गणेश मंडळांना घरगुती दराने वीज द्या; 20 हजारांचे डिपॉझिटही परत करा

नाशिक : देवयानी सोनार

गणेशोत्सव मंडळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने मंडळांच्या बजेटवर मोठा आर्थिक भार पडतो. प्रीपेड मीटरसाठी घेतलेले 20 हजार रुपयांचे डिपॉझिटही गेल्या दहा वर्षांपासून परत मिळालेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांना घरगुती दराने वीज द्यावी किंवा शेतकर्‍यांप्रमाणे मंडळांना वीजमीटर मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सार्वजनिक गणेश मंडळांकडून करण्यात आली आहे. डीजेबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र, सर्वांची जी भूमिका असेल ती पुढे नेण्याचा प्रयत्न आहे, असे सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दै. ’गांवकरी’शी बोलताना सांगितले.

रस्त्यांवरील खड्डे, सुरू असलेली कामे, मिरवणूक मार्गावरील अडथळे आणि डीजेच्या मुद्द्यावर मंडळाची भूमिका काय आहे, याबाबत सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दैनिक गांवकरीशी संवाद साधला.
प्रश्न : गणेश मंडळांसमोर विजेचा नेमका प्रश्न काय आहे?
विजेच्या बाबतीत आमच्यासमोर मोठी अडचण आहे. गणेश मंडळांना प्रीपेड मीटर घ्यायला लावले जाते आणि त्यासाठी सुमारे 20 हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. गेल्या दहा वर्षांपासून हे डिपॉझिट आम्हाला परत मिळालेले नाही. घरगुती दराप्रमाणे सुमारे तीन रुपये दराने वीजबिल येईल असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे. अनेकदा सुमारे 15 रुपये दराने वीजआकारणी होते. त्यामुळे मंडळाचे बजेट विजेच्या बिलातच संपून जाते. यंदा आम्ही वीज कंपनीकडे मागणी केली आहे की, गणेश मंडळांना घरगुती पद्धतीने वीजआकारावी किंवा शेतकर्‍यांना ज्याप्रमाणे वीजमीटरच्या बाबतीत सवलत दिली जाते, त्याप्रमाणे मंडळांना मीटर मोफत द्यावेत.
प्रश्न : गणेश मंडळांना काय अडचणी येत आहेत?
नाशिकमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्याने सुमारे 20 मंडळांना त्यांच्या नियोजित जागा बदलून दुसर्‍या ठिकाणी मंडप उभारावे लागत आहेत. संबंधित मंडळांशी चर्चा करून त्यांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. काही मंडळांच्या परिसरात मोठे खड्डे आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.
प्रश्न : मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांबाबत प्रशासनाकडून काय आश्वासन मिळाले?
याबाबत महापालिकेत बैठक झाली. आयुक्त कार्यालयातही बैठक झाली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर, महापालिका आयुक्त, नगरसेवक आणि संबंधित अधिकार्‍यांनी गणेशस्थापनेपूर्वी मिरवणूक मार्गांसह शहरातील खड्डे बुजविण्याचा शब्द दिला आहे. तो पाळला गेला नाही, तर आम्ही खड्ड्यांच्या ठिकाणीच डेकोरेशन करून गणेशाची स्थापना करू, अशी आमची भूमिका आहे.
प्रश्न : डीजेबाबत मंडळांची भूमिका काय असेल?
डीजेबाबत अद्याप आमची बैठक झालेली नाही. महाराष्ट्रात याबाबत जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल. पुणे आणि अन्य ठिकाणी दोन बेस आणि दोन टॉप अशी परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच मंडळांची भूमिका स्पष्ट होईल.
प्रश्न : मिरवणूक मार्गावरील वीजतारांचा प्रश्न सुटला का?
मिरवणूक मार्गावर वीजतारांचा मोठा प्रश्न आता राहिलेला नाही. मात्र, दोन ठिकाणी अजूनही तारांचा प्रश्न आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी महावितरणशी संपर्क साधून वायरची बंडले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.
प्रश्न : गणेशदर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना अपेक्षित आहेत?
मोठे खड्डे असलेल्या ठिकाणी संरक्षण व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी घाटाचे किंवा अन्य काम सुरू असल्याने गणेश विसर्जन करणे शक्य नाही, त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात येतील. वर्तमानपत्रांतून सूचना प्रसिद्ध करून पर्यायी गणेश विसर्जन स्थळांची माहिती देण्यात येणार असल्याचे आयुक्त व महापौरांनी सांगितले आहे.
प्रश्न : या सर्व कामांचा पाठपुरावा कोण करणार?
आमदार देवयानी फरांदे यांनी या सर्व विषयांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. महापालिका, वीज कंपनी आणि पोलीस प्रशासनाने दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवून घेण्यासाठी आम्हीही संबंधित अधिकार्‍यांच्या संपर्कात राहणार आहोत. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळांना आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हीच आमची प्रमुख भूमिका आहे.

Provide electricity to Ganesh Mandals at domestic rates; also refund the ₹20,000 deposit.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *