संपादकीय

ठेकेदार वठणीवर येणार का?

– गोरख काळे

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात रस्त्यांचे जाळे मजबूत केले जात आहे. तब्बल चौदाशे कोटी खर्चून 28 रस्त्यांच्या विकासाचे काम सुरू आहे; परंतु हीच कामे नाशिककरांच्या जीवावर उठली आहेत का, असा प्रश्न नाशिककरांना पडू लागला आहे. कारण रस्ते अपघातांत सातत्याने होत असलेेले मृत्यू. नुकत्याच झालेल्या महासभेत यावरून रणकंदन पाहायला मिळाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केल्यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी जिंदाल कंपनीसह इतर व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.

महापालिकेच्या इतिहासात ठेकेदारावर थेट मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची महासभेतील ही बहुधा पहिलीच वेळ. थेट मृतदेह आणून महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचाही पहिलाच प्रसंग, पहिलीच वेळ. महापौरांनी गांभीर्य पाहत ठेकेदारांना दणका दिल्यानंतर आता तरी ते वठणीवर येणार का, असा सवाल केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांची कामे व परिस्थितीवरून महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले जात आहे. विशेषत: शहरात कुठलाही अपघात झाल्यास त्यासाठी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरून सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या सर्व अपघातांना खराब रस्तेच जबाबदार आहेत, असे म्हणून प्रशासनाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. खरेतर रस्त्यांची कामे लवकर उरकावीत याकरिता मनपा आयुक्त मनीषा खत्री या स्वत: रस्ते कामाची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. रस्तेकामात सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याबरोबरच कामातील दर्जाबाबत ठेकेदारांना सक्त सूचनाही केल्या आहेत. सिंहस्थाच्या तीन रस्ते कामांच्या दर्जावर मुंबई आयआयटीच्या पथकाने सकारात्मक अहवाल दिला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथे मध्यरात्री उपेंद्रनगर येथील सिद्धार्थ गोरे या तरुणाचा महापालिकेने टाकलेल्या जलवाहिन्यांच्या पाइपला धडकून मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थेट मृतदेह नेऊन तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच सिद्धार्थ गोरेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांसह नगरसेवकांनी केला. यानंतर पुन्हा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्षभरावर सिंहस्थ कुंभमेळा आला असून, तत्पूर्वीच रस्ते अपघात होऊन एकूण 13 जणांचा बळी गेल्याने महापालिका प्रशासन टीकेचे लक्ष्य बनले आहे. ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा फटका बसून त्यात नागरिकांचा मृत्यू होत आहे आणि यात महापालिकेची बदनामी होत असल्याची भावना नगरसेवकांनी महासभेत व्यक्त केली. अपघातानंतर मृतांच्या नातेवाइकांना केली जाणारी पाच लाखांंची मदत तुटपुंजी असून, त्याने गेलेला जीव पुन्हा येणार नाही. अपघातात मृत झालेल्यांपैकी बहुतेक व्यक्ती घरातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यामुळे पाच लाख देऊन काय होणार? मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासह इतर अनेक बाबी सदस्यांनी सभागृहात मांडल्या. महापौरांनी ठेकेदारावर गुन्हे दाखल कारण्याबरोबरच मृताच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्या ठेकेदारावरच सोपवणे आवश्यक होते. असे झाले तर कुटुंबाला हातभार लागण्यास मदत होईल. मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला मानधन तत्त्वावर कामावर घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी 13 पैकी किती जणांच्या घरातील व्यक्तींना मानधनावर घेण्यात आले, याचे पुरावे मागितले जात आहेत. मुजोर ठेकेदारामुळे शहराची बदनामी होत असून, प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे, असा सवाल शिंदे सेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी करत अप्रत्यक्षपणे भाजपचे कान टोचत महासभा दिल्लीतून चालणार नसल्याचा टोला लगावला. ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनीही नागपूर, पुणे, गुजरातमधील ठेकेदार येतात आणि मनमानी कारभार करतात, अशी टीका केली. महासभेच्या कारभारावर शिंदे सेनेत असंतोष प्रकर्षाने जाणवला. त्यामुळेच रस्ते अपघातांसह इतर प्रश्नांवर बोलू दिले जात नसल्याने शिंदे सेनेचे प्रवीण तिदमे यांनी सभागृह सोडत संताप व्यक्त केला. रस्ते अपघातांत ठेकेदारांना वारंवार सूचना करूनही सुरक्षेच्या उपाययोजना झालेल्या नाहीत. विशेषतः यापूर्वी महासभा व स्थायी समिती सभेत सदस्यांनी अनेकदा रस्ते सुरक्षा उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका कृषिनगर अपघाताच्या निमित्ताने आला. आता ठेकेदारावर थेट मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याने यानंतर तरी ठेकेदार काळजीपूर्वक काम करेल, अशी आशा आहे. ठाकरे सेनेचे गटनेते पोरजे यांनी रस्ते विषयावरून आक्रमक झाल्याचे दिसले. ठेकदारावर कारवाई केली नाही तर सभागृह चालू देणार नाही, भलेही आपल्यावर कारवाई झाली तरी चालेल. आपण विरोधी पक्षाची भूमिका बजावतच राहणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. साहजिकच रस्ते अपघातप्रकरणी सर्वच सदस्य आक्रमक झाल्याने यापुढील वाटचाल बिकट ठरू नये, यासाठी प्रशासनाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल.

Will the contractors be brought to heel?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago