संपादकीय

डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेची प्रबोधन चळवळीची तपपूर्ती

– मुकुंद बाविस्कर
डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध भारतीय धर्म आणि समाज यांचे चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते आणि विवेकवादी लेखक होते. त्यांनी 1989 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनिस)ची स्थापना केली आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. वैद्यकीय व्यवसाय सोडल्यानंतर ते पूर्णवेळ समाजकारणात आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उतरले. त्यांनी महाराष्ट्रात अनिष्ट रूढी, बुवाबाजी, जादूटोणा आणि अंधश्रद्धेविरुद्ध प्रखर जनजागृती केली. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा (जादूटोणाविरोधी कायदा) मंजूर व्हावा म्हणून त्यांनी लढा दिला व त्यासाठी मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात अज्ञातांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसांनी महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी अध्यादेश लागू केला. त्यांना सन 2014 मध्ये मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्यक्तीला संपवले तरी विचार संपत नाहीत, तर विचारांची लढाई ही विचारांची लढायची असते, ही डॉ. दाभोलकर यांची विचारसरणी घेऊन आजही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ यासह अनेक सामाजिक संस्था-संघटना त्यांच्या विचारांनी पुढे जात आहेत. याच विचारांचा जागर करीत त्यांच्या मृत्यूनंतर नाशिकमध्ये गेल्या 12 वर्षांपासून म्हणजेच एक तपापासून डॉ. दाभोलकरांच्या स्मृती व विचारांचा वारसा जपत दरमहा 20 तारखेला नियमित पुष्प गुंफले जाते. सध्या नाशिकमधील जवळपास 35 पेक्षा जास्त सामाजिक, कामगार आणि सांस्कृतिक संघटना या उपक्रमात सहभागी होतात. संविधान, वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, चालू घडामोडी व पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा यावर सखोल सत्रे होतात.
शहरातील सार्वजनिक वाचनालयाचे मु. शं. औरंगाबादकर सभागृह किंवा गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात हॉल येथे व्याख्याने आयोजित केली जातात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक स्मृती व्याख्यानमाला’ आयोजित केली जाते. डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचे (दि. 20 ऑगस्ट) औचित्य साधून सामाजिक प्रबोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समकालीन विषयांवर विचारमंथन घडवून आणणे, हा या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला व्याख्यानाचे एक पुष्प गुंफले जाते. या मालिकेचे 152 पुष्प (व्याख्याने) यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. 13 वे वार्षिक स्मृती व्याख्यान गेल्या आठवड्यात झाले. ही व्याख्यानमाला नाशिकच्या सांस्कृतिक व सामाजिक पटलावर वैचारिक प्रबोधनाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ मानली जाते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानमालेत 13 वे वार्षिक आणि 152 वे व्याख्यान दिले. सन 2047 चा विकसित भारत : वास्तव की दिवास्वप्न’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ संकल्पावर भाष्य करताना, त्यांनी सांगितले की, देशापुढील आर्थिक असमानता, बेरोजगारी आणि नियोजनातील त्रुटी दूर केल्याशिवाय हे ध्येय गाठणे कठीण जाईल. विशेषत: दारिद्य्र, शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि नागरिकांचे गुणवत्तापूर्ण जीवन या बाबींकडे केंद्र सरकारला विशेष लक्ष पुरवावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे विकासदर सातत्याने वाढवावा लागेल, तरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल, अन्यथा ते दिवास्वप्नच राहील, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्पनेवर आणि दाव्यांवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी या संकल्पनेला दिवास्वप्न असे म्हटले असून, हा केवळ लोकांचा भ्रमनिरास व फसवणूक करण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे.
पहिले विश्व धम्मलिपी-लेणी-पाली
भाषा साहित्य संगीती संमेलन
धम्मलिपी संशोधक सर जेम्स प्रिन्सेप यांची 227 वी जयंती, लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांची 104 वी जयंती यानिमित्त दान पारमिता फाउंडेशन व लोककवी डॉ. वामनदादा कर्डक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित पहिले विश्व धम्मलिपी-लेणी-पाली भाषा साहित्य संगीती संमेलन झाले. उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या गार्गी
फुले यांनी विचार मांडले. प्रसिद्ध साहित्यिक व अभ्यासक मोतीलाल आलमचंद यांनी अध्यक्षपद भूषवले. डॉ. आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर, गायक संदेश उमप आदी मंचावर उपस्थित होते. या संमेलनात भिक्षू आनंद-उपाली चित्रदालन, काव्य-गीत-गझल स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, धम्मकार्यात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्ती व संस्थांना धम्मरत्न पुरस्कार आदी उपक्रम झाले. उदघाटन सत्रानंतर आलमचंद यांचे धम्मलिपी, पाली भाषा आणि आधुनिकता विषयावर अध्यक्षीय भाषण, त्यानंतर विजय मोहिते यांचे आधुनिक काव्यातील महत्त्व, तर आशा उके-यशवंत प्राचीन बौद्ध धम्म सांस्कृतिकता व आधुनिक एआय या विषयावर व्याख्यान झाले.
पं. शंकरराव वैरागकर संगीत
प्रतिष्ठानतर्फे स्वरसाधना
पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे स्वरसाधना संगीत सभेचे पुष्प नुकतेच गुंफले गेले.ज्येष्ठ गायिका मृदुला देव व सुहास देव यांची प्रमुख उपस्थिती होती. गायिका देव यांनी राग भूपालीने मैफलीची सुरुवात केली. विलंबित एकतालातील कैसे सुरझाऊँ एरी बीर, त्यानंतर अद्धा तालातील फुलवन सेज सवारूँ व द्रुत लयातील तदरे तदानी दानी हे तराणे सादर करून त्यांनी दाद घेतली. त्यानंतर देवाघरचे ज्ञात कुणा हे नाट्यगीत, पं. सुधाकर देव लिखित मन की मन ही ही भजनरचना, सुरांनो चंद्र व्हा हे भावगीत पेश केले.
अभिनव लेडीज ग्रुपतर्फे
कृष्ण भजन स्पर्धा
अभिनव लेडीज ग्रुप व अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था यांच्यातर्फे कृष्ण भजन स्पर्धा झाली. त्यात स्मिता मयूर धूत यांनी प्रथम, गुणवंती पवन गर्गे यांनी द्वितीय, तर सुवर्णा बडगुजर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अभ्यंकर सभागृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. केवळ महिलांसाठी आयोजित या स्पर्धेत पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी कृष्णभक्तिपर भजने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुवर्णा क्षीरसागर यांनी संवादिनीची, तर अमोल पाळेकर यांनी तबला वादनाची साथ दिली. सुरभि गौड-सूर्यवंशी व प्राजक्ता अत्रे-गोस्वामी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. रंजना तांबट यांनी स्वागत केले. सुरेखा तांबट यांनी प्रास्ताविक केले. विमल कलंत्री, उषा जातेगावकर व लीला तांबट यांनी स्पर्धकांचा परिचय करून दिला. अभिनव लेडीज ग्रुपच्या अध्यक्षा रजनी जातेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
उस्ताद उस्मान खान
यांचे वादन रंगले
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे प्रख्यात सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या सतारवादनाची मैफल रंगली. उस्ताद खान यांना म्हैसूर दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेल्या उस्ताद रहिमत खान यांचे नातू असलेल्या उस्ताद उस्मान खान यांनी गायकी अंग आणि तंत यांचे सुरेख मिश्रण केले. मैफलीच्या सुरुवातीला राग चारुकेशी सादर केला. आलाप, जोड, झाला आणि तंत अंगाने स्वतःच्या अशा खास शैलीने त्यांनी मैफल पुढे नेली. उत्तरार्धात राग चारू शिवरंजनी आणि त्यानंतर भैरवी धून सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना स्वप्नील कुलकर्णी यांनी तबल्याची साथ केली.
आशा भोसले यांच्या गीतांवर
भरतनाट्यम्चा आगळा प्रयोग
’मागे उभा मंगेश’, ’नाच रे मोरा’, ’गोरी गोरी पान’, ’दिल चीज क्या है’ या प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या गाजलेल्या गीतांवर भरतनाट्यम् नृत्याविष्कार करीत कलावंतांनी प्रेक्षकांची दाद घेतली. दूर्वांकुर नृत्य निकेतनच्या वतीने वार्षिक नृत्य महोत्सवात स्वरसरस्वती आशा हा कार्यक्रम परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगला. त्यात भोसले यांच्या गीतांवर भरतनाट्यम् सादर करण्यात आले. नृत्यगुरू प्राजक्ता भट यांनी ’मागे उभा मंगेश’ या शिववंदनेने नृत्याविष्काराला प्रारंभ केला. त्यानंतर ’जय शारदे वागेश्वरी’, ’मला हे दत्तगुरू दिसले’, ’नटराज नमो नमः’ अशा भक्तिगीतांद्वारे ईशवंदना सादर करण्यात आली. छोट्या कलावंतांनी ’नाच रे मोरा’ व ’गोरी गोरी पान’ या गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांना बालपणीच्या आठवणींत नेले. याशिवाय ’ऋतू हिरवा’, ’रुपेरी वाळूत’, ’फुलले रे’ या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर झाले.
सृजन चित्रप्रदर्शनात
रंगरेषेचा सुरेख समन्वय
चित्रकर्ती शीतल खिंवसरा यांच्या सृजन चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. गुरुदक्षिणा सभागृहाजवळ डॉ. सुनंदाताई गोसावी कलादालनातील प्रदर्शनाचे उद्घाटन कांतिलाल व ऊर्मिला खिंवसरा, स्नेहलता बाफना, सुरेश व अनिता चोपडा यांच्या हस्ते करण्यात आले. सुमित खिंवसरा यांनी स्वागत केले. ओघवत्या, वळणदार काळ्याभोर रेषेतील रेखाटने, कॅनव्हासवर अ‍ॅक्रॅलिक व तैलरंगांनी व्यक्त केलेल्या आकर्षक रचना शीतल यांनी साकारल्या. अमूर्त चित्रांमध्ये त्यांनी सहजपणे सृजनशीलतेला स्वातंत्र्याची जोड दिली असून, मनातील विचार, भावना व विविध कल्पनांना कॅनव्हासवर साकारले आहे.

Completion of the ‘Penance’ (Tapapurti) of the Dr. Narendra Dabholkar ‘Vivek’ Lecture Series and Enlightenment Movement

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago