नाशिक : प्रतिनिधी
गणरायाच्या आगमनानंतर भाद्रपद शुद्ध षष्ठीला महालक्ष्मी गौरींचे काल (दि. 31) सोनपावलांनी आगमन झाले असून, घरोघरी भक्तिभावाने गौराईंचे स्वागत करण्यात आले. घराघरांत मंगलमय वातावरण पसरले असून, महिलावर्गात विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
गौराईंना आज (दि. 1 ) पुरणपोळी, सोळा भाज्या, वडे, खीर, कथिल, आंबिल, अळूवडी अशा विशेष नैवेद्यांचा महाप्रसाद मंत्रोच्चारात दाखविला जाणार आहे. महालक्ष्मींसाठी खास डांगराची फुले,
फुलांच्या माळा, गजरे, वेणी, खिरापत, फळे, विडा यांची आरास करून देवींची भव्य पूजा केली जाते. दोन्ही बाजूंनी कलश, धान्याच्या राशी व साडी-चोळीने ओटी भरली जाते. पौराणिक कथेनुसार, भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून श्री गौरीने पृथ्वीवर सुखशांती नांदवली. त्यानिमित्त अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. तीन दिवस चालणार्या या पूजेत षष्ठीला ज्येष्ठा गौरींचे आवाहन, सप्तमीला पूजन व नैवेद्य तर अष्टमीला विसर्जन करण्यात येते. नाशिकसह ग्रामीण भागातही विविध पद्धतींनी गौराईंची स्थापना होताना दिसत आहे. कुठे प्रतिमा, कुठे कागदावरील चित्र, कुठे नदीकाठचे खडे तर कुठे मडक्यांची उतरंड सजवून त्यावर मुखवटा बसवला जातो. काही ठिकाणी सुवासिक वनस्पती व तेरड्याच्या रोपांवर मातीचा मुखवटा चढवून गौराईंची स्थापना केली जाते. वर्षातून एकदाच होणार्या या आगमनासाठी घरातील महिला व कुटुंबीय परिश्रमपूर्वक तयारी करतात. तिसर्या दिवशी गौराईंना निरोप दिला जातो, त्यावेळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे गौराईंचा उत्सव अधिकच मंगलमय होतो. उद्या गौराईंना निरोप दिला जाणार आहे.