संपादकीय

एक तरी वारी आचरावी..!

चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी अफाट जनसागर (वारकरी, गरीब-श्रीमंत, आंधळे-पांगळे, सर्व जाती-धर्माचे) आषाढी एकादशी दिवशी टाळ-मृदंगाच्या गजरात विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला… असे म्हणत पंढरपूरमय होतो. महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले, मात्र महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय याला अपवाद ठरला आहे. या संप्रदायाचा प्रभाव सतत वाढतच राहिलेला आहे. अगदी 19व्या, 20 व्या आणि 21 व्या विज्ञाननिष्ठ शतकामध्येही हा संप्रदाय टिकून आहे. एवढेच नव्हे तर तो समाजशास्त्र आणि साहित्य संशोधक यांच्या कुतूहलाचा विषय होऊन राहिला आहे.
पंढरपूरची वारी हा प्रकार महाराष्ट्रातील वारकरी भक्तिसंप्रदायाला इतर भक्तिसंप्रदायांपासून खास रीतीने वेगळा ठरविणारा आहे. काही तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीला आलेल्या किंवा पुराणकाळापासून माहात्म्य लाभलेल्या काशी, जगन्नाथपुरी, बद्रिकेश्वर, बालाजी तिरुपती, रामतीर्थ इत्यादी तीर्थक्षेत्रासारखे पढरपूर हे क्षेत्र नाही. पंढरपूरची वारी हा तीर्थक्षेत्रापेक्षा वेगळा प्रकार आहे. पंढरपूरची वारी करणे म्हणजे तीर्थयात्रेचे पुण्य गाठीस बांधणे, अशी काही भावना कोणताही वारकरी बाळगून नसतो. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतर तीर्थक्षेत्रांना यात्रा म्हणून जाऊन येण्याची पद्धत आहे. पंढरपूरची वारी करणार्‍या माणसांचे जीवन अगदी बदलून जावे, अशी अपेक्षा असते. मुख्य म्हणजे आपण वारकरी असून, वारकर्‍याचे व्रतस्थ जीवन जगत आहोत याची निदर्शने करणार्‍या तुळशीमाळा, त्रिपुंडा किंवा खांद्यावर भगवी पताका व तो टाळ-मृदंगाचा आवाज यांसारख्या खाणाखुणा त्याने निश्चयाने बाळगाव्यात, अशीही अपेक्षा असते. एवढेच नव्हे तर त्याने भगवद्भक्ती करावी, कोणत्या यंत्राचे आणि ग्रंथाचे पठण करावे यासंबंधानेही काही आदेश असतात. खरा वारकरी या आदेशांचे जास्तीत जास्त पालन करण्यात धन्यता मानतो. अन्य पंथांमध्ये दाखल होणार्‍या भक्तांवर अशाच प्रकारच्या आदेशांचे निर्बंध असले, तरी त्या निर्बंधांना कर्मकांडाचे स्वरूप आलेले असते. वारकरी पंथामध्ये कर्मकांडाचा मुळागत निर्बंध केलेला आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अन्य भक्तिसंप्रदायांपेक्षा असलेले वेगळेपण अनेक प्रकारे सांगता येईल. येथे फक्त एका महत्त्वाच्या गोष्टीचा निर्देश करायचा आहे, तो म्हणजे वारकर्‍यांचे कुलदैवत कुठलेही असो, वारकरी होताच पंढरपूरच्या विठ्ठलाचा भक्त होऊन जातो, यातही पुन्हा वैशिष्ट्य असे पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती स्वीकारल्यावर अन्य देवतांच्या भक्तीचा त्याने त्याग करावयास पाहिजे असे बंधन त्याच्यावर नसते. त्यातूनच मग तो ईश्वराकडे (परमेश्वर) एकत्वबुद्धीने पाहण्यास शिकतो, म्हणूनच महासमन्वय ही संस्कृती घेऊन उभा राहिलेला वारकरी पंथ महाराष्ट्रात नुकताच लोकप्रिय झाला असे नव्हे, तर शतकानुशतके खंबीरपणे पाय रोवून स्थिरावला आहे. ज्ञानदेव, नामदेवांच्या काळी महाराष्ट्रावर असलेल्या अस्मानी-सुलतानी आपत्तीमध्ये जनतेचा धीर खचू न देता त्यांची मने समर्थ बनविण्याचे काम या थोर संतांच्या भागवत धर्माने केले. ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बळ, वीर्य, तेज या सहा गुणांनी संपन्न असणार्‍या भगवंताचा धर्म शक्तिगर्भ आहे. यातून स्वराज्य प्राप्त होते, रक्तहीन सामाजिक क्रांतीची विचारधारा निर्माण करण्याची ताकद या विचारसूत्रीत असली, तरी या गोष्टीस दुबळेपणा-भेकडपणाचे स्वरूप नसावे, म्हणून संत तुकाराम म्हणतात, तरी भले देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी। वारकरी संघाच्या विचारांत जातिभेद, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा यांचा विचार होताना विठ्ठल उपासना आणि पंढरपूर वारीचे पडसाद उमटतात. ईश्वरप्राप्तीसाठी संसार न सोडता संसारात राहूनदेखील पारमार्थिक आनंद मिळवता येतो हे वारीतून दिसून येते. जीवनाचे ध्येय भक्ती हेच मानले आहे.
मनामनातील मशागत, करणारा वारकरी संप्रदाय जीवन अंतर्बाहा बदलून टाकतो. शुद्धाचरण सात्त्विक आहाराबरोबर चांगल्या विचारातून परस्पर द्वेष, मद, क्रोध, त्वेष यांसारख्या गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जणू वारी-वारकरी आचारात मिळते. यालाच आध्यात्मिक अभ्यास म्हटला जातो. वारीला सुरुवात केली की, वर्षानुवर्षे पायी वारी करून वारकरी विठ्ठलमय होतात. वारीची परंपरा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाते. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील जखेवाडी गावच्या ह.भ.प के. जनाबाई शिवाप्पा संकपाळ यांनी आयुष्यात 36 पायी वार्‍या केल्या. 105 व्या वर्षी माउलींचे निधन झाले. त्यांची शेवटची इच्छा अशी होती की, माझी अस्ती पंढरपूरच्या चंद्रभागेत करावी. त्यांचे नातू.. देवदास संकपाळ यांनी अस्ती चंद्रभागेत पंढरपूरला घेऊन जाऊन विसर्जन करून आपल्या आजीची शेवटची मनोकामना पूर्ण केली. वारकर्‍यांचा पोषाख पांढरा शुभ्र कुर्ता, धोतर व डोक्यावर टोपी, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, हातामध्ये भगव्या पताका व कपाळावर गंध, भजन-कीर्तनामध्ये ते धुंद असतात. धुंद असतेवेळी बघताना असे वाटते की, आपणही त्यांच्यामध्ये मग्न व्हावे, म्हणून आयुष्याला येऊन एक तरी वारी आचरावी… पंढरपूरची…!
!! जय जय राम कृष्ण हरी !!

One must undertake the pilgrimage at least once..!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago