संपादकीय

मधमाशी : जीवसृष्टीतील सर्वोत्तम वरदान

आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन तज्ज्ञाचा 20 मे 1734 रोजी स्लोव्हनिया या देशातील गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांनी 1766 मध्ये युरोपात पहिले मधमाशीपालन केंद्र सुरू केले. 1771 मध्ये त्यांनी मधुमाशीपालनावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 20 मे 2018 पासून 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला.
या दिवशी मधमाश्यांचे संवर्धन करण्यासह कीटकांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती केली जाते. मधमाशी हा पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मधमाशी हे जीवसृष्टीला मिळालेले सर्वोत्तम वरदान आहे. मधमाशीला सामाजिक कीटक असे म्हटले जाते. मधमाश्या इतर कीटकांप्रमाणे एकट्यादुकट्या राहत नाहीत, तर त्या समूह करून राहतात. त्यांच्या घराला पोळे असे म्हणतात. एका पोळ्यात हजारो मधमाश्या असतात. मधमाश्या त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलातील मकरंद आणि परागकण गोळा करतात. मधमाश्या एका फुलावरून दुसर्‍या फुलावर परागकणांचे स्थलांतर करतात. त्यामुळे फुलांची बीजधारणा व फलधारणा होते. त्यालाच परागीभवन असे म्हणतात.
परागीभवनामुळे पीक उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ होते, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे मधमाश्या या शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहेत. तरीही मधमाशीपालनाबाबत आपल्याकडील शेतकरी अजूनही गंभीर नाहीत. उलट मधमाश्यांचे पोळे जाळून त्यांना शेतातून हाकलून देण्याकडेच शेतकर्‍यांचा कल असतो. पूर्वी शेतात, बांधावर, आजूबाजूला सहज नजरेस पडणारी मधमाश्यांची पोळी आता दिसत
नाहीत.मधासाठी पोळे जाळणे, कीटकनाशके फवारणे, मोबाइल टॉवर उभारणे, मधमाश्यांविषयी अज्ञान पसरवणे या कारणांमुळे मधमाशीसारखा उपयुक्त जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील मधमाश्या नष्ट झाल्या तर त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी मधमाश्यांंच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी पुढे आले
पाहिजे. मधमाश्यांची शास्त्रीय माहिती घेऊन तिचे संगोपन करण्याचे तंत्र अवगत केले पाहिजे. पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेण या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून शेतकर्‍यांनी मधमाशी पालनाला अग्रक्रम द्यायला हवा. सरकारनेही याबाबत शेतकर्‍यांचे प्रबोधन करायला हवे. रोजगार निर्मितीला वाव असल्याने मधमाशीपालन हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मधमाशी ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे काम करते. मधमाश्यांंकडून शिकण्यासारखेही खूप आहे. समूहात राहून आदर्श जीवन कसे जगावे हे मधमाश्यांंकडून शिकावे. दीर्घ कष्ट केल्याने मधासारखा गोड पदार्थ निर्माण करता येतो, हे मधमाश्यांंनी दाखवून दिले आहे. मधमाशी हा केवळ मानवासाठीच नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपण सर्वांनी मधमाशी वाचवण्याचा पर्यायाने जीवसृष्टी वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच मधमाशी
दिनाचे सार्थक झाले, असे म्हणावे लागेल.

 

Bees: The best boon in the world

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago