नाशिक : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारातील श्री ईशान्येश्वर मंदिर आणि त्यामागील श्री शिवनिका संस्थान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात यांनी सुमारे 17 वर्षांपूर्वी अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपर्यात या मंदिराची उभारणी केली होती. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी ‘श्री शिवनिका संस्थान, मिरगाव’ या नावाने ट्रस्टची स्थापना केली.
मंदिर उभारणीनंतर शिर्डीला येणारे अनेक भाविक सिन्नर-शिर्डी मार्गावरील या मंदिरात दर्शनासाठी येऊ लागले. यात अनेक राजकारणी, उद्योजक आणि कलाकारांचा समावेश होता. मंदिराच्या उभारणीवेळी कळसाची उंची, गाभार्याचा आकार, पायर्यांची संख्या, मुख्य दरवाजा, नंदी, दगड आणि पिंडी यांसारख्या घटकांची रचना अंकशास्त्रानुसार केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे हे मंदिर विशेष
चर्चेत आले. देश-विदेशातील काही अनुयायीही येथे पूजेसाठी येत असल्याचे सांगितले जाते.
दि. 13 ऑगस्ट 2009 रोजी न्यास नोंदणी क्र. ए-1087 (नाशिक) अंतर्गत ‘श्री शिवनिका संस्थान, मिरगाव’ या नावाने ट्रस्टची अधिकृत नोंदणी करण्यात आली. अशोक खरात हे त्याचे अध्यक्ष असून, संस्थेच्या माध्यमातून काही समाजोपयोगी उपक्रम राबविल्याचा दावा करण्यात येतो.
दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौर्यावर असताना साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक मिरगाव शिवारातील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन पूजा-अर्चा केली होती. त्यावेळी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या भेटीनंतर काही सामाजिक संघटनांकडून टीकाही करण्यात आली होती. यापूर्वीही काही नामवंत राजकीय कुटुंबीयांनी येथे दर्शन घेतल्याची चर्चा आहे.
कोण आहेत अशोक खरात?
सदुसष्टवर्षीय अशोक खरात मूळचे सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) येथील रहिवासी आहेत. त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये ‘कॅप्टन’ पदावर 22 वर्षे सेवा केल्याचा दावा केला आहे. 154 देशांचा प्रवास केल्याचेही ते सांगतात. विविध देशांच्या भाषा, परंपरा आणि धार्मिक संस्कृतीचा अभ्यास असल्याचे त्यांच्याबाबत सांगितले जाते. ते स्वतःला ‘ब्रह्मांडशास्त्रज्ञ’ व अंकशास्त्र अभ्यासक म्हणून संबोधत असत. मिरगाव येथील मंदिराबरोबरच नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात भविष्य जाणून घेण्यासाठी राजकारणी, उद्योजक व काही सेलिब्रिटी येत असल्याची चर्चा होती.
ट्रस्टमध्ये बदल, चर्चांना उधाण
दोन वर्षांपूर्वी शिवनिका ट्रस्टमधील तीन ट्रस्टींनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काही जुने ट्रस्टी कायम ठेवत नव्या स्वरूपात फेररचना करण्यात आली. खरात यांच्या पत्नी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जाते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यादेखील या संस्थानच्या ट्रस्टी असल्याचे समोर आले आहे. धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र, श्रावण महिना आणि गुरुपौर्णिमा आदी सोहळ्यांना त्या उपस्थित राहिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आलिशान बंगला, सभामंडप आणि शेती
ईशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस खरात यांचा आलिशान बंगला आणि शेती असल्याचे दिसते. परिसरात आंब्याची बाग तसेच शिवनिका संस्थानचा मोठा सभामंडप उभारण्यात आला असून, येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मिरगाव शिवारातील या मंदिर आणि संस्थानाभोवती सध्या विविध चर्चांना उधाण आले असून, पुढील घडामोडींवर लक्ष लागले आहे.
Ishanyeshwar Temple in Mirgaon Shivara, Shivnika Sansthan in discussion
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…