– अश्विनी पांडे
नाशिक शहर काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी शहर नेतृत्वात बदल करण्यात आल्यानंतर पक्षाच्या स्थानिक राजकारणात नव्या हालचालींना सुरुवात झाली आहे. नवीन नेतृत्वाकडून विविध प्रश्नांंवर आंदोलने, निदर्शने आणि सत्ताधार्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा शहरातील राजकारणात सक्रिय होत असल्याचे चित्र निर्माण झाले असले, तरी पक्षासमोरील सर्वांत मोठे आव्हान अद्याप कायम आहे आणि ते म्हणजे, अंतर्गत गटबाजी. नेतृत्वबदलानंतर पक्षाची धुरा नव्या नेतृत्वाकडे आली असली, तरी विविध गटांमधील मतभेद पूर्णपणे संपलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे मैदानात उतरताना काँग्रेसला प्रथम संघटनात्मक एकजूट साधावी लागणार आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या दौर्यामुळे नाशिक काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौर्यावर येणार असल्याने या दौर्याकडे पक्षासाठी मोठी राजकीय संधी म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्रीय नेतृत्वाच्या दौर्याच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
नाशिक शहरातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेससाठी ही संधी महत्त्वाची आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, मूलभूत सुविधांची स्थिती, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना होणारा विलंब आणि वाढती महागाई यामुळे नागरिकांच्या मनात नाराजी आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र, कामांचा वेग, नियोजन, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, आंदोलन करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा त्यानंतर प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. एखाद्या रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर त्या रस्त्याची दुरुस्ती झाली का, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामातील अडथळे दूर झाले का, प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची दखल घेतली का, याचा पाठपुरावा काँग्रेसने केला तरच जनतेच्या मनात पक्षाबद्दल विश्वास निर्माण होऊ शकतो.
काँग्रेस हा देशपातळीवर मोठी राजकीय परंपरा असलेला पक्ष आहे. राष्ट्रीय नेतृत्वापासून स्थानिक पातळीपर्यंत कार्यकर्त्यांची मोठी फळी असतानाही संघटनात्मक मतभेदांमुळे पक्षाला अपेक्षित राजकीय ताकद दाखवता येत नसेल, तर त्याचा विचार नेतृत्वाला करावा लागणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे, बूथपातळीवर संघटना उभी करणे, युवक व महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांंसाठी सातत्याने उपलब्ध राहणे, ही काँग्रेससमोरील प्रमुख कामे आहेत. नाशिकच्या राजकारणात काँग्रेससमोर सध्या एकाच वेळी आव्हान आणि संधी दोन्ही आहेत. जनतेच्या मनात असलेली नाराजी, शहरातील मूलभूत प्रश्न आणि सिंहस्थाच्या कामांबाबत निर्माण होणारे प्रश्न यामुळे विरोधकांसाठी राजकीय अवकाश उपलब्ध झाले आहे. मात्र, हे अवकाश भरून काढण्यासाठी काँग्रेसला एकसंघपणे मैदानात उतरावे लागेल. पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी जनतेत आपली पकड मजबूत करण्यावर भर दिला, तर काँग्रेसला नाशिकमध्ये पुन्हा राजकीय उभारी घेता येऊ शकते.
त्यामुळे राहुल गांधींचा नाशिक दौरा हा काँग्रेससाठी केवळ एक कार्यक्रम नसून पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची परीक्षा ठरणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले संघटना मजबूत करण्याचे आवाहन आणि राहुल गांधींच्या प्रस्तावित दौर्याच्या पाश्वर्र्भूमीवर स्थानिक नेतृत्वासमोर मोठी संधी आहे. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष, मजबूत संघटनात्मक बांधणी आणि सर्व गटांना सोबत घेण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवता आली, तर काँग्रेसला नवी उभारी मिळू शकते.अन्यथा जनतेच्या मनातील नाराजी असूनही अंतर्गत गटबाजीमुळे ही संधी हातातून निसटू शकते. त्यामुळे राहुल गांधींच्या नाशिक दौर्यामुळे काँग्रेसला नवी ऊर्जा मिळते का, स्थानिक गटबाजी थोपवली जाते का आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर पक्ष पुन्हा आपला ठसा उमटवतो का, हे पाहावे लागणार आहे.
Rahul Gandhi’s visit: Rein in the factionalism!
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…