– राजेश शिरभाते
मुलांच्या बाबतीत काही पालक असे करताना दिसतात. त्यांना दोन मुले असतील तर त्यातील एक लाडका असतो, त्याने काहीही केले तरी चालते आणि दुसरा एखादा मुलगा असतो ज्याने साधे जेवायला मागितले तरी त्याच्या विरोधात बोलले जाते. मराठीत ही म्हण पूर्वापार चालत आलेली आहे. सध्या देशात दोन प्रकारच्या तरुणांच्या बाबतीत हा भेद केला जात आहे की काय, असे येणार्या बातम्यांवरून दिसून येत आहे. समाजमाध्यमांवरही सध्या याच गोष्टीचे पडसाद दिसून येत आहे. बरं या दोडक्या मुलांना एका बाजूला चुचकारणे आणि दुसर्या बाजूला त्यांच्यावर दडपशाही करणे असे दुहेरी अस्त्र वापरण्यात येत आहे. त्यांना अधिक बदनाम करण्यासाठी पैसे देऊन उभे केलेल्यांची फौज कार्यरत आहे ती वेगळी.
हे सारे मी कशाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आले असेल. दिल्लीच्या जंतर-मंतरवर जेन-झी विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असे आंदोलन केले. आतापर्यंत बारा वर्षांत अनेक आंदोलने चिरडण्यात आली. बदनाम करण्यात आली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावेळी मात्र जंतर-मंतरच्या या आंदोलनाला देशभरातून इतका मोठा प्रतिसाद मिळाला की, सरकारला काय करावे आणि काय करू नये असे झाले. त्यांनी त्यांच्या संस्कृतीतील मारझोड आणि हल्ला हे सूत्र अवलंबिले. या तरुणांवर खिळे लावलेल्या काठ्यांनी आणि पॅलेट गनने हल्ला करण्यात आला. ही मुले आंतरराष्ट्रीय पातळीवर कामे करणारी होती. त्यांच्यावर झालेल्या या क्रूर हल्ल्याची आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतली. त्यानंतर सरकारला एका शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. त्या शिक्षणमंत्र्याने राजीनामा देताना असे पत्र लिहिले जसे की त्यांनी काहीच केले नव्हते. शब्दांच्या या बुडबुड्यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आपले काम नीट न केलेल्या मंत्र्यांचे संसदेत जोरदार स्वागत करण्यात आले. ते कोणी प्रायोजित केले असावे हे सांगण्याची गरज नाही. त्यानंतर या जेन-झी मुलांना रीलच्या माध्यमातून एका बाजूला चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना इकडे चुचकारण्यात गुंतवून ठेवायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई करायची, असे दुहेरी युद्धनीती या मुलांच्या विरोधात वापरण्यात आली. त्यात पहिला हल्ला त्यांच्या करिअर करण्याचा विचार करण्यात आला. त्यांच्यावर केसेसे केल्या तर त्यांचे पासपोर्ट खराब होतील आणि त्यांना परदेशात नोकरीसाठी जायला मिळणार नाही किंवा त्यांना नोकरी दिली जाणार नाही. त्यामुळे त्यांचे आयुष्य खराब करण्याचे धोरण आखण्यात आले. यात सरकारचा दुहेरी फायदा होता. एक तर या आंदोलकांची जिरवण्यात आली आणि दुसरीकडे यापुढे भविष्यात रोजगार मागण्याची त्यांची पात्रता नष्ट करण्यात आली.
या विद्यार्थ्यांची देशातील सगळीकडे चाललेली आंदोलने चिरडण्याचा जुना प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाने देशाला दोन तरुण नेते दिले. एक अभिजित दीपके आणि दुसरी नेहा बोरा. या दोघांवर सरकारने विशेष लक्ष दिले. आधी आंदोलनाला परदेशी पैसा आला हे त्यांच्या माध्यमाकडून सांगण्यात आले. देशाच्या इतक्या भागातून चार-दोन रुपयांच्याही मदतीने हे आंदोलन उभे राहिले होते हे सरकारच्या लक्षात आले. राममंदिराला दान देऊन त्याच्या चोरीनंतरही काहीही न बोलणारी भारतीय जनता एखाद्या आंदोलनाचा खर्च सहज उचलू शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मग अभिजित दीपके यांच्या परदेशातील खर्चाकडे सरकारने मोर्चा वळवला. त्याच्या वडिलांची चौकशी करण्यात आली. त्याची कागदपत्रे मागण्यात आली. या देशात चोरी करून परदेशात पळून जाणे सोपे आहे आणि पै पै जमवून परदेशात शिक्षण घ्यायला जाणे अवघड आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. तुम्ही कधी परदेशात शिक्षण घेणार्या मुलांशी बोलून बघा. त्यांचे आकर्षण हे तिथे मिळणार्या समानतेच्या शिक्षणाचे असते. भविष्यातील संधीचे असते. चांगल्या वातावरणाचे असते आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे असते. सरकार म्हणून आपण आपल्या देशातील मुलांना हे देऊ शकत नाही याची वास्तविक पाहता लाज वाटली पाहिजे. त्याऐवजी त्यांची चौकशी केली जाते. आमच्या तरुणपणी काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे आम्हा तरुण मुलांना केवळ आपल्या शिक्षणावर आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्त्व विकासावर भर देता आला. आम्हाला कोणाच्या आरत्या गायची गरज वाटली नाही. आमचे तारुण्य अधिक सकस आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारे होते. त्यावेळी आमच्यावर तशा प्रकारचे संस्कार झाले होते.
जेन-झी आंदोलकांनी आपला राग व्यक्त केल्याबरोबर तथाकथित संस्कृती रक्षक जे मंदिरातील चोरीच्या वेळी घरात लपून बसले होते, ते लागलीच आपल्या लॅपटॉपवर आले. त्यांनी या मुलांना आपल्या संस्कृतीचे पाठ द्यायला सुरुवात केली. ते हे विसरले की देशात कोणी आंदोलन केले तर त्याच्याशी चर्चा करण्याची आपलीही लोकशाही संस्कृती होती. त्यांच्यावर लाठी आणि गुंड सोडण्याची नाही. त्यांनी सध्या कावड यात्रेत सहभागी होणार्या काही मुलांच्या बेबंद वर्तणुकीकडे दुर्लक्ष करायचे ठरवले आहे. अर्थात, कावड यात्रेतील सर्वच जण असे नाहीत. ही जी काही तरुण मुले आहेत त्यांना हाताशी धरण्यात आलेले आहे. त्यांना देशात असा संदेश देण्यासाठी नेमण्यात आले आहे की, तुम्ही धर्मासाठी काहीही केले (मंदिरात चोरीही) तरी त्याला पाठिंबा मिळेल, मात्र जर शिक्षण आणि अधिकारांची मागणी केलीत तर तुम्हाला चारी बाजूंनी चिरडण्यात येईल. या मुलांनी पोलिसांना लक्ष्य केले. ते खरे तर एक चाल आहे. जे पोलीस आंदोलनकर्त्यांबरोबर क्रूर वागले ते पाहा कसे सहनशील आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेहा बोरावर शाई फेकणारा भेकड त्याची माहिती काय आहे. तो पाचशे रुपयांच्या सुपारीचा मुलगा वाटतो. त्यातून सरकारची लाडकी कोण आहेत हे सरकारकडून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुलांकडे पाहून त्यांना दररोज दारू व इतर व्यसने करणे परवडत असेल असे वाटत नाही.
याचा अर्थ कोणी तरी त्यांना अर्थपुरवठा करत आहे. त्यांना हवे नको ते पाहिले जात आहे. त्या मुलांना तरी काय माहीत आहे की, आपल्याला आपल्याच मित्रांच्या विरोधात उभे करून वापर झाल्यानंतर फेकून देण्यात येणार आहे. या देशात सर्वांना आपली धार्मिक कर्तव्ये करण्याची मुभा आहे. त्यात कोणीही पक्ष वगैरे पाहत नाहीत. राममंदिराला केवळ भाजपाच्या लोकांनीच दान दिले आणि काँग्रेसच्या लोकांनी नाही असे या देशात होत नाही. या देशाची एक वीण आहे. ती बंधुभावाची आहे. कोणाला तरी काहीही पात्रता नसताना मोठे करण्याच्या नादात ही वीण तुटता कामा नये. तुम्ही जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुमचीच चांगली कामेही लोकांच्या मनातून उतरली जात आहेत.
Ladke and Dodke
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…