संपादकीय

आपत्तींचा वेढा

एकीकडे देशामध्ये भलभलत्या विषयांवरून वातावरण तापवले जाते आहे आणि दुसरीकडे या देशाचा ईशान्येकडील मोठा भूभाग अतिवृष्टी आणि महापुरांनी उद्ध्वस्त झाला आहे. ईशान्येकडील आसाम, अरुणाचल, मेघालयमध्ये गेले काही दिवस महापुराने थैमान घातले आहे, परंतु दुर्दैवाने ईशान्येचा भाग राष्ट्रीय प्रसारमाध्यमांत नेहमीच उपेक्षित राहत असल्याने लाखो लोकांचा संसार तेथे उघड्यावर पडला असला तरी उर्वरित देशाला त्याची फारशी जाणीवही झालेली दिसत नाही. एकट्या आसाममधील 29 जिल्ह्यांतील अडीच हजारांवर गावे पुराने कोलमडली आहेत. आठ लाख लोक बेघर झाले आहेत. लाखो मदत छावण्यांमध्ये आश्रयाला गेले आहेत, तर असंख्य लोकांना अक्षरशः उघड्यावर लोहमार्गावर अन्नपाण्याविना आसरा घेणे भाग पडले आहे. ईशान्येतील पूरपरिस्थिती खरोखर भीषण आहे. एनडीआरएफ आणि सेनेचे मदतकार्य जोरात असले तरी आभाळाच फाटले आहे तेथे कोण कोणाला पुरे पडणार अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते.आसाम आणि अन्य राज्यांमध्ये महापुरामुळे झालेले नुकसान नेमके कितीचे आहे हे कळायला अजून काही काळ जावा लागेल, परंतु ज्या तर्हेने गावागावांतील पूल कोसळून पडले आहेत, रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, हजारो घरे कोसळली वा पाण्याखाली गेली आहेत, ते पाहिल्यास ही राष्ट्रीय आपत्तीच म्हणावी लागेल. दुर्दैवाने उर्वरित देशाला ईशान्येतील राज्यांतील या हलकल्लोळाची फारशी माहिती नव्हती वा दखल घ्यावीशी वाटली नाही. परंतु महापुराने केलेल्या या नुकसानीतून आसाम आणि शेजारील राज्यांना पुन्हा उभे करायचे असेल तर अवघ्या देशाला मदतीचा हात पुढे करावा लागेल. यापूर्वी दक्षिणेतील तामीळनाडू, केरळसारख्या राज्यांमध्ये महापुराने हलकल्लोळ माजवला तेव्हा देश मदतीला धावला होता. बिहार आणि उत्तरेतील पठारी प्रदेशात असे पूर नेहमीचे आहेत.

देशाच्या पूर्व किनारपट्टीवर तर सतत वादळे धडकत असतात. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच आपला एक अहवाल दिला आहे, त्यातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षामध्ये आपल्या देशाला तब्बल ऐंशी नैसर्गिक आपत्तींनी तडाखा दिला. पूर, वादळे, अतिवृष्टी यांतून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान कोसळणारा नैऋत्य मोसमी पाऊस आणि ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानचा ईशान्य मोसमी पाऊस या दोन्हींच्या काळात महापुरांनी अनेक प्रदेशांना झोडपले. शिवाय यास, तौक्ते, गुलाब अशा वादळांनी नुकसानी घडविली ती वेगळीच. शेती आणि बागायतींचे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होत असते. यावर्षी तर पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये एकीकडे अवकाळी पाऊस होत असताना तिकडे उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट उसळली होती.

निसर्गचक्रच असे उलटेपालटे झाल्याने त्याचा फटका खावा लागणे आता नित्याचे होऊन बसले आहे. प्रत्यक्ष चक्रीवादळात किंवा पुरांमुळे होणारी हानी मोठी असतेच, परंतु या वादळांचा परिणाम म्हणून जे पर्यावरणीय परिणाम इतर प्रदेशांतही दिसून येतात, त्या हवामान बदलांमुळे वार्षिक पिके आणि फळफळावळीच्या उत्पादनावरही मोठे दुष्परिणाम होत असतात. यावर्षी गोव्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. परिणामी त्याचा फटका शेतकरी आणि बागायतदारांना बसला. महाराष्ट्रात अभूतपूर्व गारपीट झाली. त्यातून शेतकर्यांचे नुकसान झाले. ह्या अशा घटनांमुळे देशातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. आधीच शेती बागायती हे बेभरवशाचे व लहरी हवामानावर सर्वस्वी अवलंबून असलेले व्यवसाय, त्यामुळे असे आभाळ फाटते तेव्हा शेतकरी आणि बागायतदार आपला आत्मविश्वासच गमावून बसतो. सरकार मदतीची आश्वासने देते, नेते आपत्तीग्रस्त भागाचे दौरे करतात, बहुधा हवाई पाहण्या करतात, परंतु प्रत्यक्ष जमिनीवरच्या आपत्तीग्रस्तांपर्यंत ती मदत पोहोचायला अक्षम्य विलंब लागत असतो. त्यामुळे या बेभरवशाच्या परिस्थितीला तोंड देत आपला आत्मवि श्वास टिकवणे हे बळीराजासाठी मुळीच सोपे राहिलेले नाही.

मंकीपॉक्सचा धोका
कोरोना महामारीतून मानवाला थोडाफार दिलासा मिळालेला असतानाच मंकीपॉक्स नामक नव्या विषाणू संसर्गाने पाश्चात्य आणि युरोपीय देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. बघता बघता ह्या विषाणूचा संसर्ग अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये पसरत चाललेला दिसतो आहे आणि हे लोण भारतापर्यंत येण्याची शक्यता गृहित धरून कालच केंद्र सरकारने त्याबाबत खबरदारीचे उपाय योजण्यासंबंधीचे फर्मान जारी केले आहे. युरोपीय देशांमध्ये एखाद्या महामारीगत मंकीपॉक्सचे रुग्ण सापडत आहेत. ब्रिटनबरोबरच स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इटली, जर्मनी, बेल्जियम अशा एकेका देशामध्ये रुग्ण सापडू लागले आहेत. ब्रिटन आणि पोर्तुगालपर्यंत हे लोण आले असल्याने लवकरच भारतात धडकण्याची धास्ती निर्माण झालेली आहे. आफ्रिकी देशांमध्ये, विशेषतः नायजेरियात ह्या प्रकारच्या त्वचारोगाचे रुग्ण काही वर्षांपूर्वी आढळून आले होते, परंतु तेव्हा त्याला आजच्यासारखे व्यापक रूप मिळाले नव्हते. आता आफ्रिकी देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण नव्याने सापडत आहेत, परंतु युरोप किंवा अमेरिकेच्या तुलनेत तेथील रुग्णांना होणारा संसर्ग सौम्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यासंबंधी अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

आफ्रिकेतील सदर विषाणूने सौम्य स्वरूप धारण केलेले असण्याची शक्यता आहे. याउलट युरोप, अमेरिकेसारख्या तुलनेने स्वच्छ आणि आरोग्यदायी सवयी असलेल्या देशांमध्ये हा आजार झपाट्याने पसरताना दिसतो आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग हा एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दुसर्या व्यक्तीला होतो असे आढळून आले आहेच, परंतु त्याच बरोबर काही रुग्णांमध्ये दर्शनी लक्षणे नसल्याचाही वैद्यकीय तज्ज्ञांना संशय आहे, कारण त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या विषाणूचा प्रसार होत असावा असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात या विषाणूमुळे रुग्णाच्या शरीरावर मोठमोठे फोड येतात. ते दोन ते चार आठवडे राहतात. त्यामुळे असे रुग्ण कोरोनाप्रमाणे आपला आजार लपवू शकत नाहीत. त्यांच्या शरीरावर, चेहर्यावर येणारे फोडच ते बाधित झाले आहेत हे दर्शवतात. अशा बाधित व्यक्तीपासून येणार्‍या थुंकी, लाळ, घाम आदी शारीरिक स्त्रावांशी संपर्क आल्यास किंवा त्या व्यक्तीने वापरलेले कपडे, वस्तू आदींशी संपर्क आल्यास ह्या विषाणूची बाधा होऊ शकते असे आढळून आले असल्याने या आजाराबाबतची चिंता वाढते.

हे ही वाचा :

Devyani Sonar

Recent Posts

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

20 hours ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

23 hours ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

23 hours ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

2 days ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

3 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

6 days ago