संपादकीय

महापुरामुळे जुन्या आठवणींना उजाळा

– आनंदा जाधव

सन 1969 च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर जिल्हाभरात अतिवृष्टी झाली. परिणामी, 9/9/1969 ला गोदावरी, दारणा आणि कादवा नद्यांना महापूर आला होता, त्यावेळी सर्वच गावच्या अनेक घरांची पडझड झाली होती. त्यावेळी नांदूरमध्यमेश्वर धरणाला आजच्या सारखे वक्राकार गेट नव्हते. पुराचे पाणी बंधार्‍यांच्या भिंतीवरून थेट नदीपात्रात पडत होते. या पडणार्‍या पाण्याचा आवाज परिसराच्या 10 कि. मी. अंतरापर्यंत येत असे. नदीपात्रातील पाण्याचा वेग जास्त असल्याने बंधारा बांधतेवेळी धरणाच्या दोन्ही बाजूने मातीचा भरावा टाकण्यात आला होता. अगदी आत्ताच्या शिवरे गावापर्यंत अजूनही हा भरावा आपले अस्तित्व टिकून आहे. अगदी 20/25 फूट उंचीचा असणारा हा भरावा त्यावेळी या पुराच्या पाण्यामुळे फुटल्याने त्यावेळी असलेले जळगाव आणि शिवरे गावात पुराचे पाणी घुसल्याने या गावांतील घरे वाहून गेली होती. परिणामी, त्यावेळी या दोन्ही गावांचे नव्याने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. आज ही जी गावे आहेत ती त्यावेळी स्थलांतरित केलेल्या जागेवर आहेत, त्यावेळी या पुरात घरांची सागवानी लाकडे, संसारोपयोगी साहित्य, झाडे, जनावरे आणि माणसेदेखील वाहताना आजच्या वयोवृद्ध माणसांनी पाहिली होती, अनेक टपर्‍यादेखील पुरात वाहून आल्या होत्या. त्यावेळी आलेल्या महापुरात गोदाकाठच्या गावांची सर्वाधिक हानी झाली होती.
नांदूरमध्यमेश्वरची मृगव्याधेश्वर, शनिमंदिर तसेच खानगावथडी बाजूकडील पुरातन गणपती मंदिरदेखील या पुराच्या पाण्यात बुडाले होते. या मंदिराचे कळस तेवढे दिसत होते, पुराचे पाणी थोडे कमी झाल्यानंतर मृगव्याधेश्वर मंदिराजवळ असलेल्या काशी पारजवळ गावातील महिला-पुरुष स्नानासाठी जात. कारण या ठिकाणी स्नान केल्याने काशीइतके पुण्य मिळते, असे मानले जात असे. कारण या मंदिरापासून नदीचे पात्र जवळपास अर्धा कि. मी. अंतरावर आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की, जेव्हा जेव्हा गोदावरी, दारणेला महापूर येतो. त्या प्रत्येकवेळी नदीकाठच्या नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. किमान दोन-तीन वर्षार्ंआड सायखेडा, चांदोरी या दोन गावांत तर हमखास पाणी शिरते. याबरोबरच कोठुरे, चापडगाव, शिंगवे, मांजरगाव, नांदूरमध्यमेश्वर, गोंडेगाव, करंजगाव, कुरुडगाव, काथरगाव या गावांनादेखील कमी-अधिक प्रमाणात या पुराचा फटका बसतो. या गावांतील पिके पुराच्या पाण्याखाली जाऊन हातात आलेले पीक वाया जाते. आता पूर ओसरू लागला असला तरी चिखल आणि दलदलीमुळे रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो. परिणामी, आरोग्यसेवेवर मोठा ताण येतो. कारण आरोग्य कर्मचारी डॉक्टर हे या ठिकाणी तळ ठोकून असतात. घरनिहाय नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करावी लागते. येथील पाणी पिण्यालायक राहत नाही. परिणामी, बाहेरून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा लागतो. डासांचे प्रमाण वाढल्याने डास निर्मूलन मोहीम राबवावी लागते. साहजिकच यामुळे प्रशासनावर आणि स्थानिक रहिवाशांवर मोठा ताण पडतो.
या सर्व संकटावर मात करण्यासाठी जसे 1969 मध्ये जळगाव आणि शिवरे गावाचे महापुरामुळे स्थलांतर करावे लागले. त्याच धर्तीवर चांदोरी आणि सायखेडा गावाचे पुनर्वसन केले तर अशा घटनांना पुन्हा पुन्हा सामोरे जावे लागणार नाही. मात्र, असा निर्णय घेऊन त्याची ठोस कार्यवाही करण्यासाठी सरकारने तत्परता दाखवून त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. अन्यथा नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे पूर आला की पुन्हा प्रशासन आणि अधिकारी, पदाधिकारी यांची धावपळ ठरलेली. आणि नागरिकांचे होणारे हालदेखील ठरलेले. त्यामुळे अशा महापुरातून सरकारने काहीतरी बोध घेणे गरजेचे आहे. तसेच नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांना उंची द्यावी. आणि नव्याने बांधकाम करावयाच्या पुलांचीदेखील अशा प्रकारे खबरदारी घेतली तर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणार नाही.
तसेच सरकारने नदी, नाले, तलाव यांची सीमा/हद्द तसेच पूर नियंत्रण रेषा निश्चित करून या जागेत घरे बांधता येणार नाही. तसेच या जागेत राहणारे रहिवासी यांच्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने जागा देऊन असा कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शेतजमिनीदेखील एकदम नदीकाठावर येणार नाही याची खबरदारी घेऊन महापुरावेळी गोदाकाठलगत असणार्‍या प्रत्येक गावात ग्रामपंचायतीने भोंगे बसवावे. जेणेकरून या आपत्तीची सूचना देऊन नागरिकांना सावध करता येईल. जसे की मागील आठवड्यात नांदूरमध्यमेश्वर येथे गोदावरी नदीपात्रातील बेटावर 25 नागरिक अडकले होते. कदाचित धरणातून पाणी सोडण्यापूर्वी हा भोंगा वाजला असता तर अशी आपत्ती टळू शकली असती. त्यामुळे या महापुरातून सरकार प्रशासन आणि पदाधिकारी यांनी काहीतरी बोध घेणे गरजेचे आहे.

The massive floods revived old memories.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago