नाशिक

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हा भव्य आणि ऐतिहासिक उपक्रम नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आगामी ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याची नांदी ठरली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पाश्वर्र्भूमीवर रविवारी सायंकाळी गोदातीरावर 517 शंखांचा निनाद घुमला आणि भाविकांनी ’जय श्रीराम’चा घोष करीत आनंदोत्सव साजरा केला. कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर देवमामलेदार पटांगणाजवळ होणार्‍या या सामूहिक शंखनादातून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्’ करण्यात आले. आता शंखनादाचा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे, अशी अधिकृत घोषणा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी करताच गोदावरीचा पवित्र तीर ‘भारत माता की जय’ आणि ’हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
याप्रसंगी कुंभमेळामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पंचायती आखाड्याचे महंत गोपाळदास महाराज, महंत देवेंद्र महाराज, महंत रामकिशोरशास्त्री महाराज, महंत मंगलपुरी महाराज, डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, डॉ. भक्तिचरणदास महाराज, मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप, समन्वयक मिलिंद बेर्लेकर यांच्यासह साधू-महंत, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, अमेरिकेचा 303 शंखवादकांचा जुना विक्रम मोडीत काढत 517 जणांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद करून नाशिकच्या नावे एका सुवर्णाध्यायाची नोंद केली. भक्ती, सामूहिक ताकद आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणार्‍या या सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या आध्यात्मिक पर्वाचा शानदार शुभारंभ झाला. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणात या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. एकाच वेळी घुमलेल्या शंखध्वनीमुळे संपूर्ण परिसरात चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले.
शंखनादाचा हा विश्वविक्रम झाल्यानंतर पालकमंत्री महाजन म्हणाले की, हा विक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाचा गौरव वाढवणारा आहे. शंखनाद हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या उपक्रमातून आपली आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक शक्ती जगासमोर आली आहे. शंख वाजवण्यासाठी श्वसनावर नियंत्रण आणि प्राणायामाचा सराव आवश्यक असतो. शेकडो नागरिकांनी दाखवलेली शिस्त आणि उत्साह कौतुकास्पद आहे.

कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककराचा उत्सव : ना. महाजन
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेताना नागरिकांना सहभागाचे आवाहन केले. कुंभमेळा हा केवळ सरकार किंवा प्रशासनाचा नसून प्रत्येक नाशिककराचा सण आहे. येणार्‍या प्रत्येक भाविकाचे स्वागत आपल्या घरातील पाहुण्यासारखे करा. रस्ते, घाट, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, वाहतूक व निवासाचे नियोजन वेगात सुरू आहे. प्रशासन, नागरिक आणि स्वयंसेवकांनी समन्वयाने काम करावे. सिंहस्थपर्वाची नांदी म्हणून 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे.

World record for conch-shell blowing at Godaghat

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

6 minutes ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

11 minutes ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

19 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

25 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

38 minutes ago

रखडलेला व्यापार करार

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…

46 minutes ago