संपादकीय

आयुष्यातील खरा ‘नायक’

– संकलन : देवयानी सोनार, अश्विनी पांडे

आईच्या मायेबद्दल भरभरुन बोलले जाते. पण, वडिलांचे प्रेम अनेकदा त्यांच्या कृतीतूनच व्यक्त होत असते. परिवाराच्या सुखासाठी स्वत:च्या इच्छांचा बळी देत आयुष्यभर झटणारा, संकटात कुटुंबाचा आधारस्तंभ बनणारा आणि मुलांच्या यशात स्वत:चे समाधान शोधणारा बाबा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खरा नायक असतो. बदलत्या काळात वडिलांची भूमिका केवळ कर्ता पुरुष अशीच मर्यादित न राहता, मार्गदर्शक, मित्र आणि भावनिक आधार देणारा पालक म्हणूनही व्यापक झाली आहे. अशा या निःस्वार्थी, प्रेमळ, कष्टाळू बाबांबद्दल त्यांच्या मुलांनी व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना त्यांच्याच शब्दांत…

मूल्यांची शिदोरी देणारे माझे वडील

ज्येष्ठ विधिज्ञ आणि सरकारी अभियोक्ता बाबूराव गणपतराव ठाकरे हे माझ्या आयुष्यातील पहिले गुरू, प्रेरणास्थान आणि नैतिकतेचे भक्कम अधिष्ठान आहेत. त्यांनी दिलेले संस्कार, शिकवलेली मूल्ये आणि जगण्याची दृष्टी आजही माझ्या प्रत्येक निर्णयामागे मार्गदर्शक शक्ती म्हणून उभी आहे. वडिलांनी मला दिलेला सर्वांत मोठा धडा म्हणजे प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठा. ते नेहमी सांगायचे, कठीण प्रसंगातही सत्याचा मार्ग सोडू नको. सरकारी अभियोक्ता म्हणून त्यांनी आयुष्यभर न्यायव्यवस्थेची निष्ठेने सेवा केली. त्यांचे काम पाहताना मला समजले की पद, पैसा किंवा प्रतिष्ठेपेक्षा माणसाची सचोटी अधिक महत्त्वाची असते. वक्तशीरपणा, कडक शिस्त, खोट्याची चीड आणि सत्याचा आग्रह ही त्यांची बलस्थाने होती. व्यक्तिगत आयुष्य, सामाजिक बांधिलकी आणि विविध संस्थात्मक जबाबदार्‍या सांभाळताना ‘वडील’ ही भूमिका मला अत्यंत महत्त्वाची वाटते. वडील म्हणजे केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नसून, पुढील पिढीचे व्यक्तिमत्त्व घडवणारा शिल्पकार असतो.
मुलांना केवळ सुविधा देणे पुरेसे नसते; त्यांना योग्य दिशा, मूल्यांची जाणीव आणि समाजाप्रति उत्तरदायित्वाची भावना देणे अधिक आवश्यक असते.चांगले नागरिक घडवण्यासाठी वडिलांची भूमिका आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांसमोर अनेक संधी आहेत; मात्र त्याचबरोबर अनेक आव्हानेही आहेत. अशा काळात वडिलांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. मुलांना शिस्त, कर्तव्यभावना, संवेदनशीलता आणि सामाजिक भान देण्याचे कार्य वडिलांनीच प्रभावीपणे करावे लागते. मुलांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांचे विचार समजून घेणे आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगणे ही आजची गरज आहे. चांगले नागरिक घडवण्याची प्रक्रिया घरातूनच सुरू होते.एक आठवण, जी आयुष्यभर सोबत राहिली, दादासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे एक प्रेरणादायी ग्रंथच आहे. त्यांच्या आणि आक्कांच्या संस्कारांत आम्ही भावंडे घडलोच; पण वकिली क्षेत्रातील आणि मविप्र समाजातील अनेक पिढ्यांनाही त्यांनी घडवले. माझ्या बालपणातील एक प्रसंग आजही मनात कोरलेला आहे. एका खटल्यासंदर्भात काही प्रभावशाली व्यक्तींंनी वडिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता न्यायाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. त्या प्रसंगाने मला शिकवले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये. मविप्र समाजाच्या माध्यमातून गावोगावी आणि खेडोपाड्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी दादासाहेबांनी आयुष्यभर अक्षरशः झटून काम केले. त्यांचे कार्य आणि विचार आजही मला प्रत्येक पावलावर प्रेरणा देतात.वडील हे केवळ शिस्त लावणारे नसून, विश्वासू मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून मुलांच्या आयुष्यात उभे राहिले पाहिजेत. ‘फादर्स डे’ हा केवळ शुभेच्छांचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणार्‍या वडिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज मी जे काही आहे, त्यामागे माझ्या वडिलांनी दिलेले संस्कार, त्यांचे कष्ट, त्याग आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या स्मृती, त्यांचे विचार आणि त्यांचे आदर्श हेच माझ्यासाठी खरे प्रेरणास्थान आहेत.

– अ‍ॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

वडीलच आयुष्याचे शिल्पकार

‘फादर्स डे’च्या निमित्ताने अंबर ग्रुपचे संचालक राम बुधाजी पानसरे आणि राजेंद्र बुधाजी पानसरे यांनी आपल्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त करत त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाला उजाळा दिला आहे. शिक्षणापेक्षा जिद्द, कष्ट आणि दूरदृष्टी महत्त्वाची असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपले वडील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या त्यांच्या वडिलांनी आयुष्याची पहिली 50 वर्षे शेतीत घालवली. व्यवसायाचा कोणताही अनुभव नसतानाही माझ्या मुलांनी नोकरी करणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे मालक व्हावे, हे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगले.
याच जिद्दीच्या जोरावर वयाच्या पन्नाशीत त्यांनी शेतीबरोबरच व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, अपयश आणि संघर्षांना सामोरे जात त्यांनी व्यवसाय उभा केला. कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर त्यांनी छोट्या उद्योगाचे रूपांतर आजच्या अंबर ग्रुपमध्ये केले. विशेष म्हणजे, वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्यातील ऊर्जा आणि नवीन प्रयोग करण्याची जिद्द कायम असल्याचे पानसरे बंधूंनी नमूद केले. आजही त्यांच्यात नवीन कल्पना राबविण्याची आणि व्यवसाय अधिक उंचीवर नेण्याची तीच आग आहे. हीच आम्हा दोघा भावांची खरी प्रेरणा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. छोट्याशा रोपट्याचे अंबर ग्रुप या वटवृक्षात रूपांतर करणारे माळी म्हणजे आमचे दादा आहेत. शेतीतून उद्योग क्षेत्राकडे संपूर्ण कुटुंबाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी आयुष्याची 75 वर्षे खर्ची घातली, अशा शब्दांत त्यांनी वडिलांच्या योगदानाचा गौरव केला.
दादा, तुम्ही फक्त आमचे वडील नाही तर आमचे मार्गदर्शक, आदर्श आणि आयुष्याचे शिल्पकार आहात, असे म्हणत राम पानसरे, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि संपूर्ण अंबर ग्रुप परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

– राजेंद्र पानसरे, आयमा अध्यक्ष

वडिलांच्या संस्कारांमुळेच यशाचा प्रवास शक्य

‘फादर्स डे’च्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी आपल्या वडिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या संघर्ष, त्याग आणि संस्कारांना उजाळा दिला आहे. सामाजिक माध्यमांवर व्यक्त केलेल्या भावनांमधून त्यांनी आपल्या यशामागील खरे शिल्पकार म्हणून वडिलांचा गौरव केला.
राजपूत यांनी सांगितले की जळगाव जिल्ह्यातील यावल येथील एका छोट्या फोटोग्राफी स्टुडिओत त्यांच्या वडिलांनी त्यांना कष्ट, प्रामाणिकपणा आणि निष्ठेचे धडे दिले. स्वतः व्यवसाय उभा करताना त्यांनी केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळली नाही, तर आईलाही व्यवसायात सक्षम करून पुरोगामी विचारांचा आदर्श घालून दिला.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणासाठी पुण्यात पाठविण्याचा निर्णय वडिलांनी घेतला. त्या काळातील त्याग आणि दूरदृष्टीमुळेच आज प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून समाजासाठी काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
आज प्रशासकीय अधिकारी म्हणून मी जे काही काम करतोय, ती केवळ माझ्या वडिलांनी रुजवलेल्या मूल्यांची आणि दिलेल्या प्रेरणेची ताकद आहे, असे सांगत राजपूत यांनी आपल्या जडणघडणीचे संपूर्ण श्रेय वडिलांना दिले.
फादर्स डेच्या निमित्ताने व्यक्त केलेल्या या भावना वडिलांच्या कष्टांचे, त्यागाचे व मुलांच्या आयुष्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. बाबांना फादर्स डेच्या शुभेच्छा!

– रोहितकुमार राजपूत निवासी उपजिल्हाधिकारी

माझ्या पंखांना बळकट आधार देणारे बाबा

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपले वडील आशिष मोहन प्रसाद यांच्याविषयीच्या भावना एका भावस्पर्शी कवितेतून व्यक्त केल्या आहेत. खाकी वर्दीतील शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि मुलांप्रति असलेले प्रेम, माया व मार्गदर्शन त्यांनी कवितेत मांडले आहे.
‘खाकी वर्दीतील कडक शिस्त, पण मनात मायेचा अथांग सागर’ अशा ओळींनी सुरू होणार्‍या या कवितेत आयुष प्रसाद यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत वडील आशिष मोहन प्रसाद यांचे योगदान अधोरेखित केले आहे. अभ्यास, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी प्रोत्साहन देत आत्मविश्वास वाढविणारे वडील हेच आपल्या यशामागील खरे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. स्वप्ने फक्त पाहायची नसतात, ती जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पूर्ण करायची असतात, हा जीवनमंत्र वडील आशिष मोहन प्रसाद यांनी दिल्याचे आयुष प्रसाद यांनी कवितेत म्हटले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याला योग्य दिशा मिळाली आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांचे पाठबळ लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
वडिलांप्रति आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या कवितेत असे आहेत माझे बाबा, आशिष मोहन प्रसाद ! यातून वडिलांबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे. माझ्या पंखांना खरा बळकट आधार देणारे बाबा, असे म्हणत आयुष प्रसाद यांनी आपल्या यशाचे श्रेय वडिलांच्या संस्कारांना दिले आहे.

– आयुष प्रसाद जिल्हाधिकारी

मूल्यांशी तडजोड नको, वडिलांची शिकवण

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आपले वडील मधुकर पवार यांनी दिलेले संस्कार आणि मूल्यांची जपवणूक करत प्रशासकीय सेवेत वाटचाल करीत आहेत. फादर्स डेनिमित्त वडिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी आपल्या भावना
व्यक्त केल्या.
सीईओ ओमकार पवार म्हणतात की, माझ्या आयुष्यात वडिलांचे स्थान हे केवळ पालकांचे नाही, तर मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहे. आज मी ज्या पदावर आहे, तिथे पोचण्यासाठी त्यांनी केलेला त्याग आणि दिलेला आधार याची मला कायम
जाणीव आहे.
प्रशासकीय सेवेत काम करताना जबाबदार्‍या मोठ्या असतात; परंतु कुटुंब हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि प्राधान्यक्रम निश्चित करणे आवश्यक ठरते. माझ्या मते, कुटुंबासोबत घालवलेला वेळ हा वेळेच्या प्रमाणावर नाही, तर त्याच्या गुणवत्तेवर असतो. त्यामुळे कामाच्या व्यापातही कुटुंबासाठी वेळ देण्याचा
प्रयत्न करतो.
वडिलांची एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. पाचवीत असताना वडिलांनी मला एक साधा, पण आयुष्यभरासाठी पुरेल असा सल्ला दिला. तो कायम स्मरणात आहे. तो म्हणजे, आयुष्यात कोणतेही व्यसन करू नको. त्याचबरोबर प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांची शिकवण देत कोणत्याही परिस्थितीत योग्य गोष्टींची बाजू घे. मूल्यांशी तडजोड करू नये, हा संस्कार आजही प्रत्येक निर्णयात मला मार्गदर्शन करतो, असे पवार सांगतात.
वडिलांची आठवण सांगताना पवार म्हणतात, मी लहान असताना शेतीची कामे करताना किंवा गावातील दैनंदिन संघर्षांना सामोरे जाताना त्यांना जवळून पाहिले आहे. कोणतीही तक्रार न करता कुटुंबासाठी अहोरात्र मेहनत करणारा माणूस म्हणजे वडील. हे त्या वयातच समजले होते. या अनुभवांनीच मला आजही
जमिनीशी जोडून ठेवले आहे.
आजच्या काळात मुलांना केवळ चांगले शिक्षण देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यासोबत संवाद साधणे. त्यांच्या भावना समजून घेणे आणि योग्य मूल्यांचे संस्कार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांनी केवळ यशस्वी होण्यापेक्षा चांगले नागरिक आणि चांगले माणूस बनावे. त्यासाठी वडिलांनी मुलाना वेळ देत चांगले संस्कार देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील पालकांमध्येही आता सकारात्मक बदल दिसत आहेत. पूर्वी वडिलांची भूमिका मुख्यतः आर्थिक जबाबदार्‍यांपुरती मर्यादित मानली जात होती. आता अनेकांचे वडील मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात सक्रिय सहभाग घेताना दिसतात. जिल्हा परिषदेमार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबविताना पालकांचा विशेषतः वडिलांचा वाढता सहभाग उल्लेखनीय आहे.
एक चांगला पिता आणि चांगला प्रशासक यांच्यात संवेदनशीलता, संयम, जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णयक्षमता हे गुण समान असतात. जसा एक चांगला पिता आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करतो, तसेच एक चांगला प्रशासक समाजाच्या हिताचा विचार करतो. दोघांच्याही केंद्रस्थानी विश्वास आणि लोकांप्रति असलेली बांधिलकी असते. हे समान गुण असतात.
ओमकार मधुकर पवार (आयएएस) नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 2022 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी असलेले पवार यांनी ऑगस्ट 2025 मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची सूत्रे स्वीकारली.

– ओमकार पवार जि.प. सीईओ

The true ‘hero’ of life

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago