सन 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाची रणनीती आखून ती यशस्वी करणारे प्रशांत किशोर यांनी भाजपाला सुमारे 12 वर्षांनी इतिहास घडविला आहे. गेल्या 12 वर्षांत गुजरातच्या मोदी-शाह जोडीन देशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. विरोधी पक्षांना त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. दबावतंत्राचा वापर करून फोडता येतील तितके विरोधी पक्ष फोडले, विरोधी आमदार-खासदारांची, नेत्यांची पळवापळवी केली. ती अजूनही थांबलेली नाही. आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, केवळ भाजपाच शिल्लक राहील, अशा स्वरूपाचे विधान भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चार वर्षांपूर्वी, म्हणजे 31 जुलै 2022 रोजी, बिहारची राजधानी पाटण्यात केले होते. पाटण्याचा एक भाग असलेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव केला. लहानसहान पक्ष फोडून त्यांना संपवायचे, कोणी विरोधकच राहणार नाही, हा भाजपाचा हिशेब असला, तरी जनसुराज या लहान पक्षाने भाजपाच्या शिडातील हवा काढून घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे भाजपाचेच आहेत. आघाडीत नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) हा भाजपाइतकाच शक्तिशाली पक्ष आहे. याशिवाय लोकजनशक्ती, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक मोर्चा असे काही पक्ष आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला. सर्वकाही ठीकठाक असताना बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी विजय मिळवून मोदी-शाह यांना जागे व्हा! असा संदेश दिला. ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमधील अवघड बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण देशातील जनता आपल्यामागे उभी आहे. आपल्या पक्षाला कोणताही धोका नाही, असा देखावा त्यांनी निर्माण केला. भाजपाला या मतदारसंघात विजयाचा किती आत्मविश्वास होता, हेच प्रसाद यांच्या विधानावरून दिसून येते. पराभव झाल्यानंतर प्रसाद यांनी आपण असे विधान केल्याचा इन्कार केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांनी बांकीपूरच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. या मतदारसंघावर 1995 पासून पकड असल्याने भाजपाचा पराभव अशक्य वाटत होता. मतदारांनी मात्र शांतपणे प्रशांत किशोर यांना निवडले. अतिआत्मविश्वास कसा नडतो, हाच संदेश भाजपाला बांकीपूरने दिला. ही जागा आधी नितीन नबीन यांच्याकडे असल्याने, एकप्रकारे किशोर यांनी भाजपाध्यक्षांचाच पराभव केला. आपल्याला विरोधकच नाही अशा हवेत राहणार्या गुजरातच्या मोदी-शाह जोडीलाही जमिनीवर आणले. अतिआत्मविश्वास भाजपाला नडला, आणि लोकांना गृहीत धरून चालत नाही, हाही धडा मिळाला. पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने भाजपाला फरक पडणार नाही, परंतु पोटनिवडणूक ही सरकारच्या लोकप्रियतेची चाचणी असते. बिहारमध्ये आपलाच मुख्यमंत्री असताना पराभव झाल्याने भाजपावर खाली पाहण्याची वेळ आली. बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराजचे प्रमुख प्रशांत किशोर विजयी होऊन बिहार विधानसभेत पोहोचले. त्यांनी अनेक वर्षांपासूनचा भाजपाचा गड जिंकला. बिहारच्या राजकारणातील ही मोठी घडामोड आहे. प्रशांत किशोर प्रथमच विधानसभेत प्रवेश करणार आहेत; याशिवाय त्यांच्या पक्षाला प्रथमच विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराजने 238 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यापैकी 236 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. त्यावेळी स्वतः प्रशांत किशोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. आता बांकीपूर पोटनिवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून उतरून त्यांनी विजय मिळवला आणि आता ते जनसुराजचे विधानसभेतील एकमेव आमदार ठरले आहेत. पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या बाजूने उघडपणे बोलणारे समर्थक होतेच, पण प्रत्यक्ष मतदानात शांत राहणार्या मतदारांनीही त्यांना मोठी साथ दिल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघात 34 टक्के इतके कमी मतदान झाल्याने पारंपरिक मतदार आपल्या बाजूने असल्याचा विश्वास भाजपाला होता. निकालात चित्र उलटे दिसले. भाजपाचा काही पारंपरिक मतदारवर्ग विविध कारणांमुळे नाराज होता, आणि त्यांनी शांतपणे जनसुराजला पसंती दिली. बिहारमधील मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाच्या मतदारांमध्येही नेतृत्वाबाबत नाराजी असल्याचे दिसून आले. तेजस्वी यादव यांच्यावरील असंतोषामुळे राजदच्या पारंपरिक मतदारांचा कल वळल्याचे बोलले जात आहे. एप्रिल 2026 मध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून भाजपाने त्यांच्याऐवजी स्वतःचा मुख्यमंत्री (सम्राट चौधरी) नेमल्याने काही मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्याचा परिणाम बांकीपूर पोटनिवडणुकीत दिसल्याचे बोलले जात आहे. याशिवाय पोटनिवडणुकीच्या काळातच नीट परीक्षा पेपरफुटी, कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन, यूजीसीशी संबंधित मुद्दे, ई-20 पेट्रोल, सीएनजी, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमती यांमुळे मतदारांची नाराजी वाढली असेल, तर आश्चर्य नाही. प्रशांत किशोर यांनी मोठ्या सभा आणि भव्य रोड शो याऐवजी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. विविध परिसरांमध्ये लहान बैठका आणि प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदारांपर्यंत आपला संदेश पोहोचवला. या प्रचारात त्यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यात आल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. हा संदेश विविध समाजघटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे मानले जात आहे. देशातील हिंदी पट्ट्यातील उत्तर प्रदेशनंतर बिहार हे सर्वांत महत्त्वाचे राज्य आहे. पोटनिवडणुकीचा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून बिहारच्या आगामी राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. जनसुराजला विधानसभेत प्रथमच प्रतिनिधित्व मिळाल्याने प्रशांत किशोर यांची सक्रिय संसदीय राजकारणातील भूमिका अधिक ठळक झाली असून, भविष्यात राज्यातील प्रमुख पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पक्षाची स्थापना 2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर झाली. पक्षाच्या स्थापनेपूर्वी 2 मे 2022 रोजी जनसुराज अभियान प्रशांत किशोर यांनी सुरू केले होते. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2022 पासून त्यांनी बिहारमध्ये 3,500 किमीपेक्षा जास्त लांबीची राज्यव्यापी पदयात्रा काढली होती. पक्षाच्या स्थापनेवेळी माजी राजनैतिक अधिकारी (भारतीय विदेश सेवा) मनोज भारती यांची पक्षाचे पहिले कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा पक्ष प्रामुख्याने महात्मा गांधींच्या विचारांवर आणि सुशासनाच्या तत्त्वांवर आधारलेला आहे. प्रशांत किशोर यांनी हळूहळू पक्ष तळागाळात रुजवण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीत जनसुराजला भोपळा फोडता आला नाही, तरी किशोर यांनी धैर्याने काम सुरूच ठेवले. बिहारच्या राजकारणात जनसुराज हा पक्ष तिसरा पर्याय म्हणून पुढे येऊ शकेल, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या राजकारणाला जनता कंटाळली होती, नितीश कुमार यांनी धरसोड वृत्तीने भाजपाची कास धरली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व राज्यात केले. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना, विशेषतः महिलांना, विविध प्रलोभने दाखवून सत्ता मिळवली; पण बांकीपूरमध्ये नितीश कुमार यांचा करिश्मा राहिला नाही. मोदी-शाह जोडी आणि नितीन नबीन यांनाही मतदारांनी आरसा दाखवला.
Wake up!
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…