फेटा, शेला, स्टोन अन् ब्रोचने सजले बाप्पा

रेडी गेटअप गणेशमूर्तींना वाढती मागणी; लाडक्या गणरायाला ड्रेपरीची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
पूर्वी साध्या स्वरूपातील गणेशमूर्तींना पसंती असायची. मात्र, बदलत्या काळानुसार गणेशमूर्तींच्या सजावटीतही मोठा बदल झाला आहे. यंदा फेटा, शेला, स्टोनची लेस, ब्रोच, कानातील बाळी तसेच फुलांनी सजवलेल्या पागोट्यांसह रेडी गेटअपमधील गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. धावपळीच्या युगात सजावटीचा अतिरिक्त वेळ वाचत असल्याने अशा मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल वाढला आहे.
गणेशोत्सव म्हटले की, सर्वांच्या प्रतिभेला बहर येत असतो. गणपती बसविण्याची जागा, परिसराची सजावट तसेच आर्कषक डेकोरेशन करण्यासाठी विविध कलात्मक गोष्टींचा वापर केला जातो. पर्यावरणपूरक आपली सजावट ठरावी यासाठी प्रयत्न केले जातात.गेल्या काही वर्षात गणेशमूर्तीमध्ये जसे बदल होत आहेत तसे देखाव्यांसह मूर्तीलाही सजविण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक गणेशमूर्ती पाहायला मिळत आहेत. विशेषतः फेटा आणि शेला यासाठी वापरले जाणारे विविध रंगांचे कापड, त्यावरील स्टोनची लेस, ब्रोच आणि आकर्षक रंगसंगती यांचा वापर करून बाप्पाला सजवले जाते. काही मूर्तींवर फुलांनी सजवलेले पागोटे, आकर्षक फेटे लावले जात आहेत. या सजावटीमुळे गणरायाचे मनमोहक रूप अधिक खुलून दिसत आहे.
या पूर्ण गेटअप असलेल्या गणेशमूर्तींची किंमत साध्या मूर्तींच्या तुलनेत अधिक आहे. साधारणपणे दोन हजार 500 ते 8-9 हजारांंपर्यंत या मूर्तींची किंमत असल्याने त्या प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसतीलच असे नाही. मात्र, आकर्षक सजावट, वेळेची बचत आणि वेगळे दिसणारे बाप्पाचे रूप यामुळे ग्राहकांकडून त्यांना चांगली मागणी मिळत आहे.
विशेष म्हणजे, या मूर्तींची सजावट करताना मशिनचा वापर केला जात नाही. फेटा, शेला तसेच त्यावर केले जाणारे नाजूक काम पूर्णपणे हाताने केले जाते. प्रत्येक मूर्ती सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत आणि कौशल्य लागते. त्यामुळे मूर्तीच्या सजावटीसाठी साधारण 500 ते 700 रुपये मजुरी घेतली जाते.
सजावटीचे काम गणेशोत्सवाच्या जवळपास दोन महिने आधीपासूनच सुरू होते. कुशल कारागीर दररोज सुमारे 10 ते 12 गणेशमूर्ती सजवतात. फेट्याची बांधणी, शेल्याची मांडणी, स्टोनची लेस, ब्रोच, बाळी आणि फुलांची सजावट यामध्ये प्रत्येक मूर्तीला स्वतंत्र लूक देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे बाजारात येणार्‍या या सजवलेल्या गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.पारंपरिक मूर्तींसोबतच रेडी गेटअप बाप्पांची क्रेझही वाढताना दिसत आहे.

दिवसाला 10-12 मूर्तींची सजावट
कुशल कारागीर साधारण एका दिवसात कपडे, दागिने आदींनी 10 ते 12 गणपती सजवतात. एक गणपती सजविण्याच्या साहित्यासह 500 ते 700 रुपये घेतले जातात. गेटअप केलेली गणेशमूर्ती असल्याने वेळेची बचत होत असल्याने त्यास नागरिकांची पसंती मिळते.

कुशल कारागीर हाताने सर्व गणपतीची ड्रेपरी सुबकरीत्या करतात. गणेशमूर्तींना लागणारे कापड, लेस, ब्रोच आदी साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे सजविलेल्या बाप्पांना विशेष मागणी आहे. यानिमित्ताने कारागिरांनाही कमाईचे साधन मिळाले आहे. दोन महिने आधीपासून गणेशमूर्तींची ड्रेपरी करण्यास सुरवात होत असते.
– वृषाली माहेगावकर, कला द डिझायनर

Bappa adorned with a *pheta* (turban), *shela* (drape), stones, and a brooch.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *