महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28 मतदारसंघांतील निवडणुकांत उच्चशिक्षित मतदारांनी त्या त्या राज्यांतील सत्ताधार्यांना कमीअधिक धक्के दिले. या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (ईव्हीएम) मतदानासाठी वापर केला जात नाही. मतपत्रिकांवर चिन्ह नसते, तर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहायचा असतो. मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी करणार्या काँग्रेसने मतपत्रिकांनी झालेल्या मतदानात 28 पैकी किती जागा जिंकल्या, असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मतमोजणी सुरू असताना आणि सर्व निकाल लागले नसताना पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली. बुधवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काँग्रेसने किती जागा जिंकल्या, असा सवाल मोदींनी ट्विटरवर (एक्स) केला, तेव्हा उत्तर प्रदेशातील त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या वाराणसी विभागातील पदवीधर व शिक्षक अशा दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार पिछाडीवर होते. या दोन्ही जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राउंडवर, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आघाडीवर असलेले भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे अंतिम फेरीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्याकडून पराभूत झाले. काँग्रेसने 28 पैकी एक जागा जिंकली. चार मोठ्या राज्यांत शिक्षक व पदवीधर मतदारांनी संमिश्र कौल दिला, काही जागांवर विरोधकांनी सत्ताधार्यांना कडवी झुंजही दिली. उच्चशिक्षित मतदारांनी आपली नाराजीही काही प्रमाणात व्यक्त करून सत्ताधार्यांना लहान-मोठे धक्के दिले. सत्तेवर कोणता पक्ष आहे किंवा आघाडी/युती आहे, याचा विचार मतदारांनी केला नाही. महाराष्ट्रात पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, त्यात दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या, तर एक जागा काँग्रेसला मिळाली. महायुतीला दोन जागांवर समाधान मानावे लागले, त्यात एक जागा शिवसेनेला आणि एक भाजपाला मिळाली. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष) यांनी भाजपाच्या डॉ. स्मिता जाधव यांचा 9,928 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात एकूण 2,26,222 वैध मतांपैकी विजयाचा कोटा 1,13,095 इतका निश्चित करण्यात आला होता, जो हर्षदा देशमुख यांनी 1,13,840 मते मिळवून पूर्ण केला. मागील 2020 च्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी जिंकली होती. त्यांचे पुत्र शरद लाड भाजपामध्ये गेल्याने त्यांचा कल तिकडेच होता. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात 2020 मध्ये काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर विजयी झाले होते. यावेळी भाजपाचे कौस्तुभ गावडे यांनी शिवसेना (शिंदे) पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांचा पराभव केला, तर काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. आसगावकर तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष) यांनी एकतर्फी आघाडी घेत महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार पक्ष) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तर सोशल मीडिया स्टार रविराज साबळे (रीलस्टार) 19,835 मतांसह तिसर्या क्रमांकावर राहिले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी पुन्हा एकदा चुरशीच्या लढतीत बाजी मारून जागा राखली. त्यांनी दुसर्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपाचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे (मास्तर) यांना 24,249 मते मिळाली, कराळे यांची दुसर्या पसंतीची मते वंजारी यांच्या पारड्यात गेली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील बंडखोरीनंतरही शिवसेनेचे (शिंदे गट) किरण सरनाईक यांनी चुरशीच्या लढतीत 16,663 मते मिळवून आपली जागा राखली. त्यांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार प्रा. अदिती पोहरे (8,636 मते) यांचा पराभव केला, तर शिवसेना (शिंदे गट) बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे 7,017 मते घेऊन तिसर्या स्थानावर राहिले. महायुतीला सर्व पाच जागा जिंकता आल्या नाहीत. सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नगण्य अस्तित्व असलेल्या महाविकास आघाडीने तीन जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली. उत्तर प्रदेशात निर्विवाद सत्ता असूनही भाजपाला 11 पैकी सहा जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील शिक्षक व पदवीधर अशा दोन्ही जागांवर भाजपाचा पराभव झाला. या दोन्ही जागांसह समाजवादी पक्षाने एकूण पाच जागा जिंकल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघात मात्र भाजपाला विजय मिळविण्यात यश आले. गेल्या निवडणुकीत भाजपाने 11 पैकी सहा जागा जिंकल्या होत्या, त्या सर्व जागा राखण्यात पक्षाला यश मिळाले. समाजवादी पक्षाकडे तीन जागा होत्या, तर अपक्षांकडे दोन जागा होत्या. समाजवादी पक्षाने दोन जागा अधिक जिंकल्या. बिहारमधील आठपैकी चार जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे होत्या. त्यात भाजपाकडे तीन, तर जनता दल(युनायटेड)कडे एक जागा होती. उर्वरित चार जागांपैकी प्रत्येकी एक जागा काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे होती, तर दोन जागा अपक्षांकडे होत्या. यावेळी भाजपाने तीन जागा जिंकल्या, तर जनता दल(युनायटेड)ने एक जिंकली. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीने दरभंगा शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून पहिल्यांदाच विधान परिषदेत प्रवेश केला. राष्ट्रीय जनता दलाने (राजद) पाटणा शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी भाजपाला जबरदस्त धक्का दिला.
Setbacks for those in power
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…
व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…