मुलींनो, मला एक कळत नाही. तुमच्यातल्याच काहींचा एवढ्या लवकर विश्वास बसतोच कसा मुलांवर? आणि तोही अगदी मर्यादा ओलांडल्या गेल्या तरीही!! तारूण्य म्हणजे काही अडीच-तीन तासांचा सिनेमा नाहीये. इथे या जगात बरोबर ऐनवेळी कुणी वाचवायलाही येणार नाही हिंदी सिनेमामध्ये दाखवतात तसं, तेव्हा तुमचं तुम्हीच ठरवायला हवं.. ‘अॅप्रोच’ व्हायचं किती नि कुठंवर…
अहं… अजिबात उपदेश देत नाहीये मी, खरंतर मागे एक बातमी वाचली आणि अंगावर काटा आला. घटना नाशिकची, येथील अक्षय राव नामक तरुणाने मुलींचे नग्न फोटो पोर्न साइटवर अपलोड केलेत. मुलींशी मैत्री करत त्यांना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याशी शारीरिक अश्लील चाळे करत त्याने हे कृत्य केलेय. मागेही नांदेडच्या एका युवतीची तीन मुलांसोबत मोबाइलद्वारे चित्रित केलेली चित्रफीत शहरभर मुलांच्या मोबाईलमध्ये जाऊन पोहचली होती. आशिष नावाच्या तरुणानेही दोन मुलींची अशीच ब्लू फिल्म तयार केली होती. तीही तेव्हा व्हॉट्सॲपद्वारे सर्वत्र पसरली होती. नक्की चाललंय तरी काय…??
विकृत मानसिकतेत नाही आता आता तर सहज म्हणून या गोष्टी व्हायला लागल्यात; पण मुलींनो ही ‘ पातळी ‘ गाठेपर्यंत तुम्ही मुलांवर विश्वास ठेवताच कसा तेच समजत नाहीये. मान्य.. तुमच्यावर तुमच्या वयाचा, आसपासच्या वातावरणाचा इफेक्ट होतोय. शिवाय विविध चॅनेल, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून सर्रास दाखवल्या जाणाऱ्या ओंगळवाण्या संस्कृतीचा प्रभावही तुमच्यावर पडतोच हेही मान्यः पण तरीही काही गोष्टी तुम्ही मनाशी पक्क्या ठरवायला हव्यात. आणि अगदीच तुमच्या स्वत:च्या मनाविरुध्द जाऊनही ‘नाही’ म्हणता यायला हवं तुम्हाला; पण काहींच्या बाबतीत होतंय ते नेमकं या उलट… त्यांचं स्वतःहून मुलांना ॲप्रोच होणं… ‘डायरेक्ट’ बोलणं… ग्रुपपमधल्या ‘डवल्स मिनिंग’ जोक्सला दाद देणं… त्यात त्यांच्या हिम्मत वाढवणाऱ्या मोबाइलवरच्या अनलिमिटेड मनमोकळ्या गप्पा… व्हॉट्सअपमुळे वाढणारं डेअरिंग… या सर्व गोष्टीही कुठेतरी त्यांच्यासोबत घडणाऱ्या असल्या घटनांबद्दल काही प्रमाणात जबाबदार आहेत. नाही.. तुमच्या प्रेमात पडण्यावर माझा अजिबात आक्षेप नाहीये. पण फक्त प्रेमात किती आणि कुठंवर झोकून द्यायचे याचे ‘लिमिटेशन’ हवं. “मुझे उसकी बाहोंमे सोना हे” असल्या असंख्य वेळा दाखवल्या जाणाऱ्या जाहिरात फक्त आणि फक्त त्यांचे प्रॉडक्ट्स विकण्यासाठी असतात हेही तुम्हाला वेळीच ‘क्लिक’ व्हायला हवे. अन् “मेरा सबकुछ सिर्फ तुम्हारा हे” असले हिंदी डायलॉग भावनेच्या भरात बोलायचे नसतात कारण त्या भावना ‘समजून’ घेणाऱ्यांपेक्षा भावनांचा ‘गैरफायदा’ घेणारेच इथे तुम्हाला सर्रास भेटतील. लक्षात घ्या.. चार चौघांमधून ‘तसल्या’ परिस्थितीत ‘त्याच्या’सोबत जातांना तोंडाला स्कार्फ बांधला म्हणजे प्रश्न सुटणार आहे का..? उलट त्यामुळेच प्रश्न वाढत आहेत अजून. कुणाला कदाचित त्यात “थ्रील” ही अनुभवायला मिळेल; पण एक गोष्ट लक्षात असू द्या. क्षणिक एन्जॉयमेंटची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते तुम्हाला. त्यामुळे मैत्रीत, प्रेमात मर्यादा या हव्याच… बघा एकदा नीट विचार करून…
– अमोल जगताप