संपादकीय

राजधानीतील गणेशोत्सवाची धूम

राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्‍या कार्यक्रमांची सांस्कृतिक मेजवानी मराठी भाषिकांना मिळणार आहे. विशेषत: विघ्नहर्त्याच्या आगमनाने वातावरण मंगलमय झाल्याचे महाराष्ट्रातील घराघरांपासून राजधानी दिल्लीतील मंडळा-मंडळातून बघायला मिळणार आहे. याकरिता राजधानी दिल्लीतील मध्यवर्ती मंडी हाउस येथील महाराष्ट्र सदन, करोल बाग, फैज रोड, लक्ष्मीनगर, जनकपुरी ते दिल्ली एनसीआरमधील नोएडा गुरुग्राम, फरिदाबाद, नरेलापर्यंत महाराष्ट्रीयन समुदाय स्थायिक झाला. सोबतच आपली प्रथा, उत्सव, संस्कृती, परंपरा घेऊन आला. त्याचेच प्रतीक गणेशोत्सव दिल्लीत दरवर्षी उत्साहात साजरा होतो.
सामाजिक समरसतेचा संदेश देणार्‍या उत्सवाचे स्वागत सादरीकरणही दिमाखात महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडणार्‍या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, समाजप्रबोधनातून सार्वजनिक स्वरूपात केलं जातं. दिल्लीत जवळपास अधिकृत 25 मंडळे अगदी कार्यक्रमपत्रिकेसह दिल्ली आणि परिसरात विखुरलेल्या महाराष्ट्रीयन समाजाला निमंत्रण देत असतात. त्याकरिता प्रत्यक्ष भेटीसह सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाही मदतीला सज्ज असतं! महाराष्ट्रातून येणार्‍या हौशी ते व्यावसायिक कलावंतांना यानिमित्ताने दिल्ली दरबारी हक्काचं व्यासपीठ मिळतं. स्थानिक गृहिणींना स्पर्धेतून पुरणपोळी ते रांगोळीचं कौशल्य दाखविण्यास संधी मिळते. यंदाही दिल्लीतील विविध गणेश मंडळांतून नाट्यप्रयोग, मराठी चित्रपट गीतांची मैफल, कीर्तन, व्याख्यान, भजन, निरूपण, महाराष्ट्राची लोककला आणि मराठी गझल अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल अनुभवता येणार आहे. विशेष उल्लेखनीय मंडळांत सार्वजनिक उत्सव समिती दिल्ली हाटच्या 34 व्या वर्षानिमित्त पदाधिकारी निना हेजीब, निवेदिता मदाने-वैशंपायन, हेमांगी सिन्हा, सरोज माणके, वीरेंद्र उपाध्ये यांच्या सहकार्याने ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे मराठी नाटक सादर केले जाणार आहे. पूर्वांचल महाराष्ट्र मंडळातर्फेही कीर्तन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होतील. कोपर्निकस मार्गावरील जुन्या महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर होणार्‍या गणेशोत्सवाला यंदा 30 वर्षांची परंपरा पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातून दिल्लीत स्थिरावलेले व्यावसायिक महेंद्र लढ्ढा व इतर व्यावसायिक पदाधिकार्‍यांचा लक्ष्मीनगरचा ‘दिल्ली का राजा’ हा गणेशोत्सव 25व्या वर्षात पदार्पण करत आहे.
या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सवात भव्य देखावा बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना दाखविण्यात येणार आहे. दिल्ली का महाराजा या गणेश सेवा मंडळाचा यंदा रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव या 25 व्या वर्षी ‘विघ्नहर्ता ते विकासापर्यंत’ या संकल्पनेखाली साजरा करण्यात येणार आहे, जो 25 वर्षांच्या विश्वासाची आणि 2047 पर्यंत एक विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाची उल्लेखनीय झलकही दर्शवेल. ज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या संकल्पनेवर आधारित मंडपाचे भव्य प्रवेशद्वार आणि मंडपाच्या आत 12 ज्योतिर्लिंगे असतील. मेड-इन-इंडिया ड्रोन, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि गणपतीच्या हातातील सेमीकंडक्टर ही प्रमुख आकर्षणे असतील. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद गोयल आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, 12 दिवसांचा ‘दिल्ली का महाराजा गणेशोत्सव’ 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत डीडीए मिनी क्रिकेट स्टेडियम, बँक एन्क्लेव्ह, प्रियदर्शनी विहार, लक्ष्मीनगर येथे आयोजित केला जात आहे. लक्ष्मीनगरचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लढा म्हणाले की, या वर्षीच्या गणेशोत्सवाची संकल्पना विघ्नहर्त्यापासून विकासकर्त्यापर्यंत – आस्थेची 25 वर्षे, 2047 मध्ये विकसित आधुनिक भारताचा संकल्प ही आहे. याद्वारे भव्य मंडप आणि चित्ररथांच्या माध्यमातून भारताची श्रद्धा आणि परंपरा, ज्ञान आणि संस्कृती, महिला सक्षमीकरण, युवाशक्ती, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, डिजिटल इंडिया, पर्यावरण संरक्षण आणि 2047 मधील विकसित भारताची दूरदृष्टी सादर केली जाईल.
महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त डॉ. श्वेेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापक प्रमोद कोळपते यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या गणेशोत्सवानिमित्त उकडीचे मोदक व पुरणपोळीचा आस्वाद घेता येईल. जनपथावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्र व संसद मार्गावरील आकाशवाणी रंगभवनात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहेत. एनसीआरमध्ये गणेशोत्सव तयारी उत्साहात सुरू आहे.
नोएडातील विविध सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव कार्निव्हल, शॉपिंग स्टॉल्स, लाइव्ह म्युझिकचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुग्राममध्ये ही दोस्ती तुटायची नाय, हे नाटक तसेच ढोल-ताशांसोबत महिलांसाठी मंगळागौर, तर मुलांसाठी मोदक बनविणे व गोष्टी बाप्पांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय जादूचे प्रयोग, मनोरंजनात्मक खेळ, प्रश्नमंजूषा, आपले आपण हे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम गणेशभक्तांच्या उपस्थितीत बालगोपाळांच्या सहभागाने साजरे होणार आहेत.

Ganeshotsav celebrations in full swing in the capital

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भूमि अभिलेखचा उपअधीक्षक पाचशे रुपयांची लाच घेताना जाळ्यात

  भूमि अभिलेखचा उपअधीक्षक पाचशे रुपयांची लाच घेताना जाळ्यात सटाणा:  प्रतिनिधी वारसाहक्काने मिळालेल्या घराची नोंद…

2 hours ago

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago