विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया राबवा

मनपा पाठवणार विभागीय आयुक्तांना पत्र

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेची निवडणूक जानेवारीत झाल्यानंतर ऑगस्टमध्ये महिला व बालकल्याण समिती, शहर सुधार समिती, वैद्यकीय सहाय्य समिती, विधी समिती व शिक्षण समितीवर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सदस्यांची महासभेत नियुक्ती केली होती. दरम्यान, या समित्यांचा कारभार चालवण्यासाठी सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक घ्यायची असल्याने या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी महापालिका विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून करणार आहे.
प्रत्येक समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाचही समित्यांवर भाजपचा दबदबा दिसला. नऊपैकी पाच सदस्य एकट्या भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपच्या ताब्यात या पाचही समित्या जाणार आहेत. दरम्यान, या समित्यांत सभापतिपदासाठी संधी मिळावी, याकरिता काहींनी प्रयत्न सुरू केले आहेत. विषय समिती निवडणूक आतापर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, ही प्रक्रिया लांबवल्याची भावना भाजप नगरसेवकांत आहे. या समित्यांद्वारे शहरातील शिक्षण, आरोग्य, महिला या विभागांद्वारे प्रश्न सोडवले जातात. दरम्यान, या विभागांना कारभारी मिळावा याकरिता महापालिका प्रशासन विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करणार आहे. त्यानंतर लवकरच विषय समित्यांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेता, सभागृह नेता नियुक्तीला ब्रेक
एकीकडे विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन तयारी करत असताना दुसरीकडे मात्र विरोधी पक्षनेता व सभागृह नेता या पदांच्या नियुक्तीला ब्रेक दिल्याचे चित्र आहे. विरोधी बाकावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक 15 सदस्य असून, त्यांनी यापूर्वीच विरोधी पक्षनेत्याची नियुक्तीसाठी पत्रही दिले आहे. पण महापौरांकडून सभागृहातील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीला हिरवा कंदील दिलेला नाही. सभागृहनेतेपददेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, या पदावर कोणा एकाची नियुक्ती केल्यास यावरून भाजपअंतर्गत गटबाजी उफाळण्याची भीती पक्षाला आहे. त्यामुळे सध्या सभागृह नेतापदाबरोबरच विरोधी पक्षनेत्याला रेड सिग्नल दिला आहे. ही पदे केवळ राजकीय नसून माहराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 अ‍ॅक्ट या कायद्यानुसार या पदांना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

निवडणूक बिनविरोध होणार
महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 72 नगरसेवक असल्याने महापौरपदी हिमगौरी आहेर-आडके यांची बिनविरोध निवड झाली, त्यानंतर स्थायी समितीत भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने स्थायीचीदेखील निवडणूक बिनविरोध झाली. यानंतर आता पाच विषय समित्यांच्या निवडणुकीतही भाजपचे प्रत्येक समितीत पाच सदस्य असून, बहुमताचा तेवढाच आकडा आहे. त्यामुळे या समित्यांत भाजपचा वरचष्मा असेल. शिंदेसेना सत्तेत असल्याने त्यांना कदाचित दोन ते तीन समित्यांमध्ये भाजप संधी देण्याची शक्यता आहे..

सभागृह नेत्याचे कार्य
हा सत्ताधारी पक्षाचा किंवा महापालिकेत सर्वाधिक बहुमत असलेल्या गटाचा मुख्य नेता असतो, जो महापालिकेच्या सभेत सत्ताधारी पक्षाचे धोरण स्पष्ट करतो.

विरोधी पक्षनेत्याचे कार्य
हा महापालिकेतील विरोधी पक्षांमधील सवार्ंत मोठ्या गटाचा किंवा पक्षाचा मान्यताप्राप्त नेता असतो. महापौरांनी नियमांनुसार व पक्षीय बलाबल पाहून या पदावर अधिकृत मान्यता देणे आवश्यक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *