पंचवटीसह मखमलाबाद, म्हसरूळ परिसरात बैलपोळ्याचा उत्साह

पंचवटी : प्रतिनिधी
दिवसेंदिवस शहरातील शेती करण्याचे प्रमाण कमी झाले असून, शेती नांगरणी करण्यासाठी बैलजोडी बघणे दुर्मिळ झाले आहे. परंतु अजूनही मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर- मानूर शिवारातील काही हौशी शेतकर्‍यांकडे बैलजोडी असल्याने त्यांच्यामध्ये बैल पोळ्याच्या दिवशी अमाप उत्साह दिसला. मखमलाबाद गावात मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. पिठोरी अमावास्या म्हणजे बैलपोळा या दिवशी ज्या-ज्या शेतकर्‍यांकडे बैलजोडी व गाय-वासरू आहेत, अशा शेतकर्‍यांनी बैलजोडीसह गाय-वासरू यांना आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर बैलजोडीसह गाय-वासरू यांना पाठीवर नक्षीकाम केलेली आकर्षक झूल, शिंगांना बेगडं, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात करदोड्याचे तोडे आणि सर्वांगावर गेरूचे ठिपके अशाप्रकारे लक्षवेधी सजावट केलेली बैलजोडीसह गाय-वासरू व अश्व यांची गावात व परिसरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गावातील ग्रामदैवत मारुती मंदिरासमोर बैलजोडींकडून सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली. ठिकठिकाणी महिलांकडून बैलजोडीसह गाय-वासरू यांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. शेतकर्‍यांकडून बैलजोडीसह गाय-वासरू यांचे पूजन करण्यात येते. मात्र, यांत्रिक पद्धतीने शेतीमुळे आज ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्यांनी घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला.
यावेळी टांगाप्रेमी शेतकरी मोतीराम पिंगळे, संजय पिंगळे, विक्रम पिंगळे, रोशन पिंगळे आदींसह शेतकरी उपस्थित होते. मखमलाबाद परिसर झपाट्याने वाढला आहे. अनेक लोक नोकरी- व्यवसायानिमित्त परिसरात स्थायिक झाले आहेत. त्यातच बैलजोडी बघणे दुर्मिळ झाल्याने अनेकांनी मखमलाबाद गावात पोळ्यानिमित्त बैलजोडी व मिरवणूक बघण्यासाठी गर्दी केली होती. काही शेतकर्‍यांनी बैलजोडी व अश्व यांची मिरवणूक काढली. बैलपोळ्यानिमित्ताने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Enthusiasm for Bail Pola in Panchavati, Makhmalabad, and Mhasrul areas.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *