नाशिकला जनरेशन ग्रीन ठेवण्याचा संकल्प करा : ना. महाजन

भोसला कॅम्पसमध्ये कुंभ युवा संवादला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : प्रतिनिधी
युवा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हा जनरेशन ग्रीनचा केंद्रबिंदू आहे. सोशल मीडिया आणि मोबाइलवर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. आगामी कुंभमेळ्यात देशभरातून भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांना नाशिक केवळ विकासकामांमुळे नव्हे, तर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर म्हणूनही दिसले पाहिजे. नाशिकला जेन-झी नाही, तर जेन-जी म्हणजेच जनरेशन ग्रीन ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये बुधवारी (ता. 9) उन्नत नाशिक अभियानांंतर्गत मिशन ग्रीन मान्सूनचा अकरावा टप्पा झाला. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी युवकांंच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.
यावेळी उन्नत नाशिक अभियान, मिशन ग्रीन मान्सूनअंतर्गत सेेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात कुंभ युवा संवाद आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार बाळासाहेब सानप, अभिनेता चिन्मय उदगीरकर, सोसायटीचे विभागीय अध्यक्ष संजय पगारे, शीतल देशपांडे, नरेंद्र वाणी, मिथिला देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पाच हजार रोपांचे वाटप करण्यात आले.
आजचा जमाना युवकांचा आहे. युवकांनी ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून 12 कोटींहून अधिक भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक शहर स्वच्छ, प्लास्टिकमुक्त, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याची जबाबदारी युवकांनी स्वयंसेवक म्हणून स्वीकारावी. व्यसनमुक्त भारतासाठी प्रत्येक युवकाने आयुष्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, असा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले.
या कार्यक्रमात पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्ती, तसेच समाजमाध्यमांतून पर्यावरणाचा संदेश देणार्‍या युवा रील स्टार्सचा सन्मान करण्यात आला. अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री योगिता माळसे यांची विशेष उपस्थिती होती. भोसला संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील टप्प्यात शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून युवा संवाद व व्यापक वृक्षसंवर्धन मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
पगारे यांनी प्रास्ताविक केले. सीमा पेठकर, प्रा. स्नेहा कुलकर्णी, स्नेहल निकम यांनी सूत्रसंचालन केले. मनोज साठे यांनी आभार मानले.

…अन् शहराचे विद्रूपीकरण टाळले
एखादा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम असला की, संपूर्ण शहर व उपनगरांत कार्यक्रमांचे होर्डिंग्ज लावून शहराचे विद्रूपीकरण केले जाते. वाहतूक बेटे, रस्त्याच्या बाजूला लावल्या जाणार्‍या होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होते. पण दि. 9 सप्टेंबर रोजी भोसला महाविद्यालयात कुंभ युवा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे होर्डिंग्ज केवळ नाशिक शहरात अधिकृत मनपाच्या जागांवरच लावले होते. ही निश्चितच स्वागतार्ह बाब असून, इतरांनीही याचा आदर्श घेतल्यास शहर विद्रूपीकरणापासून वाचू शकेल, अशी भावना नाशिककर व्यक्त करीत आहेत.

पाठीवर कौतुकाची थाप
यावेळी 25 विद्यार्थ्यांना मंत्री महाजन, महापौर आडके, आमदार हिरे आदींच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध विषयांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन, संगोपन यांसारख्या बाबतीत जनजागृतीचे काम करणारे कार्यकर्ते, स्वयंसेवकांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यात गिधाड संवर्धक शंकर शिंदे, निशिकांत पगारे (गोदावरी संवर्धन), अनिल माळी (निसर्ग छायाचित्रकार), तेजस चव्हाळे (नाशिक ब्ल़ागर्स), प्रमोद गायकवाड (सोशल नेटवर्किंग फोरम), शीतल सोनवणे (सोशल मीडिया क्रिएटर), प्रसाद जोशी (सोशल मीडिया), कृष्णा गवळी (डिजिटल क्रिएटर), चिराग पाटील, प्रणम्य ठाकूर, शीतल उगले आदींचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी हरित नाशिकसाठी एक रोप लावून ते मोठे करण्याचा संकल्प करावा. तसेच प्लास्टिकचा वापर टाळून सागर मित्र म्हणून पर्यावरण आणि जलचरांचे संरक्षण करावे. विद्यार्थ्यांनी ड्रग्ज आणि सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त भारताचा संकल्प करावा.
– हिमगौरी आहेर-आडके, महापौर

पंधरा हजार स्वयंसेवकांच्या सहभागातून नदीघाट स्वच्छता व जनजागृती केली जाणार आहे. हरित, स्वच्छ आणि शाश्वत सिंहस्थ साकारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
– शेखर सिंह, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त

युवकांनी पर्यावरण संरक्षणाबरोबरच अमली पदार्थविरोधी अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
– संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त

नाशिकच्या तरुणांनी पर्यावरण संवर्धनाचे सुपर हीरो बनून रोपेे लावण्याबरोबरच ती जगविण्याचा संकल्प केल्यास नाशिक शहर ग्रीन सिटी होण्यास वेळ लागणार नाही.
– चिन्मय उदगीरकर, अभिनेता

Resolve to keep Nashik ‘Generation Green’: Minister Mahajan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *