पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही : डॉ. गेडाम
नाशिक : प्रतिनिधी
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली असली, तरी शहरातील काही भागांत बीएलओ घरोघरी पोहोचलेच नसल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केल्या. त्यामुळे अशा भागांतील मतदारांच्या नोंदींची योग्य पडताळणी करण्याबरोबरच पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मतदारयादी पुनरीक्षणाचा आढावा व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी आमदार सीमा हिरे, आ. नितीन पवार, आ. हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर आयुक्त अरविंद लोखंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 40 लाख 76 हजार 666 मतदारांचे गणना प्रपत्र भरून घेण्यात आले असून, दहा लाख 27 हजार 892 मतदारांचे प्रपत्र अनकलेक्टेबल राहिले आहे. प्रारूप यादीतील नोंदी अंतिम वगळणी मानल्या जाणार नसून, संबंधित मतदाराला नोटीस देऊन आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. दरम्यान, 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणार्या नवमतदारांनाही नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध आहे. पात्र नवमतदारांनी नमुना क्रमांक 6, घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. नमुना क्रमांक 6, 7 व 8 शक्यतो ऑनलाइन भरावेत, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. प्राप्त दावे-हरकतींवर 29 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेणार आहेत.
30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्याची मागणी
एसआयआर मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमोर आपले म्हणणे मांडताना हरकतींची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना ज्या नोटिसा पाठवण्यात येणार आहेत, त्या राजकीय पक्षांनाही दाखवाव्यात. ज्या मतदारांचे मॅपिंग होऊ शकले नाही, त्या मतदारांना कशी नोटीस पाठवणार, असा सवालही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये यासाठी काटेकोर मोहीम राबवा, अशी मागणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली. काही पक्षांच्या प्रतिनिधींनी शहरातील काही भागांत बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत नसल्याच्या तक्रारी बैठकीत केल्या.
चार दिवस बीएलओ मतदान केंद्रांवर
19, 20, 26 व 27 सप्टेंबर रोजी व सकाळी 10 ते सायंकाळी 6 वेळेत संबंधित मतदान केंद्रांवर बीएलओ उपलब्ध राहणार आहेत. मतदारांनी प्रारूप यादीतील आपले नाव, पत्ता व अन्य तपशील तपासावेत. नाव नसल्यास किंवा नोंदीत त्रुटी असल्यास दावे-हरकती अथवा आवश्यक अर्ज दाखल करता येणार आहेत.
दहा लाखांहून अधिक मतदारांचे प्रपत्र अनकलेक्टेबल
एकूण अनकलेक्टेबल मतदार : 10 लाख 27 हजार 892
मृत मतदार : 1 लाख 67 हजार 505
गैरहजर मतदार : 4 लाख 91 हजार 273
कायमस्वरूपी स्थलांतरित : 2 लाख 61 हजार 653
दुबार नोंद असलेले मतदार : 1 लाख 3 हजार 709
स्वाक्षरीस नकार दिलेले : 3 हजार 754
Complaints from political parties regarding BLOs not visiting homes.