संपादकीय

नाशिककरांची वाट खडतरच…!

शहरात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, नाशिकमधील जनजीवन उष्णतेच्या लाटेने अक्षरश: होरपळत आहे. नाशिककरांना एकीकडे निसर्गनिर्मित समस्येला तोंड द्यावे लागत असताना, दुसरीकडे मात्र महापालिकेने शहरभर खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नाशिककरांचे मार्गक्रमण कठीण होऊन बसले आहे. दररोज याच प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याने शहरातील परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. एकाचवेळी रस्त्यांची कामे हाती घेतल्याने आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे म्हणावे लागेल. एकाचवेळी संपूर्ण रस्त्यांच्या कामांऐवजी टप्प्याटप्प्याने काम करणे शक्य नव्हते का, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. नागरिकांचे हाल होत असताना सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्ष मूग गिळून बसला आहे. शिंदेसेनेने रस्तेकामाच्या संथगतीवरून सवाल उपस्थित केले. ठाकरे सेना विरोधात असताना त्यांचा आवाज कुठे खुंटलाय, असा सवाल उपस्थित होतोय. – गोरख काळे

दीड वर्षावर सिंहस्थ कुंभमेळा आला आहे. प्रशासनाने शहरातील रस्ते, पूल व घाटबांधणीचे काम हाती घेतले आहे. यात नागरिकांचा दैनंदिन संबंध थेट रस्त्यांंशी येतो. ऑफिसला जाण्यासह विविध कारणांसाठी दररोज बाहेर पडणारे लाखो नाशिककर ज्या रस्त्यांचा वापर करायचे, त्यातील सर्वच रस्ते फोडण्यात आले आहेत. प्रशासनाने काही ठिकाणी कामे सुरू असलेल्या रस्त्याच्याच बाजूच्या लेनचा पर्याय वाहनधारकांना दिला आहे. जसा की, जिल्हा रुग्णालयासमोरून जाणार्‍या रस्त्याचे काम हाती घेताना एका लेनचे घेण्यात आले आहे. दुसर्‍या लेनवर दोन्ही बाजूंची वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, यावेळी पर्यायी रस्त्याचा वापर करताना नित्याने प्रचंड वाहतूक कोंडी तर होतेच आहे. शिवाय, खोदलेल्या रस्त्याची धूळ शेजारच्याच वाहतुकीच्या रस्त्यावर आल्याने सर्वत्र धुळीचे लोट हवेत उडत आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांना त्रास सोसावा लागत आहे. यातून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. होणार्‍या धोक्याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. अशीच परिस्थिती द्वारका परिसरासह सर्वत्र आहे. रस्तेकामे पूर्ण करण्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी एमएनजीएल, बीएसएनएलसह सहा प्रकारच्या यूटिलिटींना त्या-त्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. अद्याप याच केबल लाइन टाकण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे. परिणामी, रस्तेकामांना आणखी वेळ लागून त्याचा मनस्ताप नाशिककरांनाच सहन करावा लागणार आहे. नागरिकांचा सिंहस्थाच्या कामांना विरोध नाही. उलट हजारो कोटींच्या निधीतून शहराचा चेहरा बदलून विकासाच्या कामांना चाल यानिमित्ताने मिळते. पण एकाचवेळी रस्तेकाम हाती घेतल्याने पुरता बोजवारा उडाला आहे.
यात सर्वांत महत्त्वाची बाब अधोरेखित करावीशी वाटते की, राज्य शासनाने सिंहस्थ आराखड्याला लवकरच मंजुरी दिली असती तर सिंहस्थ प्राधिकरणांंतर्गत काम करत असलेल्या महापालिकेला रस्त्यांसह इतर कामे करण्यास वेळ मिळाला असता. मात्र, आराखड्यालाच उशिराने मंजुरी मिळाल्याने त्याचा फटका समस्त नाशिककरांना बसत आहे. शहरातील परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी अद्याप 11 महिने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागेल. मार्च 2027 ची डेडलाइन रस्तेकामांना दिली आहे. मुळात सिंहस्थ कामाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता उशिरा मिळाली. त्यानंतर निविदा प्रक्रियेत गेलेला वेळ याचाही फटका बसला, हे नाकारता येणार नाही.
सध्या नाशिककर दोन समस्यांनी खूप त्रासले आहेत. त्या म्हणजे, पाण्याची समस्या व खोदलेले रस्ते. महासभेत पाणीबाणीवर चर्चा होते, आरोप होतात. पण रस्त्यांवर कुठलीही चर्चा होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, महापौर हिमगौरी आडके यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेत अधिकार्‍यांची शाळा घेतली व त्यांचे चांगलेच कान टोचले. मात्र, दुसर्‍या बाजूला ज्या रस्त्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, त्या बांधकाम विभागाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसते. गेल्या वर्षी नाशिककरांना खड्ड्यांचा जो मनस्ताप सहन करावा लागला त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. आताही शहरातील विद्यमान स्थितीत कुठलीही सुधारणा झालेली नाही. बांधकाम विभागाला आता सिंहस्थ कामांचे निमित्त मिळाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाशिककरांना जो मनस्ताप सहन करावा लागणार आहे, त्यावर नेहमीप्रमाणे पांघरूण घातले जाईल.

The wait for Nashik residents is tough…!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

2 minutes ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

17 minutes ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

25 minutes ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

30 minutes ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

36 minutes ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

42 minutes ago