नाशिक

पेपर फोडणार्‍या व्यवस्थेला ‘व्हायरल’ विवेकानंद फोडतोय घाम!

पुण्यातील एमपीएससी आंदोलन गाजवतोय कोल्हापूरचा गडी

नाशिक : प्रतिनिधी
पेपर फोडून पास झालेल्या पोरांस्नी पूल बांधला आणि त्यो पडला तर लोकांनी काय करायचं?… तुमच्या गोळीवर माझं एक नाव येईल, पण बोलायचं आम्ही थांबणार नाही!… आम्ही शेतकरी आणि गोरगरिबांची पोरं हाओत. 50-50 लाख रुपये देऊन वशिल्याने नोकर्‍या विकत घेण्याची आमची कुवत नाय… आणि त्यावर कळस म्हणजे-देशात ढगफुटीपेक्षा पेपरफुटीच जास्त झाल्याली आहे! अशा रांगड्या कोल्हापुरी लहेजात एकामागून एक घणाघाती फटके मारत विवेकानंद पाटीलच्या वक्तृत्त्वाची तोफ पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अक्षरशः तोफेसारख्या धडधडणार्‍या त्याच्या वक्तृत्त्वामुळे सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. पेपरफुटीच्या व्यवस्थेलाही घाम फोडणारं त्याचं दोन-दोन तासांचं भाषण आंदोलनकर्ती मुलं-मुली कानात जीव आणून ऐकत राहतात, त्याला भरभरून प्रतिसाद देत राहतात. या आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे आ. रोहित पवारही तिथेच खाली बसून हे सगळं कौतुकाने अनुभवत राहतात.
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील माजगावचा विवेकानंद मारुती पाटील हा जेमतेम पंचविशीतला तरुण. शेतकरी कुटुंबातून आलेला विवेकानंद राज्यशास्त्राचा पदवीधर असून, सध्या शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला त्याचा प्रवास करवीर तालुक्यातल्या भोगावती महाविद्यालयापर्यंत पोहोचला. त्याने महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास सुरू केला. या परीक्षेतील दोन प्रयत्नांनंतर आता यूपीएससीचीही तयारी सुरू आहे. पण अधिकारी होण्याच्या स्वप्नाबरोबरच त्याच्या हातात माइक कधी आला, हे कदाचित त्यालाही कळलं नाही. महाविद्यालयीन काळापासूनच वक्तृत्वाची आवड. विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. त्यानंतर विद्यार्थी आंदोलनांचा अनुभव. त्यामुळे व्यासपीठावर उभं राहण्याचा आत्मविश्वास आणि गर्दीला खिळवून ठेवण्याची हातोटी त्याच्यात आधीपासूनच तयार झाली. स्वामी विवेकानंदांनी तरुणांना जागं करण्यासाठी आपल्या प्रभावी वक्तृत्वाचा वापर केला. या विवेकानंदच्या हातातही आज पुस्तकाबरोबर माइक आला आहे आणि त्याच्या वक्तृत्त्वातून घुमतोय तो स्पर्धा परीक्षार्थींच्या भविष्याचा सवाल. विवेकानंद राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्याने त्याच्या बोलण्यात प्लेटो, सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टॉटल यांचे संदर्भ येतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि नामदेव ढसाळही त्याच्या भाषणात भेटतात. त्यात मिसळतो तो खास कोल्हापुरी तडका. त्यामुळे एखाद्या क्षणी भाषण अभ्यासपूर्ण वाटतं आणि पुढच्याच क्षणी एखादा टोला गर्दीत हास्याची लाट आणतो.
पुण्यातील आंदोलनात त्याचा माइक अक्षरशः ‘हॉट’ ठरतो आहे. एमपीएससीच्या कारभारावर सवाल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांंवर आक्रमक भूमिका, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा हे सगळं तो आपल्या खास शैलीत मांडतो. दोन-दोन तास बोलण्याची क्षमता, मुद्दे लक्षात ठेवण्याची हातोटी आणि समोरच्या गर्दीशी थेट संवाद साधण्याची शैली यामुळे त्याच्याभोवती विद्यार्थ्यांची गर्दी जमते. अधूमधून हास्याची कारंजी उडवणारा संवाद, चार मित्रांमध्ये बसून सांगावेत असे किस्से आणि ‘समुद्रावर घातला दंगा आणि हाताला गावलाय इवलासा झिंगा’ अशा इरसाल कोल्हापुरी म्हणी भाषणात पेरत तो ऐकणार्‍यांना खिळवून ठेवतो. राजकीय नेते आंदोलनस्थळी आले तरी विवेकानंदचा माइक खाली होत नाही. खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार. खा. संजय राऊत, आ. ओमराजे निंबाळकर अशा अनेक नेत्यांसमोरही त्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. राजकीय हस्तक्षेप असो वा आयोगाचा कारभार, सवाल विचारताना तो कुणाला ‘माइकपास’ देत नाही. त्यामुळे भाषणातील एखादे वाक्य आंदोलनस्थळावरून थेट सोशल मीडियाच्या रीलमध्ये पोहोचते.

माइक नवा नाही!
पुण्यातील भाषणांमुळे विवेकानंद पाटील चर्चेत आला असला, तरी आंदोलन त्याच्यासाठी नवं नाही. 2022 पासून तो विविध विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्याचे व्हायरल भाषण हा त्याचा पहिलाच आंदोलनाचा अनुभव नाही. सप्टेंबर 2026 मधील कोल्हापुरातील एमपीएससी आंदोलनातील त्याचे भाषण व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळानेही त्याची दखल घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्याला फोन करून कौतुक केले, तर आदित्य ठाकरे आणि सतेज पाटील यांनीही त्याच्या वक्तृत्वाची दखल घेतली. अधिकारी होण्यासाठी पुस्तकं उघडणारा हा तरुण सध्या माइक उघडून व्यवस्थेलाच प्रश्न विचारतोय!

‘Viral’ Vivekananda is making the paper-leak racket sweat!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

7 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

7 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

7 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

7 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

7 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

7 hours ago