संपादकीय

आदिवासी स्त्रिया आणि पितृसत्ता

– प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार

प्रत्येक समाजघटकाची आपली काही वैशिष्ट्ये (अंगभूत बलस्थाने, उणिवा/ कमतरता) असतात. प्रसिद्ध कवयित्री आणि पत्रकार जसिंता केरकट्टा यांच्या मते, आदिवासी समाजातही वरील दोन्ही घटक आढळून येतात. झारखंडमधील एका आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या जसिंता यांची यासंदर्भातील मांडणी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या देशातील आदिवासी समाज शोषणाच्या वर्चस्ववादी व्यवस्थेच्या विरोधात प्रत्येक पिढीत लढत राहिला. या विरोधात आपला आवाज मुखर करत राहिलेला आहे. पण इतका संघर्ष करूनही या समूहावरचा वर्चस्ववादी व्यवस्थेचा पगडा नष्ट झालेला नाहीये. जसिंता म्हणतात की, आदिवासी समाजाच्या स्त्रियांच्या परिस्थितीबाबत चर्चा करीत असताना या समाजाकडून जे शब्द उच्चारले जातात त्यांच्या अर्थाकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आदिवासी समाजातही पुरुष जेव्हा ‘समाज’ या शब्दाचा उपयोग करीत असतात तेव्हा याचा अर्थ ‘पुरुषांचा समाज’ असाच होतो. ते मनुष्य प्राण्याच्या अशा समाजाविषयी बोलत नाहीत ज्यात स्त्रियांचाही समावेश आहे. या ‘समाज’ शब्दामध्येदेखील आदिवासी स्त्रिया अनुल्लेखित असतात. जेव्हा एखादी आदिवासी व्यक्ती ‘पूर्वज’ शब्दाचा उल्लेख करत असते तेव्हा ती ‘पुरुष पूर्वजां’विषयीच बोलत असते, स्त्रियांविषयी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
आदिवासी समाजाच्या काही प्रथा-परंपरांमध्येही असे दिसून येते की पुरुष मंडळींच्या मृत्यूनंतर त्यांना पूर्वज समजण्यात येऊन त्यांच्या पार्थिवावर परंपरागत आणि विधिवत संस्कार केले जातात. त्यांच्यासाठी घरातील एखादी स्वतंत्र खोलीही देण्यात येते. घरातील या खोलीत पूर्वजांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. मात्र, झारखंडमधील मुंडा आदिवासी समाजात अशी प्रथा प्रचलित आहे की, ज्यात एखाद्या स्त्रीचे जर सासरी निधन झाले तर सासरी तिचे पार्थिव तिच्या गावातील घरातही ठेवायला सासरचे राजी नसतात. आपल्या मुलीचे पार्थिव घेऊन जायचा निरोप तिच्या माहेरच्या लोकांना सासरच्या लोकांकडून पाठवला जातो. माहेरची मंडळी सासरी येतात आणि पूजा-अर्चा करून आपल्या मुलीचे पार्थिव परत घेऊन जातात. जर स्त्रीचे सासरी एखाद्या आजाराने निधन झाले असेल तर माहेरचे लोकसुद्धा तिच्या पार्थिवाला घरी घेऊन जात नाही. त्यांस आपल्या गावात आणून गावाच्या सीमेवर कुठे तरी टाकून देण्यात येते. स्त्रीच्या मृत्यूनंतरचे हे वर्तन किती अमानुष आहे.
बदलत्या काळात आदिवासी समाजातील काही शिक्षित लोकं या प्रथेला आपल्या कुटुंबातील मृत स्त्रीचा अपमान समजतात. तसेच ती स्त्री जीवंत असताना तिने सासरी पार पाडलेल्या कर्तव्ये, जबाबदार्‍या आणि कुटुंबासाठी उपसलेल्या कष्टाची अवहेलना मानतात. यामुळे वैयक्तिक निर्णय म्हणून काही लोक स्त्रीच्या पार्थिवाला माहेरी पाठवण्यास विरोधही करत असतात. काही गावांमध्ये अशा विरोधाची तुरळक उदाहरणे दिसून येतात. मात्र, आदिवासी समाजात आढळून येणार्‍या अशा प्रथा-परंपरा यातून आदिवासी समाजात स्त्रियांविषयी असलेला दृष्टीकोन स्पष्ट होतो. स्त्रिया जिवंत असतानाही त्यांचे कोणतेही घर नसते, ना माहेरी, ना सासरी, हे या अनुषंगाने लक्षात येते. कुठेही त्यांच्या नावे काही संपत्ती नसते आणि मरणानंतरही तिच्या पार्थिवासाठी एखादे घर, एखादी जागा नसते. म्हणून कधी-कधी अतिशय असहाय होऊन, सर्व हिंसा आणि दु:ख सोसून स्त्रिया प्रश्न विचारतात की या धरतीवर स्त्री चे घर असते तरी कुठे? जसिंता यांनी आदिवासी स्त्रीच्या वेदना, दु:ख, हालअपेष्टा, संघर्ष, व्यथा आपल्या कविता आणि कथांमधून अतिशय ताकदीने चितारल्या आहेत.
जसिंता यांच्यामते पितृसत्तेने सगळ्यात जास्त नुकसान कोणाचे केले असेल तर ते पुरुषांचे. प्रथमदर्शनी त्यांचे हे मत पटकन ध्यानात येत नाही. पण याचा खोलवर विचार केला तर याची सत्यता लक्षात येते. त्या म्हणतात, पितृसत्तात्मक संरचना सर्वात आधी पुरुषांमधील सुंदर मानवी गुणांना नष्ट करत असते. त्यांच्या आतल्या सौंदर्याची हळूहळू हत्या करून त्यांना निर्दयी, पाषाणहृदयी करते. जेणेकरून ते यंत्रासारखे भावनाशून्य होऊन अधिक कठोर होत जातील. असे पुरुष समाजात वावरत असताना स्त्रियांशीच नव्हे तर पुरुषांसोबतही माणूस म्हणून स्नेहाने वागू शकत नाही. देश आणि जगातील या विशाल पितृसत्तात्मक समाजाचा आदिवासी समाजावरही निश्चितपणे मोठा परिणाम झाला असल्याचे जसिंता म्हणतात. बाहेरील सामाजिक संरचनेच्या दबावामुळे, त्या समाजातील पुरुषांविषयी त्यांना असलेल्या भीतीमुळे ते आपल्या स्त्रियांवर हिंसा करायला प्रवृत्त होत असतात. आपल्या स्त्रियांची देखील त्यांना भय वाटत असते. आपली पूर्वापार चालत आलेली व्यवस्था कोसळते की काय, समाज विस्कळीत होतो की काय या भीतीने ते स्त्रियांवर हिंसा करून आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.
पुरुषांनी निर्माण केलेल्या जगात त्यांच्या व्यवस्थेला स्त्रिया विनाकारण बळी पडतात. यापासून अलिप्त राहण्यासाठी, पळून जाण्यासाठी त्यांना कोणताच मार्ग दिसून येत नाही. म्हणून या व्यवस्थेच्या कंडीशनिंग पासून स्त्रिया देखील लांब राहू शकत नाही आणि सतत याच व्यवस्थेच्या हत्यारांचा उपयोग स्वत:ला भक्कम करण्यासाठी, स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी, स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यासाठी स्त्रिया करत असतात. कधी-कधी त्या त्यांच्यापेक्षा कमकुवत स्त्रियांचे शोषणही करतात. आदिवासी समाजातही हे सर्व आढळून येते, ही जसिंता यांनी नोंदवलेली निरीक्षणे अस्वस्थ करणारी आहेत.
आदिवासी समाजाला आदिवासी स्त्रियांनी खूप भक्कम पाठबळ दिले आहे, यात दुमत नाही. त्या नेहमी शेत-शिवारांत काम करत असतात. शेतीचे काम संपल्यावर त्या जंगलात जाऊन पाने तोडणे, कोरडा लाकूड-फाटा आणणे अशी कामे करतात. घरात पैशांची तंगी असेल तर त्या शहरांत जाऊन मजुरी करतात. आकडेवारी सांगते की, देशातील इतर कोणत्याही समाजाच्या स्त्रियांपेक्षा आदिवासी स्त्रिया मोठ्या संख्येने मजूर म्हणून काम करतात. या सोबतच जमीन वाचवण्याच्या प्रत्येक आंदोलनात आदिवासी स्त्रियाच सगळ्यात जास्त ताकदीने लढताना दिसतात. स्त्रियांच्या सहभागामुळेच आदिवासी समाजाने अनेक चळवळी / आंदोलनांमध्ये यश मिळवले आहे. जमीन वाचवण्याच्या अनेक मोहिमांचे नेतृत्व आदिवासी स्त्रियाच करताना दिसून येतात. आदिवासी समाजासाठी एवढे काही करूनही जेव्हा स्त्रियांना आपल्याच समाजात काही हक्क/अधिकार प्रदान करण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र आदिवासी पुरुष ठामपणे विरोध करतात. त्यांना मारहाण करण्याची धमकी देतात. यावरून हे स्पष्ट होते की, समाज आणि आदिवासी कुटुंबांना मजूर म्हणून स्त्रिया हव्या आहेत पण जेव्हा त्यांना अधिकार देण्याचा विषय येतो तेव्हा पुरुष आक्रमक होऊन नकार देतात. यातून हे दिसते की, आदिवासी समाजातील ही पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रियांना कमी लेखते. त्यांना आपल्या बरोबरीने वागवत नाही. त्यांचे शोषण करत असते. स्त्रियांनी समाजाचा सर्व भार उचलावा पण अधिकाराची मागणी करू नये, अशी अपेक्षा केली जाते. वंचित-उपेक्षित-परिघावरील समाजातील पुरुष जेव्हा त्यांच्यापेक्षा वर असलेल्या समाजावर आपले हक्क/अधिकार गाजवायला असमर्थ ठरतात तेव्हा ते आपल्याच समाजातील स्त्रियांवर हक्क गाजवतात, त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवतात, त्यांना आपली ताकद आणि सामर्थ्य दाखवतात. आदिवासी समाजातील पुरुषांमध्ये देखील ही लक्षणे आढळत असल्याचे जसिंता यांनी नमूद केले आहे. दुसरीकडे आदिवासी स्त्रिया देखील अनेक गोष्टींपासून वंचित आहेत. उदा.- शिक्षण, जाणीव जागृती, रोजगार, सुदृढ आरोग्य, त्यांचे हक्क/अधिकार, आत्मविश्वास इत्यादि. त्यांचे सारे जीवन पुरुषाभोवतीच एकवटले असल्याचे आढळून येते. मुलत: झुंजार, लढवय्यी, कष्टाळू, आत्मनिर्भर असलेली आदिवासी स्त्री आपली सारी क्षमता समाजाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली पुरुषप्रधान व्यवस्थेची वाहक, संरक्षक आणि संवर्धक बनली आहे, हे दुर्दैव! तीदेखील पुरुषांचीच भाषा बोलू लागली आहे- आपल्या पूर्वजांनी असेच सांगितले आहे ! इतकेच नव्हे तर ती समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्याय-अत्याचार-हिंसाचार याकडेही डोळेझाक करू लागली आहे.
अशी सगळी परिस्थिती असली तरी भविष्यात आदिवासी स्त्रियाच नव्हे तर पुरुषदेखील या पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारतील अशी आशा करायला हरकत नाही. असे घडेल तेव्हा नवा सूर्योदय होईल आणि नवीन पिढी समता, न्याय, स्वातंत्र्य, समानता, सामंजस्य, मानवी सन्मान नि प्रतिष्ठा, सौंदर्य या शाश्वत मूल्यांचा स्वीकार करून एक नवे विश्व उभे करेल.
(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Tribal women and patriarchy

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago