22 वी वार्षिक सभेत आर्थिक प्रगतीचा आढावा; 12 विषयांना सभासदांची सर्वानुमते मंजुरी
सिन्नर : प्रतिनिधी
सभासदांच्या विश्वासाला आर्थिक लाभाची जोड देत जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेने यंदा 4 टक्के लाभांश जाहीर केला. संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या संस्थापक चेअरमन डॉ. प्रतिभा भरत गारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध 12 विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
संस्थेने विविध अडचणींवर मात करत नियामक मंडळाच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या कामकाजामुळे आर्थिक प्रगती साधल्याचे यावेळी सांगण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून सभासदांना सातत्याने आर्थिक सेवा उपलब्ध करून देतानाच संस्थेच्या आर्थिक स्थैर्याला प्राधान्य दिले जात असल्याचेही स्पष्ट
करण्यात आले.
उपाध्यक्षा दया पटेल यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा सभेसमोर मांडला. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देत मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संचालक माधुरी घोलप यांनी नफा-विभागणीबाबत माहिती देत सभासदांना 4 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. त्यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
मार्गदर्शक सिद्धेश पवार यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. संस्थेच्या प्रगतीसाठी सभासद, संचालक मंडळ व कर्मचार्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. संचालक अर्चना कुळे यांनी कर्जाची नियमित
परतफेड करण्याचे फायदे सभासदांना समजावून सांगितले. कर्ज थकीत राहिल्यास संस्थेसह संबंधित सभासदांवर होणार्या आर्थिक परिणामांचीही त्यांनी माहिती दिली. कर्ज व्यवहारात शिस्त व नियमित परतफेड यामुळे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांना अधिक बळकटी मिळते, असे त्यांनी सांगितले. जिल्हा विकास अधिकारी अश्विनी रंजूर यांनी सभासद व संचालकांना संस्थेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. तसेच सहकार क्षेत्रातील संस्थांच्या कारभारात स्वजबाबदारीचे महत्त्व स्पष्ट करत त्याबाबत प्रशिक्षण दिले.
सभेच्या प्रारंभी संचालक शोभा सातपुते यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्यवस्थापक सुनीता ठोंबरे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. कर्मचारी मेहबूब मणियार, रामदास भालेराव व रूपाली कर्पे यांनी सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
4% dividend for members of Jijamata Women’s Credit Society.