आता धार्मिक सणवारांचे दिवस सुरू होत आहेत. सध्या गणेशोत्सवाचे वेध सगळ्यांना लागले आहेत. गोपाळकाला, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण-उत्सव येऊ घातले आहेत. धार्मिक सण-उत्सवात भव्यदिव्यतेचा अट्टाहास केला जातो. मात्र, अनेकदा चांगल्या वातावरणाला गालबोट लागते. गणेशमूर्तींचे आगमन होत असताना मुंबईत दुर्घटना घडली आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती पडून दोन जणांचा मृत्यू झाला आणि धार्मिक कामात विघ्न आले.
मूर्तींच्या उंंचीबाबत नाहक अट्टाहास धरला जातो, न्यायव्यवस्थेने मूर्तीच्या उंंचीबाबत निर्बंध घालून दिले असले, तरी ते पाळले जात नाही. दरवर्षी पीओपी मूर्तींचा प्रश्न ऐरणीवर येतो. वाद निर्माण होतो. मात्र, याबाबत अंतिम निर्णय होत नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावरच मंडप उभारण्यात येतात आणि नागरिकांना नाहक वेठीस धरले जाते. अनेक ठिकाणी वीजचोरी केली जाते. या सगळ्यात धार्मिक सण-उत्सव साजरा होत असताना यातील धार्मिक भावना, पावित्र्य न राहता याला केवळ थिल्लरपणाचे स्वरूप येते. अशीच परिस्थिती दहीहंडीबाबत आहे. किती थरांची दहीहंडी असावी याबाबत न्यायालयाने बंधने घालून दिली आहेत. त्याचबरोबर बालगोपाळांची दहीहंडी करताना सुरक्षेची काळजी घेतली गेली पाहिजे, यासाठी निर्बंध घालून दिले आहेत. त्याचबरोबर डीजेसारख्या कर्णकर्कश आवाजावरदेखील बंदी घातली आहे. ती एखादी दुर्घटना घडू नये आणि त्यात दुर्दैवी मृत्यू होऊ नये यासाठीच. मात्र, अशी बंधने घातली की, आमच्या सणांवरच बंदी का?, दहीहंडी काय काठीने फोडायची? असा प्रतिप्रश्न केला जातो. गेल्या काही वर्षांपासून अनेकदा आगमन मिरवणूक काढली जाते. यात तासन्तास वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांनाच वेठीस धरले जाते, हे कितपत योग्य आहे? सणवार उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत. मात्र, धार्मिक सण-उत्सव साजरे करताना धार्मिकता, भक्तिभावदेखील जपला गेला पाहिजे. दुर्दैवाने अलीकडच्या काळात धार्मिक सण-उत्सवांना बाजारीकरणाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे भव्यदिव्यतेचा अट्टाहास धरला जात आहे. धार्मिक ठिकाणांवर गर्दी नियोजनाचे मोठे आव्हान असते. गर्दीचे व्यवस्थापन चोखपणे होणे गरजेचे आहे.
गणेशोत्सव साजरा होत असताना अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषण होते. डीजे, डॉल्बीचा आवाज किती मर्यादेपर्यंत असावा याबाबत कोर्टाचे निर्देश आहेत. रहिवासी भागात 55-60 डेसिबलपर्यंत आवाज असावा. मात्र, अनेक ठिकाणी डीजेचा दणदणाट-लेझर 110 डेसिबलपर्यंत होता, अनेकांना याचा त्रास झाला. डीजेच्या दणदणाटात मिरवणूक जात असताना, छातीत धडधडणे, घरांच्या खिडकी, भिंती हादरणे, रक्तदाब वाढणे, कान, डोळे यावर दुष्परिणाम होतात, असे डॉक्टरांचेदेखील म्हणणे आहे.पोलीस सूचना देतात, न्यायालय आदेश देतात. मात्र, दुर्दैवाने त्याचे पालन करण्याची मानसिकता आणि इच्छाशक्ती कोणाचीच नाही, हा दरवर्षीचा अनुभव आहे.
रस्ते, चौक अडवून विनापरवाना मंडप उभारणे हा जणू हक्कच असल्याची भावना अनेकांची झाली आहे. वाहतूक कोंडी, जनतेची अडचण लक्षात घ्यावी अशी कोणाचीच मानसिकता नसते. ज्यांनी या गोष्टी वेळीच रोखायला हव्यात त्या पोलीस, प्रशासन यासारख्या यंत्रणा बघ्याची भूमिका घेतात. नंतर तोंडदेखल्या कारवाईचा फार्स केला जातो. राजकीय पक्ष, नेते केवळ मतपेटीचा विचार करून कठोर भूमिका घेत नाहीत. बालके, वृद्ध यांना काही त्रास होत असेल याचा विचार कोणाच्याही मनाला शिवत नाही. आपणच आपल्या धार्मिक सणांचे पावित्र्य, गांभीर्य राखत नसू तर इतरांना का दोष द्यायचा? अनेक मंडळे यानिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबवितात, हे स्वागतार्हच आहे. एकूणच अशा धार्मिक उत्सवांना आलेले बाजारीकरणाचे स्वरूप हे धार्मिक उत्सवाचे पावित्र्य नष्ट करतात, हे दुर्दैवी आहे. राज्यातील रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे हा कधीही न सुटणारा प्रश्न आहे. ही वास्तवता आहे हे नाकारता येत नाही. बाप्पाच्या आगमनाप्रसंगीच अशी घटना घडली हे दुःखदायक आहे. निदान भविष्यात तरी धार्मिक सण-उत्सव साजरे करताना भव्यदिव्यतेचा नाहक अट्टाहास नको.
To what extent is ‘grandeur and magnificence’ appropriate in religious festivals?
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…