अनादि मी, अनंत मी..

जयंती विशेष

मधुरा विवेक घोलप

हे मातृभूमी, तुजला मन वाहियेले।
वक्तृत्व-वाग्विभवही तुज अर्पियेले।
तूतेंचि अर्पिली नव-कविता रसाला।
लेखांप्रति विषय तूंचि अनन्य झाला ॥
या कवितेतून आपल्या आयुष्याचे सार मांडणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज जयंती. ’सावरकर’ हे फक्त एका व्यक्तीचं नाव नाही,तर तो पंचाक्षरी महामंत्र आहे-स्वातंत्र्याचा, देशप्रेमाचा,त्यागाचा, शौर्याचा, अफाट बुद्धिमत्तेचा आणि दूरदृष्टीचा! पु.ल. म्हणतात, तेजस्विनावधितमस्तु म्हणजे काय हे आपल्याला सावरकरांकडे पाहिल्यावर समजतं.

प्रखर राष्ट्रभक्त, क्रांतिकारक, कृतिशील विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ,द्रष्टे नेते,डोळस धर्मचिकित्सक,भाषाशुध्दीचे पुरस्कर्ते अशा सावरकरांच्या शतपैलू व्यक्तिमत्त्वाने आपण भारावून जातो. सावरकरांच्या अनेक रुपांपैकी सर्वांत विराट रुप जर कोणतं असेल तर ते आहे ’महाकवी’ सावरकरांचं! या महाकवी सावरकरांशी आपली सर्वांत प्रथम ओळख होते ती लहानपणी ऐकलेल्या ’जयोस्तुते’ आणि ’सागरा प्राण तळमळला’ या देशभक्तीपर गीतांतून. ’जय देव जय देव जय जय शिवराया’ ही शिवप्रभूंची पहिली आरती असो किंवा ’हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ हे काव्य असो…सावरकरांच्या काव्यप्रतिभेपुढे आपण नतमस्तक होतो. पण यापलीकडे सावरकरांचं कवित्व दुर्दैवाने आपल्याला ठाऊकच नसतं. सावरकरांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी रचलेलं पहिलं काव्य म्हणजे-श्रीमंत सवाई माधवरावांचा फटका! वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे साधारण प्रेम कविता वगैरे ’होण्याच्या’ कोवळ्या वयात सावरकरांनी स्वदेशीचा फटका रचला. सोळाव्या-सतराव्या वर्षी रचलेल्या चापेकर बंधूंवरच्या फटक्यात ते लिहितात-
’कार्या सोडूनि अपुरे पडला झुंजत, खंती नको पुढे ।

कार्या चालवू गिरवूनि तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे॥ मोरोपंतांच्या काव्याचा सावरकरांवर प्रभाव होता. पंतांच्या ’गंगावकिली’ प्रमाणे सावरकरांनी ’गोदावकिली’ रचली. लोकमान्य टिळकाविषयींचा आदर आणि प्रेम ’टिळकस्तवना’तून व्यक्त केला. तर ’बालविधवांच्या दु:स्थितीचे कथन’ही कवितेतूनच केले.
’गेला अहो देश रसातळाला,
स्वातंत्र्यप्रासाद अहा जळाला ।
आला परांचा अतिथोर घाला
व्हा सज्ज, तुम्हांस लुटू निघाला ॥
या तळमळीतून सावरकरांची कविता निर्माण झाली होती. धनंजय कीर लिहितात, ’उज्ज्वल भूतकाळ ही सावरकरांच्या कवितेची स्फूर्ती होती, राष्ट्रभक्ती हे तिचं धृवपद, स्वराज्य हे तिचं उद्दिष्ट आणि मानवता हे तिचं ध्येय होतं.’ योद्ध्याचे शौर्य आणि कवीची प्रतिभा यांचा सुरेख संगम असलेल्या सावरकरांनी नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे यांच्यावर वीरश्रीपूर्ण पोवाडेही रचले.
श्रीबाजींचे रक्त पेरले खिंडीत त्या काला, म्हणून रायगडीं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला’ असं त्यांनी वर्णन केलंय.

बॅरिस्टर होण्यासाठी बोटीने लंडनला जात असताना आकाशातील तारे बघून त्यांना काव्य स्फुरलं, ’हे तार्‍यांनो, जाणतसा का कुठूनि तुम्ही आला? कोठे चालला,कवण हेतू या असे प्रवासाला?’ यातून त्यांची जिज्ञासू वृत्ती दिसते. तर दुसरीकडे, ’गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली’ या सुप्रसिद्ध ओळींतून सावरकरांच्या कुसुमकोमल कवीमनाचे दर्शन घडते. सावरकरांचा मुलगा प्रभाकर याच्या कोवळ्या वयातच झालेल्या मृत्यूमुळे आपला वंश निर्वंश होण्याची भीती व्यक्त करणार्‍या येसूवहिनींच्या पत्राला सावरकरांनी काव्यरूपातच उत्तर दिलं. त्यात ते म्हणतात,
’तूं धैर्याची अससी मूर्ती,
माझे वहिनी माझी स्फूर्ती!’
वहिनीला धीर देताना ते पुढे लिहितात,
’अमर होय ती वंशलता,
निर्वंश जिचा देशाकरिता।’

अंदमानातील बंदी हीच संधी समजून सावरकरांनी पानिपतच्या संग्रामावर महाकाव्य रचण्याची लहानपणापासूनची इच्छा अंदमानात पूर्ण केली. जिथे वाचन आणि लेखन हाच मोठा अपराध गणला जात होता त्या अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांनी महाकाव्याचा प्रकाश निर्माण केला. घायपाताच्या काट्यांनी आणि अणकुचीदार खिळ्यांनी तुरुंगाच्या भिंतींवर महाकाव्य रचणारे जगातले पहिले आणि एकमेव महाकवी म्हणजे सावरकर! थोडाथोडका नव्हे, तर तब्बल दहा हजार ओळींचा काव्यसंभार सावरकरांनी निर्माण केला. कमला, गोमंतक, विरहोच्छवास, महासागर, सप्तर्षी या कविता म्हणून पूर्ण असल्या तरी काहीशा अपुर्‍या राहिलेल्या महाकाव्याचेच हे वेगवेगळे भाग आहेत. या सर्वांना मराठी काव्यरचनेत अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आश्चर्य म्हणजे सावरकरांनी अंदमानात ‘गज़ला’ सुध्दा रचल्या आहेत. काय सुंदर शब्द आहेत-

अकरावीसाठी ३० पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

’तेरी सेवा में ऐ भारत,
अगर सर जाये तो जाये
तो मैं समझू कि हैं
मरना हयाते-जाविदॉं मेरा’
मातृभूमीसाठी केवढा तो त्याग!
रत्नागिरीत स्थानबद्ध असताना सावरकरांनी लिहिलेल्या संगीत नाटकातील नाट्यपदेही खूप गाजली.
’शतजन्म शोधिताना ्र
शतआर्ति व्यर्थ झाल्या,
शतसूर्य मालिकांच्या
दीपावली विझाल्या’

एवढं विशाल वर्णन वाचताना ’जे न देखे रवी, ते देखे कवी’ या उक्तीची साक्ष पटते! पु.लं. म्हणतात, ‘क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनि’ या एका ओळीसाठी तर सावरकरांना साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. सावरकरांच्या कवितेचा आणखी एक उल्लेखनीय विशेष म्हणजे त्यांनीच ’वैनायक’ हे नवे वृत्त मराठी काव्यरचनेत रुढ केले.सावरकरांच्या अलौकिक काव्यप्रतिभेचा अनेक दिग्गजांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. ग.त्र्यं. माडखोलकर म्हणतात की, कालिदासाशी स्पर्धा करणारे उपमाकौशल्य, मोगलांचे सिंहासन फोडणार्‍या मराठी भाल्यांचे लखलखीत तेज आणि संतकवींचे भावमाधुर्य हे गुण सावरकरांच्या कवितेत एकवटले असल्याने मराठी कविमालिकेत सावरकरांना अग्रस्थान दिले पाहिजे. तर दैनिक ’काळ’ मध्ये असा उल्लेख आहे की, महाकवी हे उपपद एखाद्या कवीला दोन अर्थांनी दिले जाते. एक म्हणजे ’जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडवणारा कवी’ उदा.- भवभूती,बाण, शेक्सपिअर.तर दुसरे म्हणजे जो महाकाव्य नावाचा काव्यप्रकार रचतो तो. उदा. भारवि,टॅसो. तर सावरकर हे या दोन्ही अर्थांनी ’महाकवी’ आहेत. अनादि मी,अनंत मी,अवध्य मी भला, मारिल रिपू जगति असा कवण जन्मला ।’

असे ठामपणे म्हणणार्‍या, ’तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू-बंधू’ असा एकतेचा मंत्र देणार्‍या, ’हम ही हमारे वाली हैं’ असा उपदेश देणार्‍या, ’उपकर्ष-अपकर्ष समान ठेले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले?’ असे तत्त्वज्ञानाचे सार सांगणार्‍या, ’अनंताची आरती’ गाणार्‍या ’महाकवी’ सावरकरांना जन्मदिनी विनम्र अभिवादन!

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *