युद्धात अडकलेली अमेरिका

इराणचे नेतृत्व संपुष्टात आणले आहे, इराणची क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत, त्यांच्याकडे युद्ध करण्याची क्षमता नाही, लवकरच आम्ही युद्ध जिंकू, अशी वक्तव्ये करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच अधिकार्‍यांनी युद्ध परिस्थितीची जाणीव करून दिली आहे, ती म्हणजे जानेवारी 2029 पर्यंत युद्ध लांबणार! ट्रम्प प्रशासनातील अधिकार्‍यांनी तसे म्हटले असल्याचे वृत्त मीडियाने वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या हवाल्याने दिले आहे. अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर जोरदार हवाई हल्ले केले. याच हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले, तसेच इराणचे वरिष्ठ नेते आणि अधिकारी ठार झाले. इराण आणि अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमाबाबत ओमानच्या मध्यस्थीने शांतता बोलणी सुरू असतानाच अमेरिका-इस्रायलने हल्ले केल्याने ती बोलणी पूर्णपणे मोडीत निघाली. पहिल्याच दिवशी दोन्ही देशांच्या फौजांनी अवघ्या 12 तासांत इराणमधील तब्बल 900 लष्करी व धोरणात्मक तळांना लक्ष्य केले. इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन तळ आणि इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागून तीव्र प्रत्युत्तर दिले. यातूनच खर्‍या अर्थाने इराण युद्ध सुरू झाले. दरम्यान, जगाच्या एकूण गरजेच्या 20 ते 25 टक्के पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा ज्या सामुद्रधुनीतून केला जातो, ती होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना धडा शिकविण्यासाठी इराणने सामुद्रधुनी बंद केली. ती खुली करण्यासाठी अमेरिकेने ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी युरोपियन देशांना जहाजे तैनात करण्याची मदत मागितली होती; पण त्या देशांनी दाद दिली नाही. अद्यापही होर्मुझवर इराणचे नियंत्रण आहे. दरम्यान, झालेला युद्धविराम अल्पजीवी ठरला. त्यानंतर अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरूच आहेत. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इराक, कतार इत्यादी देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर इराणकडूनही अधूनमधून हल्ले होत आहेत. अमेरिकेची लष्करी ताकद पाहता इराणचा संपूर्ण पाडाव लवकरच होईल, असे बोलले जात होते. इराणचे नेतृत्व संपले आहे, त्याची लष्करी क्षमता संपविण्यात आली आहे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा भांडारे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, असे दावे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत होते. अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू होऊनही इराणने युद्ध लांबवत नेले आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता दिवसेंदिवस वाढत असताना ट्रम्प यांनी तसे भासू दिले नाही. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होणार असून, त्या निवडणुकांत युद्ध थांबेल, असा दावा ट्रम्प यांनी जाहीररीत्या केलेला आहे. तरीही निवडणुकांनंतरही युद्ध थांबण्याची शक्यता नसल्याची बातमी आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने तसा दावा करणारे वृत्त दिले आहे. ट्रम्प यांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसच्या अधिकार्‍यांनीच युद्ध जानेवारी 2029 पर्यंत लांबणार असल्याचा दावा केला असल्याचे वृत्तात म्हटले असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि इतर वरिष्ठ सुरक्षा सल्लागारांनी ट्रम्प यांच्याशी बंद दाराआड चर्चा करताना हे युद्ध प्रदीर्घ काळ चालू राहू शकते, अशी भीती व्यक्त केली असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. ट्रम्प यांचा अंदाज इराणने चुकवला आहे. अमेरिका आणि इस्रायलशी आणखी काही काळ चिवट प्रतिकार करण्याची क्षमता इराणमध्ये असल्याचे संकेतच ट्रम्प यांच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. इराणच्या क्षमतेला कमी लेखणार्‍या ट्रम्प यांचा दावा फोल ठरला आहे. अमेरिकेचा आर्थिक आणि लष्करी दबाव सहन करण्यास इराण सक्षम आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेपर्यंत, म्हणजेच 20 जानेवारी 2029 पर्यंत निर्वाचित अध्यक्ष सूत्रे हाती घेईपर्यंत इराणचा प्रतिकार आणि संघर्ष सुरूच राहू शकतो, असे अधिकार्‍यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत संघर्ष लांबवून अमेरिकेवर लष्करी व आर्थिक दबाव कायम ठेवण्याची इराणची रणनीती असल्याचे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) आणि इराणी अधिकार्‍यांनी सूचित केले आहे. तसेच, अमेरिकेने हल्ले सुरू ठेवल्यास प्रत्युत्तर अधिक तीव्र करण्याचा इशाराही इराणने दिलेला आहे. इराणची रणनीती अमेरिकेला भारी पडत असल्याचे अमेरिकन अधिकार्‍यांनी एकप्रकारे मान्य केल्याचे म्हणता येते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (ब्रेंट क्रूड) दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. अमेरिकेने मध्यपूर्वेतील काही लष्करी तुकड्यांची तैनात थेट 2027 पर्यंत वाढवली आहे. हवाई-संरक्षण (एअर-
डिफेन्स) युनिट्सना कोणत्याही निश्चित तारखेशिवाय तिथेच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्यावधी निवडणुकीनंतरही युद्ध लांबविण्याची इराणची रणनीती आहे. ही कारणे पाहता युद्ध लांबण्याची शक्यता बळावत चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प युद्ध लवकर संपवण्याचा दावा करत असले, तरी लष्करी तज्ज्ञ, इराणची भूमिका आणि जमिनीवरील परिस्थिती पाहता हे युद्ध 2029 पर्यंत किंवा त्याहूनही अधिक काळ रेंगाळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. यावरून इराणची रणनीती यशस्वी होत असल्याचेही दिसत आहे. इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली, सोने-चांदीचे भाव कडाडले, शेअर बाजार कोसळले, जगभरातील इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला, खनिज तेलाचे दर भडकले आणि गॅसही महागला. या परिणामांचा फटका भारतालाही बसला. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने कोंडी केल्याने इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली. खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराणने ताठर भूमिका घेतली होती. युद्धविराम व्हावा यासाठी कतार आणि पाकिस्तान या देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला इराणने बोलणी करण्यास नकार दिला होता, परंतु अखेर दोन्ही देश चर्चेस तयार झाले. दि. 8 एप्रिल 2026 रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात पहिला तात्पुरता युद्धविराम झाला. त्यानंतर 17 जून 2026 रोजी दोन्ही देशांमध्ये युद्ध संपुष्टात आणण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. हाच करार (युद्धविराम) संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थोड्याच दिवसांत केली. त्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले, तर प्रत्युत्तरादाखल इराणनेही कुवेत आणि बहरीन या देशांतील अमेरिकेच्या सैनिकी तळांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे डागली. युद्ध किती काळ चालेल आणि केव्हा संपेल, याची शाश्वती देता येत नव्हती. आता युद्ध लांबणार असल्याचे संकेतच अमेरिकन अधिकार्‍यांनी दिले आहेत. हेच चित्र युद्ध लांबल्यास कायम राहणार, म्हणजेच जगात अस्थिरता राहणार आहे.

America Entangled in War

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *