अग्रलेख

महाराष्ट्र पॅटर्न

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा भाजपाने दारुण पराभव केल्यानंतर पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्याचे त्यांच्यासमोर कडवे आव्हान होते. पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षांपासून आपली सत्ता असल्याने आपल्याला कोणताही धोका नाही, असा समज ममता बॅनर्जी यांनी करून घेतला होता. दुसरीकडे, आपली सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपा घुसखोरी करत असून, नवनवीन रणनीती आखत आहे, याचा अंदाज त्यांना आला नाही. भाजपाच्या प्रत्येक खेळीला ममता बॅनर्जी यांनी शह दिला नाही. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पश्चिम बंगालमधील बालेकिल्ला ज्या आक्रमक पद्धतीने उद्ध्वस्त केला होता, त्याच आक्रमक पद्धतीने भाजपाने ममतांचा गड उद्ध्वस्त केला. पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न साकार झाल्यानंतर आपल्याला तुल्यबळ विरोधक नकोच, हाच विचार करून तृणमूल काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन पक्ष फोडून भाजपाने विरोधकांना कमकुवत केले. तोच कित्ता पश्चिम बंगालमध्ये गिरवला गेला आहे. तृणमूल काँग्रेसचे ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून नवीन विधिमंडळ पक्ष स्थापन केला. त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. पक्षांतरबंदी कायद्याच्या मर्यादेत हा गट आहे. आपलाच पक्ष खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याचा दावा ऋतब्रत बॅनर्जी यांनी केला आहे. याचा अर्थ ममता बॅनर्जी यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याची ही खेळी असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली होती. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली होती. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटांना दुसरे नाव व चिन्ह सुचविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (मशाल) आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार (तुतारी वाजविणारा माणूस) हे दोन नवीन पक्ष अस्तित्वात आले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत तेच घडण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसला मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. आपला पक्ष टिकविण्यासाठी ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाकडे दाद मागावी लागेल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्यात विधानसभा निवडणुकीत संघर्ष दिसला. त्याआधी मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमावरूनही तीव्र संघर्ष झाला होता. निवडणूक आयोगाच्या विरोधात आपली बाजू मांडण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. ही पार्श्वभूमी पाहता पक्षावरील दाव्याबाबत निवडणूक आयोगाकडून ममता बॅनर्जी यांना न्याय मिळेल काय, हा प्रश्न आहे. शेवटी त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. खरा शिवसेना पक्ष कोणाचा आणि खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रमाणेच ममता बॅनर्जी यांची गत होण्याची चिन्हे आहेत. ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपल्या तृणमूल गटाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून भाजपाशी युती करण्याचा निर्णय घेतलेला नसला, तरी मागेपुढे ते आणि त्यांचा गट सत्तेच्या वळचणीखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 15 वर्षांपासूनची सत्ता गेल्याने तृणमूल काँग्रेसच्या फुटीर आमदारांची सत्तेची हाव कशी सुटणार? सत्तेसाठी त्यांना किंवा त्यांच्या गटाला भाजपाशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. सत्तेच्या वळचणीखाली उभे राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेले होते. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांची जमवाजमव करून सत्तेचा आश्रय घेतला होता. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ऋतब्रत बॅनर्जी यांनी ’महाराष्ट्र पॅटर्न’ राबविला आहे. त्यांना भाजपाचा छुपा पाठिंबा आहे, हे उघड सत्य आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपाने छुपा पाठिंबा दिला होता, तोच पाठिंबा ऋतब्रत बॅनर्जी यांना भाजपाने दिल्याचे दिसत आहे. ममता बॅनर्जी यांच्या आक्रमकतेची धार कमी करण्यासाठी किंवा त्यांचे राजकीय अस्तित्व कमी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न होईल, असे दिसते. ईडी, सीबीआय, आयकर या केंद्रीय संस्थांचा वापर राजकीय हत्यार म्हणून भाजपा करत असल्याचा आरोप नवीन नाही. पश्चिम बंगालमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी ’ईडी’च्या अधिकार्‍यांनी कथित कोळसा खाण घोटाळाप्रकरणी छापे टाकले. या सर्व गोष्टी ममता बॅनर्जी यांच्या संतापात भर घालणार्‍या आहेत. ममता बॅनर्जी यांची पुढची रणनीती काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. तरीही देशभरात भाजपाविरुद्ध विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न त्या करतील, असे दिसते. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर दोन-चार दिवसांत त्यांनी तसे सूचित केले होते. भाजपाशी दोन हात करताना त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अन्य डाव्या पक्षांना पाण्यात पाहून चालणार नाही. उद्धव ठाकरे यांची काँग्रेसविरोधातील जहाल भूमिका मवाळ झाली आहे. त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी डाव्यांच्या बाबतीत मवाळ होतील काय, हा प्रश्न आहे. मोठ्या पडझडीनंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाजपाविरुद्धची भूमिका बदलली नाही. ममता बॅनर्जीही त्याच मार्गाने जातील, असे दिसते.

Maharashtra Pattern

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

8 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago