अग्रलेख

बिहारी ‘सम्राट’

शिवसेनेशी युती करून महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री व्हावा, हे भाजपाचे स्वप्न होते. सन 1995 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात गोपीनाथ मुंडे यांनी ‘शत-प्रतिशत भाजपा’ हा नारा दिला होता. सन 2014 साली महाराष्ट्रात भाजपाला मुख्यमंत्रिपद मिळाले. एक तडजोड म्हणून शिवसेनेने पाठिंबा दिल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री आपलेच असावेत, हे भाजपाचे स्वप्न आहेच. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हरियाना, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर इत्यादी राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री असून, बिहारमध्येही भाजपाचे सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले आहेत. जनता दल युनायटेडचे मुखिया नितीश कुमार यांनी 14 एप्रिल रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपला मुख्यमंत्री करण्याचा भाजपाचा मार्ग मोकळा झाला. काहीही करून कोणत्याही मार्गाने भाजपाला बिहारचे मुख्यमंत्रिपद मिळवायचे होते. त्यात नितीश कुमार यांचा मोठा अडसर होता. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करणे सोपे नव्हते. मुख्यमंत्रिपद सोडून केंद्रात जाण्यास सहसा कोणी राजी होत नाही. पण नितीश कुमार राजी झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य होण्याची आपली इच्छा होती, असे म्हणत त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तसे त्यांनी आधीच लोकसभेचे सदस्यत्व भूषवून केंद्रात मंत्रिपदे सांभाळलेली आहेत. राज्यसभेत जाण्याची त्यांची इच्छा होती काय? त्यांना भाजपाने राज्यसभेत जाण्यास भाग पाडले काय? असे काही प्रश्न असले, तरी त्यांना भाजपाने कसे राजी केले, हा मोठा प्रश्न. वाटाघाटीत भाजपाने आपले स्वप्न साकार केले. बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जनता दल युनायटेड (नितीश कुमार), लोक जनशक्ती (चिराग पासवान), राष्ट्रीय लोक मोर्चा (उपेंद्र कुशवाह), हिंदुस्थानी अवाम मोर्चा (जितन राम मांझी) हे पक्ष आहेत. यांत भाजपा व जनता दल युनायटेड समान ताकदीचे पक्ष आहेत. नितीश कुमार दिल्लीत गेल्याने राज्यात त्यांच्या पक्षाच्या वाटचालीचा प्रश्न आहे. त्यांचे पुत्र निशांत कुमार यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यात आली आहे. सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री आहेत. निशांत कुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी पक्ष कार्यकर्ते करत होते. मुख्यमंत्रिपद भाजपाकडे दिल्याने जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांची अडचण होऊ शकते. मित्र पक्षांच्या मदतीने भाजपाने राज्यात आपली ताकद चांगलीच वाढवली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून भाजपा आपली ताकद वाढवत नेणार आहेच. ओबीसींमध्ये पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून ओबीसी असलेले सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. यापुढे राज्यात भाजपाच्या लहान मित्र पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर्व पक्ष संपतील आणि भाजपा हाच एकच पक्ष राहील, असे जे. पी नड्डा यांनी बिहारमधील पाटण्यात ऑगस्ट 2022 मध्ये म्हटले होते. त्यावेळी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. सर्व पक्ष लोकशाहीत एकदम संपणे शक्य नाही, तरी मित्र पक्षांची ताकद कमी करून आपली वाढवणे, ही भाजपाची नीती लपून राहिलेली नाही. शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात तसे दिसून आले आहे. बिहारमध्ये भाजपाबरोबर जे पक्ष आहेत, ते केवळ सत्तेसाठी आहेत. भाजपलाही सत्तेसाठी लहान पक्षांची गरज असते. बिहारचे मुख्यमंत्रिपद मिळाल्याने भाजपाची राज्यात पुढची वाटचाल कशी असेल, हा प्रश्न असला, तरी मित्र पक्षांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. बिहार विधानसभेत भाजपाचे 89, जनता दल युनायटेडचे 85, लोक जनशक्तीचे (चिराग पासवान) 19, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे पाच, राष्ट्रीय लोक मोर्चाचे चार सदस्य आहेत. जनता दल युनायटेड आणि भाजपा यांची ताकद जवळपास समान आहे. नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर संभाव्य मुख्यमंत्री म्हणून भाजपात काही नावांची चर्चा सुरू झाली. नित्यानंद राय आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी ही नावे सर्वांत पुढे होती. राय यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपापासून ते मित्र पक्षांना राजी करण्यापर्यंत आणि विजय मिळविण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाने राय त्यांच्यावर बराच विश्वास ठेवला. निवडणुकीतील विजयानंतर सम्राट चौधरी यांना बिहारचे गृहमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. यामुळे एक विश्वासार्ह चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. याशिवाय उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, दिलीप जयस्वाल आणि आमदार संजीव चौरसिया यांची नावे चर्चेत होती. भाजपाची रणनीती नेहमीच वेगळी असते. बिहारमध्ये भविष्यात स्वबळावर सत्ता मिळवायची असेल, तर ओबीसी चेहरा असलेले नेतृत्व आवश्यक आहे, याचा विचार करूनच सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारचे ते 24 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यात पहिल्यांदाच भाजपाचे नेते या पदावर पोहोचले आहेत. सम्राट यांच्यासोबतच राज्याला दोन नवीन उपमुख्यमंत्रीही मिळाले आहेत. जनता दल युनायटेडचे विजयकुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. सम्राट चौधरी तारापूरचे आमदार आहेत. ते 2017 मध्ये भाजपामध्ये सामील झाले. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड या पक्षांमध्ये काम केलेले असले, तरी त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू झालेली असल्याचे बोलले जात आहे. सन 1999 मध्ये त्यांचा राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) राबडीदेवी सरकारमध्ये समावेश झाला होता. त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षे पूर्ण नसल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला होता. तत्कालीन राज्यपाल सूरज भान यांनी त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकले होते. सन 2000 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजदला बहुमत मिळाले तेव्हा सम्राट चौधरी निवडून आले होते. त्यांचा लालू प्रसाद यादव यांनी मंत्रिमंडळात समावेश केला. त्यांनी त्यावेळी मंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राजदचा पराभव झाला तेव्हा चौधरी पक्षातच राहिले. त्यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सन 2014 पर्यंत त्यांचा भ्रमनिरास झाला. राजदमध्ये फूट पाडून ते जनता दल युनायटेडमध्ये गेले आणि जितन राम मांझी यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. त्यावेळी त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मांझी यांना अल्पकाळासाठी मुख्यमंत्री करण्यात आले होते. मांझी यांना दूर करून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा चौधरी यांचे मंत्रिपद गेले. सन 2017 साली ते भाजपात दाखल झाले. त्यांचे वडील शकुनी चौधरी लष्करात अधिकारी होते. निवृत्तीनंतर काँग्रेस पक्षाशी त्यांची जवळीक होती. तेव्हाच सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द 1990 च्या दशकात सुरू झाल्याचे सांगण्यात येते. नंतर त्यांनी सुरुवातीला जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीत काम केले होते. सम्राट चौधरी यांची मूळ विचारधारा भाजपा किंवा रा. स्व. संघाची नाही. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया, कर्पुरी ठाकूर यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव असून, ते कर्पुरी ठाकूर यांच्या कोईरी या ओबीसी प्रवर्गातील आहेत. भाजपाचा ओबीसींत विस्तार करण्यासाठीच त्यांची निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी कोईरी जातीचे (ओबीसी) आहेत. मुख्यमंत्रिपदी पोहोचणारे ते कोईरी जातीचे दुसरे व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती 1968 मध्ये सतीश प्रसाद सिंह (काँग्रेस) होते. मात्र, ते मुख्यमंत्री म्हणून जेमतेम पाच दिवसच टिकले. काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतल्यामुळे आघाडी सरकार कोसळले. सम्राट चौधरी यांनी आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्यानंतर बिहारमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ही दोन्ही पदे भूषवणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. मुख्यमंत्री म्हणून बिहारमध्ये त्यांना भाजपाचा विस्तार करताना मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडशी सामना करावा लागेल. याशिवाय राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या टीकेला सामोरे जावे लागेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते निशांत कुमार, उपेंद्र कुशवाह, जितन राम मांझी, चिराग पासवान यांच्याशी त्यांना जुळवून घ्यावे लागेल. बिहारच्या जनतेची सेवा करण्यासाठी भाजपाने एका ’सम्राटा’ची निवड केली आहे.

Bihari ‘Emperor’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

5 minutes ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

10 minutes ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

17 minutes ago

कठीण वज्रास भेदू ऐसे…

नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरी, कामातील अनियमितता, सोलर घोटाळा यांसारख्या प्रकरणांनी चांगलाच…

26 minutes ago

गुरू-शिष्यांच्या जयंती सोहळ्याने दुमदुमले नाशिक शहर…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फुले यांना आपले गुरू मानत होते. या आठवड्यात…

31 minutes ago

नाशिककरांची वाट खडतरच…!

शहरात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, नाशिकमधील जनजीवन उष्णतेच्या लाटेने अक्षरश: होरपळत आहे.…

38 minutes ago