविरोधात पहिले युद्ध जिंकावे लागेल की काय? अशी परिस्थिती आहे. कारण पक्षाकडून आंदोलन सुरू असताना काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, शरद आहेर किंवा नगरसेवकांनीही पाठ फिरविल्याने गटबाजीचे दर्शन घडले. यापूर्वीही नूतन शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी आंदोलन केले, त्यावेळेस अनेक नेत्यांनी पाठ फिरविली होती. शनिवारी खैरे यांच्या पदग्रहण समारंभालादेखील माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी पाठ फिरवली. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीत होतो, असे स्पष्टीकरण छाजेड यांच्याकडून देण्यात आले.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील पराभवामुळे पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी आता संघटन सृजन अभियानच्या माध्यमातून नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये या अभियानामुळे नवचैतन्य निर्माण झाले. सद्य सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहता, प्रबळ विरोधी पक्षाची आवश्यकता एव्हाना विरोधी पक्षासाठी मोठी स्पेस निर्माण झाली आहे. मात्र, ही स्पेस भरून काढण्याची काँग्रेसकडे संधी आहे, मात्र त्यासाठी पक्षांतर्गत गटबाजी दूर करत पक्षाला उभारी दिली तर काँग्रेस येत्या काळात निश्चितच प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आपले अस्तित्व अधोरेखित करू शकेल. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसमधील गटबाजी हा सर्वांत मोठा अडसर ठरत आहे. शहरात एखादा वरिष्ठ नेता भेटीवर आला की, सर्व गट एकत्र येऊन एकजूट दाखवतात, परंतु कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा मतभेद उफाळून येतात. स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव, नेतृत्वातील मतभेद आणि वैयक्तिक स्वार्थ यामुळे संघटनात्मक कामकाजात सातत्य राहत नाही. या परिस्थितीचा परिणाम थेट पक्षाच्या कामगिरीवर होत असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि निराशा निर्माण होत आहे.
नाशिक शहरातील सध्याची परिस्थिती पाहता विरोधी पक्षासाठी मोठी राजकीय संधी निर्माण झाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, सुरू असलेली खोदकामे, विस्कळीत पाणीपुरवठा या समस्या नागरिकांच्या रोजच्या जीवनावर परिणाम करत आहेत. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, वाढती गुन्हेगारी, भोंदूगिरी आणि विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडून आक्रमक आणि प्रभावी भूमिका अपेक्षित आहे. मात्र, सध्याच्या घडीला निवेदन देण्यापुरतीच भूमिका मर्यादित राहिल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे करण्यात काँग्रेस अपयशी ठरत असल्याची टीका वारंवार केली जाते. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढण्याची परंपरा असलेल्या काँग्रेसकडून अशी निष्क्रियता पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरत आहे. 2014 नंतरच्या ‘मोदी लाटे’मुळे काँग्रेसची राजकीय घसरण झाली असली, तरी पक्षाचा परंपरागत मतदारवर्ग आजही कायम आहे. हा मतदारवर्ग पक्षाशी भावनिकदृष्ट्या जोडलेला असून, योग्य नेतृत्व आणि आक्रमक भूमिका घेतल्यास तो पुन्हा सक्रिय होऊ शकतो. त्यामुळेच सध्याची परिस्थिती काँग्रेससाठी केवळ आव्हान नाही, तर एक मोठी संधीही आहे. या संधीचे सोनं करण्यासाठी काँग्रेसने केवळ संघटनात्मक बदलांवर भर देणे पुरेसे ठरणार नाही. जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे, प्रभावी जनआंदोलन उभे करणे आणि स्थानिक पातळीवर नेतृत्व विकसित करणे गरजेचे आहे. यासोबतच पक्षातील गटबाजी कमी करून सर्व स्तरांवर समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे.
नेतृत्वाचे बदल पक्षाला उभारी देणारे ठरू शकते. मात्र, गटबाजीवर नियंत्रण, प्रभावी नेतृत्व, जनतेशी सातत्यपूर्ण संवाद आणि आक्रमक भूमिका या चार गोष्टींची सांगड घातली तरच काँग्रेस पुन्हा एकदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून पुढे येऊ शकते. अन्यथा, संधी असूनही पक्षाला अपेक्षित उभारी मिळणे कठीण ठरेल. त्यामुळे सद्यस्थितीत नेतृत्व बदलले, परिस्थिती बदलणार का, अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

The leadership has changed, will the situation change?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

20 minutes ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

29 minutes ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

34 minutes ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

41 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

48 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

1 hour ago