विविध भागांतील नागरिक, वाहनधारकांचे हाल
वडाळागाव : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कल येथे पुणे बाजूकडे जाणार्या अंडरपासचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. द्वारका सर्कल येथे शहरातील चार प्रमुख रस्ते व सात उपरस्ते एकत्र येत असल्याने हा चौक नेहमीच वर्दळीचा असतो. मात्र अंडरपासच्या कामामुळे द्वारका चौकाकडे ये-जा करणार्या सर्व अवजड वाहने, खाजगी प्रवासी बसेस, एसटी बसेस तसेच सिटी लिंक बसेस यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे.
परिणामी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. द्वारका चौक बंद असल्याने वाहतूक रविशंकर मार्ग, वडाळागाव सर्कल, साईनाथ सिग्नल व परिसर, कलानगर सिग्नल, पाथर्डी गाव सर्कल, रहमतनगर, फेम सिग्नल, संत सावता माळी मार्ग, मुंबई नाका सर्कल, इंदिरानगर बोगदा डावीकडे वळून जॉगिंग ट्रॅक, हॉटेल एनराइज तसेच मदिना चौक, डीजीपीनगर सम्राट सिग्नल, शालिमार खडकाळी सिग्नल तसेच सारडा सर्कल या पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. मात्र, या सर्व मार्गांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने सतत वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने चालवत आहेत. कुठेही अचानक यू-टर्न, चुकीच्या बाजूने वाहने घुसवणे, सिग्नलचे नियम न पाळणे यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने तसेच अत्यावश्यक सेवांची वाहने कोंडीत अडकत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरदारवर्ग, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये व वाहनचालकांमध्ये वादविवादाचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या पर्यायी मार्गांवर तातडीने अधिक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, योग्य सूचना फलक लावावेत तसेच वाहतूक नियोजन अधिक शिस्तबद्ध करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अंडरपासचे काम सुरू असले तरी नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
Traffic congestion in the city due to Dwarka underpass
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…