संपादकीय

राज्यातील गुटखाबंदी खरी की खोटी?

गेल्या महिनाभरात राज्यभरात अशाच प्रकारच्या लहान-मोठ्या कारवाया करून पोलिसांनी कोट्यवधींचा गुटखा जप्त केला आहे. भिवंडीत जप्त केलेला 64 लाखांचा गुटखा पोलिसांनी डम्पिंग ग्राउंडमध्ये जमिनीत पुरला. मात्र, गुटखामाफियांनी जमीन खणून तो लंपासही केला.
एकेकाळी दुर्मिळ म्हटला जाणारा कर्करोग आज भारतात झपाट्याने वाढतो आहे. भारतात कर्करोगाने ग्रस्त रुग्णांपैकी 30 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त असतात. देशात जलदगतीने वाढत जाणारा मुखाचा कर्करोग रोखणे वैद्यकशास्त्रासमोरील मोठे आव्हान बनले आहे. गुटखा, तंबाखू यांचे नियमित सेवन हे या रोगाचे प्रमुख कारण आहे. देशातील झपाट्याने वाढणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन देशातील 26 राज्यांनी आणि पाच केंद्रशासित प्रदेशांनी गुटखाबंदी लागू केली आहे. असे असताना गुटखाबंदी करणार्‍या सर्वच राज्यांत आज गुटखा सहज उपलब्ध होतो आहे. यावरूनच आपल्या देशात भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हे लक्षात येईल. महाराष्ट्रात 2012 साली गुटखाबंदी लागू करण्यात आली. आजमितीला ही गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे. शहरी भागात पानाच्या लहानमोठ्या टपर्‍यांवर, किराणा मालाच्या छोट्या दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा विकला जात आहे. शाळा, महाविद्यालय परिसरातील टपर्‍यांवरही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुण गुटख्याच्या आहारी जाऊ लागली आहेत.
फरक एवढाच असतो की, अशा ठिकाणी गुटख्याची पाकिटे या टपर्‍यांवर दर्शनी भागात मांडली जात नाहीत. मात्र, मागणी केल्यावर हवी तितकी पाकिटे उपलब्ध करून दिली जातात. कोरोनाकाळात जिथे जीवनावश्यक वस्तू मिळणे मुश्कील होते अशा भागांत गुटख्याची पाकिटे चढ्या दराने विकली जात होती. अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने पान टपर्‍यांवर दर्शनी भागात चिप्सच्या पाकिटांप्रमाणे विविध कंपन्यांची गुटख्याची पाकिटे लटकवलेली दिसून येतात.
गावांमध्ये रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या थांबतात तेव्हा जवळच्या परिसरातील तरुण गुटखा, सिगारेट आणि तंबाखूची पाकिटे विकण्यासाठी गाडीत बिनधास्तपणे फिरतात. प्रवासीसुद्धा यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. अन्न व औषध प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पोलीस यंत्रणा यामुळे राज्यभर गुटखा पुरवण्याचे छुपे जाळे निर्माण झाले आहे.
दरवर्षी विविध ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधींचा गुटखा जप्त केला जातो. मात्र, ही कारवाई केवळ दाखवण्यापुरती असते असे अनेक सुजाण नागरिकांचे मत आहे. आजमितीला विविध वाहिन्यांवर, यूट्यूबवर गुटख्याच्या जाहिराती प्रसारित केल्या जातात, ज्यात उल्लेख पान मसाल्याचा केला जात असला, तरी या जाहिराती गुटख्याच्या असतात, हे सर्वांनाच ज्ञात आहे. नामवंत कलाकार मंडळी, खेळाडू या जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांना गुटखा खाण्याचे आवाहन करताना दिसतात. एकेकाळी गुटखा हा झोपडपट्ट्यांतून, मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकला जात असे. मात्र, अशा जाहिरातीमुळे आज गुटख्यालाही ’रॉयल स्टेटस’ प्राप्त झाले आहे.
सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्येही गुटखा खाल्ला जाऊ लागला आहे. एका बाजूने राज्यात गुटखाबंदी करण्यात आली आहे, त्यासाठी शिक्षेचे आणि दंडाचे प्रावधानही करण्यात आले आहे आणि दुसर्‍या बाजूने तरुणांचे रोल मॉडेल असणार्‍या सिनेकलाकारांना आणि खेळाडूंना घेऊन विविध कंपन्यांच्या गुटख्याची जाहिरातबाजी चालू आहे. गावागावांतून गुटखा पुरवला जात आहे, टपर्‍यांवर सहज उपलब्ध करून दिला जात आहे. हा विरोधाभास नेमके काय दर्शवतो? गुटख्याच्या निर्मिती आणि वितरणाबाबत कायदा करण्यात आला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची भिस्त ज्यांच्यावर आहे ती पोलीस यंत्रणाच कायदा धाब्यावर बसवणार्‍यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. आज काही पोलिसांसह राजकीय नेतेमंडळीही सार्वजनिक ठिकाणी गुटखा चघळताना दिसतात, त्यामुळे राज्यात खरेच गुटखाबंदी आहे का? हा प्रश्न कोणालाही पडल्यावाचून राहत नाही.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या अन्न आणि औषध विभागाने मुंबईतील मालाड, कुर्ला, सांताक्रूझ, भांडुप, धारावी, मुलुंड, नळबाजार या ठिकाणी छापे टाकून सुमारे 13 लाख 69 हजारांचा गुटखा जप्त केला. या कारवाईअंतर्गत 16 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. भिवंडीलाही अशाच प्रकारची मोठी कारवाई करून 64 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दिंडोरी पोलिसांनी चाचडगावमध्ये अशीच कारवाई करून 51 लाखांचा गुटखा हस्तगत केला.

Is the gutkha ban in the state true or false?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

13 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

13 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

13 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

13 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

13 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

13 hours ago