– मुकुंद बाविस्कर
शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या की, शहराची जणू काही गती कमी होते. सर्वत्र शांत-शांत वाटते; परंतु शाळा सुरू झाल्या की, शहराला जणू काही बहर येतो. चैतन्याचा मोहर येतो असे म्हणावे लागेल. आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली असून, कुठे दीड महिन्याने मित्र भेटल्याचा आनंद, तर कुठे शाळेच्या नवख्या वातावरणात बुजलेल चेहरे. कुठे रडवेल्या स्वरात आईला दिलेली हाक, तर कुठे मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यातून उमटणारे हास्याचे फवारे, दीड महिन्यानंतर पुन्हा भरलेल्या शाळांच्या प्रांगणात हे चित्र पाहायला मिळाले. पहिलीच्या वर्गात प्रवेशित झालेल्यांसाठी शाळांमार्फत विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले.
राज्यभरातील राज्य मंडळाशी संलग्न शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी देण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे 15 जूनला शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेचा हा पहिला दिवस नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळांमार्फत विशेष प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आले होते. शिक्षण विभागातील अधिकार्यांसह जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, उपमहापौर यांनीही शहरासह जिल्ह्यातील शाळांना भेट देत स्वागतोत्सवात सहभाग घेतला. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर काही शाळांमध्ये शिक्षक, तसेच अन्य विद्यार्थ्यांनी पुष्पवर्षाव केला. काही शाळांत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. कुंकवाच्या मिश्रणात पावले बुडवून विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलाचे ठसेही घेण्यात आले. काही शाळांमध्ये सजवलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलींमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. फुगे, पताकांनी वर्गखोल्यांची सजावट केली होती. चिमुकल्यांसाठी विविध प्रकारची खेळणीही शाळेच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आली.
विविध उपक्रमांमुळे भारावलेले पालक, आपल्या पाल्याचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय करण्याची धडपड, त्यासाठी फोटो-व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मोबाइलच्या कॅमर्यात टिपणारे पालक, असे काहीसे चित्र शहर, उपनगरे व ग्रामीण भागातील शाळांत पाहावयास मिळाले. शाळांमधील डिजिटल स्क्रीन, रंगीबेरंगी बोलक्या भिंती, फुग्यांची सजावट व आनंदी वातावरण पाहून पहिल्यांदाच शाळेत आलेल्या मुलांच्या चेहर्यावर भीतीऐवजी एक वेगळाच आनंद आणि हास्य पाहायला मिळाले. शाळा प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने झालेले शाही आगमन, हे होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत आणण्यासाठी विविध शाळांत आकर्षक पारंपरिक व्यवस्था केली होती. शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचताच शिक्षक, मुख्याध्यापक व स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांवर
पुष्पवृष्टी केली.
ग्रंथपाल ज्ञानाचे संवाहक, संवर्धक
ग्रंथपाल हे केवळ पुस्तकांचे रक्षक नसून, ज्ञानाचे संवाहक आणि समाजातील वाचनसंस्कृतीचे संवर्धक आहेत, असे मत सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयात आयोजित राज्य शासनाच्या ग्रंथपाल प्रमाणपत्र वर्गाच्या सदिच्छा समारंभात ते बोलत होते. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुनील कुटे उपस्थित होते. कुटे म्हणाले की, परीक्षेची तयारी करताना विषयाचे सखोल आकलन, ग्रंथालयशास्त्रातील मूलभूत संकल्पना, वर्गीकरण, सूचीकरण, संदर्भ सेवा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी सांगितले की, वाचनसंस्कृती वाढवणे, वाचकांना योग्य माहिती उपलब्ध करून देणे व समाजाच्या बौद्धिक विकासात योगदान देणे ही ग्रंथपालांची जबाबदारी आहे. प्रशिक्षणार्थीच्या वतीने सायली डेरले यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
इस्कॉन मंदिरात दीपदान महोत्सव
पुुरुषोत्तम मासानिमित्त नाशिक येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात महिनाभर दीपदान महोत्सव घेण्यात आला. आरतीनंतर दररोज सायंकाळी सात वाजता बिल्वमंगल ठाकूर रचित चौराष्टकमचे गायन करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करणार्या या श्लोकांमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. मंदिरात नियमित 400 ते 500, तर शनिवार-रविवारी 700 ते 1,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले. कमला एकादशी (पद्मिनी एकादशी) व परमा एकादशीला सायंकाळी 7.30 वाजता सुमारे 1,000 ते 1,500 भाविकांनी एकत्र दीपदान करत भगवान श्रीकृष्णाच्या चरणी दिवे अर्पण केले. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला होता. यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप झाले. महिनाभरात 21 हजारांहून अधिक दिवे अर्पण करण्यात आले. अनेक भाविकांनी वैयक्तिक स्वरूपात दीपदान, तसेच विविध वाण व दान अर्पण केले.
सिंधी सोशल ग्रुपतर्फे विष्णुयाग, महायज्ञ
अधिक मासानिमित्त नाशिक सिंधी सोशल ग्रुपतर्फे विष्णुयाग, महायज्ञ व भजनसंध्या कार्यक्रम झाला. द्वारका येथील झुलेलाल मंदिर, रामीबाई हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी प्रायश्चित्त विधी, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका-वसोर्धारा पूजन, आयुष्य मंत्र, ऋत्विक वरण, कुंडपूजन, ग्रह स्थापना, तसेच सर्वतोभद्र मंडल देवतापूजन आदी विधी झाले. त्यानंतर विष्णुयाग, आरती व मंत्रपुष्पांजली पार पडली.
सायंकाळी भजनसंध्येत भजनसम्राट अमोल पालेकर व त्यांच्या सहकार्यांनी भजने सादर केली. महाआरती, मंत्रपुष्पांजली, ब्रह्मभोज त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. पंडित सुनील शर्मा, पंडित विवेक शर्मा, पंडित पराग शर्मा, पंडित मनोज चतुर्वेदी, विनोद चतुर्वेदी, रवी शर्मा, ईशान
चतुर्वेदी, जगबंधन दुवेदी, दुर्गेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली महायज्ञ झाला.
संगीतातून उलगडला मीराबाईंचा प्रवास
रिव्हरसाइड रोटरी क्लब आयोजित व लक्ष्मीमंगेश प्रस्तुत भक्तिलता संत मीराबाई हा संगीतमय कार्यक्रम सातपूर येथील नॅब संकुलात रंगला. त्यातून गीत-संगीताद्वारे संत मीराबाई यांचा जीवनप्रवास उलगडला. गायिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी गायन व निवेदनातून संत मीराबाईंच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सादर केले. राजघराण्यात जन्मलेल्या व सांसारिक जीवन जगताना श्रीकृष्णभक्तीत तल्लीन होऊन संतत्व प्राप्त करणार्या मीराबाई यांच्या जीवनातील विविध भावछटा मणेरीकर यांनी लीलया सादर केल्या. त्यातून मीराबाईंच्या जीवनातील विविध टप्पे, आध्यात्मिक संघर्ष, वैराग्य व श्रीकृष्णावरील प्रेम यांचे दर्शन घडले.
पाथरवट समाजातर्फे शोभायात्रा
पाथरवट व आगरी समाजातर्फे अधिक मासानिमित्ताने गोदावरी नदीत सामूहिक स्नान करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी संत, महंतांचे पूजन केले.
यावेळी पारंपरिक मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत साधू, महंत तसेच समाजबांधव सहभागी झाले होते. महंत भक्तिचरणदास, अखिलेश्वरदास त्यागी महाराज, हभप धनंजय महाराज गतीर यांनी आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत कलशधारी महिला मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या. कार्यक्रमाला जिल्ह्यासह पुणे, इगतपुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, येवला, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, शहापूर, जव्हार, नंदुरबार, धुळे, मालेगाव, शिर्डी, तसेच गुजरातमधील समाज बांधव उपस्थित होते.
डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची गायन मैफल रंगली
दूरदेशी गेलेल्या पतीच्या आठवणींनी मन विकल झालेले… प्रियतम कधी परतणार याचा थांगपत्ता नाही, अशा स्थितीत व्याकूळ झालेल्या विरहिणीची वेदना पिया मोरे अनत देस गईलवा या शब्दांद्वारे स्वरांतून ओथंबत राहिली अन् रसिकांचे कान तृप्त होत गेले… प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायन मैफलीत नाशिककर रसिकांनी अशी भावविभोर सायंकाळ अनुभवली. स्नेह संवर्धन मंडळातर्फे गुरुदक्षिणा सभागृहात नुकताच हा कार्यक्रम रंगला. जयपूर-अत्रौली घराण्याची अनुभवी गायकी, तिला तबला व संवादिनीची लाभलेली दमदार साथ व महत्त्वाच्या जागांवर रसिकांनी दिलेली उत्कट दाद यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. डॉ. भिडे-देशपांडे यांनी शास्त्रीय व सुगम शास्त्रीय गायन सादर केले.
A sense of vibrancy returns to the city as schools reopen.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…