संपादकीय

ड्रेनेज समस्येवर उपाय कधी?

– गोरख काळे
नाशिक महापालिकेची नुकतीच महासभा झाली. या सभेत नेहमीप्रमाणे नगरसेवकांनी अपुर्‍या मूलभूत सुविधांवरून प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणल्या. ड्रेनेज, मोकाट कुत्र्यांचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. विशेषत: ड्रेनेजच्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची खदखद सदस्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ड्रेनेजची समस्या मार्गी लागत नसल्याचा आरोप करत संबंधितावर कारवाईची मागणी केली. ड्रेनेज व मलनिस्सारण विभागाच्या कार्यवाहीवर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत या समस्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, यातून सुटका कधी होणार, असा प्रश्न केला. दरम्यान, संबंधित विभागाने नेहमीप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन देत वेळ मारून नेली. मात्र, ज्या पोटतिडकीने सभागृहात नगरसेवकांनी प्रश्न मांडले त्याची अंमलबजावणी कधी होईल, हे सध्यातरी अनुत्तरित आहे.
नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक अडीच हजार कोटींपर्यंत गेले आहे. मात्र, अद्याप नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी भांडावे लागत असल्याचे भीषण वास्तव आहे. महापालिका हद्दीत अंदाजे 1750 ते 1800 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या भूमिगत ड्रेनेजे लाइन अस्तित्वात आहेत. वाढत्या नागरीकरणासोबत नवीन भागात लाइन टाकण्याचे काम सुरू असते. ड्रेनेजच्या समस्येवरून प्रभाग क्रमांक 23 च्या भाजप नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी सदर विभागाचे वाभाडे काढले. मागील काही दिवसांपासून नागरिकांना होणारा त्रास त्यांनी सभागृहात मांडत या विभागातील खातेप्रमुखास जाब विचारला. श्री श्री रविशंकर मार्ग परिसरात नाला असून, त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी तक्रार करूनही त्याकडे ड्रेनेज विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. याच परिसरात अनेक गोठे असून, त्यावर कुठलीही प्रक्रिया न करता मल-मूत्र नाल्यात सोडून दिले जात असल्याचे कुलकर्णी यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. महापालिकेने नाशिकरोड, नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी, सिडको, सातपूर या विभागांतील ड्रेनेजची कामे ठेकेदारांकडून करून घेतली जात आहेत. प्रत्येक प्रभागातून दररोज पंधरा ते वीस तक्रारी असतात; परंतु अपुरे मनुष्यबळ व प्राधान्यक्रमानुसार तक्रारी सोडवल्या जात असल्याने ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट बाहेर पडते. ड्रेनेजची समस्या उदभवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, जीर्ण झालेली लाइन. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी लाइनचे काम झाले आहे. जेथे लाइन चोकअप झाली, ती तत्काळ शोधणे शक्य होत नाहीत. त्यामुळे अडचणी येत असल्याचे दिसते. काही ठिकाणी झोपडपट्टी परिसरात चेंबर असल्याने तेथील कचरा तसाच त्यात टाकला जातो व लाइन ब्लॉक होते. शहरात मलवाहिकांच्या लाइन टाकण्याचे काम प्रशासनाने घेतले, त्या धर्तीवर ड्रेनेज लाइनदेखील बदलण्याची आवश्यकता आहे. सध्या आवश्यकतेनुसारच मोठ्या रस्त्यांच्या ठिकाणी ड्रेनेज लाइन टाकल्या जात आहेत. पण सर्वच लाइन बदलण्याची आवश्यकता आहे. विशेषत: याआधीचे काम विटांमध्ये असून, त्यामुळे माती पडून ड्रेनेज जॅम होते. आरसीसीमध्ये काम केल्यास यावर तोडगा निघू शकेल. मात्र, सध्यातरी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ड्रेनेज लाइन तुंबणे, सांडपाणी रस्त्यावर वाहणे आणि उघडी चेंबर्स यांमुळे नागरिकांचे आरोग्य व सुरक्षा धोक्यात आहे, असे आरोप नगरसेवक करत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करते, पण ठोस उपाय करत नाही. ड्रेनेज समस्या आणि प्रशासकीय अनास्था, तुटलेली व तुंबलेली लाइन, जुन्या आणि जीर्ण ड्रेनेज वाहिन्यांमुळे सांडपाणी रस्त्यांवर आणि अगदी घरांत शिरत आहे. सिडकोतील प्रभाग 25 मध्ये ही समस्या जटिल झाली आहे.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी नगरसेविका साधना मटाले यांनी विभागाचे प्रमुख रवींद्र धारणकर यांना निवेदन देत नागरिकांच्या घरात थेट ड्रेनेजचे पाणी जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यानुसारच शहरातील अनेक भागांत अशी समस्या आहे. नागरिक कर भरतात, पण मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
अनेक भागांत ड्रेनेज उघडे असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. शहरात जुलैपासून पाऊस पडतोय. पण पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाइनची देखभाल-दुरुस्ती करणे आवश्यक असताना ती झालेली नाही. प्रभागानुसार ड्रेनेज लाइनची देखभाल- दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. सध्या एका ठेकेदाराकडे एका विभागाची जबाबदारी आहे. पण कमी मनुष्यबळ असल्याने त्याचा फटका तक्रार निवारण करण्याला बसत आहे. महासभेत नगरसेवकांनी ड्रेनेजे लाइनच्या देखभाल-दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असताना त्यापेक्षा नव्याने लाइन टाकल्यास ते महापालिकेच्या फायद्याचे ठरेल, असे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सभागृहात नमूद केले. शहरात ड्रेनेज लाइनसोबतच पावसाळी गटाराचे काम रखडले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी गटारीची कामे केली जात आहेत. मात्र, काही ठिकाणी निकृष्ट पाइप टाकले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.

When will there be a solution to the drainage problem?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago