मिरवणूक मार्गावरील समस्या सोडवू : आयुक्त खत्री
महावितरणकडून वीजमीटरसाठी अडवणूक; मंडळांचा आरोप
नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असून, तत्पूर्वी नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गणेश मंडळांना दिलासा देत परवानगी शुल्क माफीची घोषणा केली. गणेश मंडळ पदाधिकार्यांच्या बैठकीला विलंब झाल्याने याप्रकरणी त्यांनी प्रशासनाचे कान टोचत, यापुढे प्रशासनाने असा हलगर्जीपणा करता कामा नये, असा इशाराही दिला. महावितरणकडून मंडळांना होत असलेल्या त्रासाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे महापौरांनी उपस्थितांना आश्वासन दिलेे. आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थाची कामे सुरू असल्याने मंडळांना सहकार्य करण्याची विनंती केली. मंडळांच्या ज्या समस्या आहेत, त्या 24 तासांत मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने राजीव गांधी भवन येथे गुरुवारी (दि.10) शहरातील गणेश मंडळांची बैठक बोलावली होती. यावेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, गटनेते अॅड. श्याम बडोदे, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष समीर शेटे आदी उपस्थित होते.
महापौर आडके यांनी, मंडळांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी विभागनिहाय सहा विभागांमधून उत्कृष्ट काम करणार्या मंडळांना एकूण सव्वा लाखांची रोख पारितोषिके वितरित केली जाणार असल्याचे सांगितले. यंदा गणेशोत्सवात कुंभमेळा संकल्पना राबवून उत्सवाचे स्वरूप अधिक भव्य व पवित्र करण्याचे आवाहन त्यांनी मंडळांना केले. यापुढे कितीही कामे राहिली तरी महिन्याआधी गणेशोत्सवाची बैठक झालीच पाहिजे. मिरवणुकीवेळी कुठलीही गैरसोय होणार नाही. त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आमदार देवयानी फरांदे यांनी मिरवणूक मार्गांवरील खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत. महावितरणने लटकणार्या विजेच्या तारा बाजूला करण्याची सूचना केली. आयुक्त खत्री म्हणाल्या की, येत्या 24 तासांत गणेशोत्सवाशी संबंधित सर्व लहान-मोठ्या समस्यांची सोडवणूक केली जाईल. घाटांची यादी करून सुरक्षेसाठी बॅनर गुरुवारी सायंकाळी लावले जातील. मिरवणूक मागार्ंवरील सर्व अडथळे दूर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणला शेटे यांचा इशारा
गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस असताना अद्याप शहरातील बहुसंख्य गणेश मंडळांना महावितरणकडून वीजमीटर दिले जात नाही. मंडळांना विनाकारण मनस्ताप देण्याचे काम महावितरण करत आहे. येत्या दोन दिवसांत विजेचे मीटर न मिळाल्यास कुठलीही परवानगी न घेता उत्सव साजरा करू, विजेसाठी दोन-तीन हजार रुपये कुठून द्यायचे? याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे म्हटले. प्रशासनाने भलेही आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. शहरात बाराशे मंडळे असून, बैठकीसाठी पन्नास मंडळेदेखील नसल्याची नाराजी शेटे यांनी व्यक्त केली. बैठकीची माहिती मंडळांना मिळाली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यांनी केल्या सूचना
गणेश विसर्जन व मिरवणूक मार्ग पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत. – सर्जेराव वाघ
हायमास्ट दुरुस्त करावेत. टाळकुटेश्वर मंदिराजवळील सांडपाण्याचा प्रश्न सोडवावा. – पंकज रहाणे
पाथर्डी फाटा, इंदिरानगरमध्ये महावितरण वीजमीटर देण्यासाठी गणेश मंडळांची का अडवणूक करत आहे? याकडे लक्ष देऊन समस्या मार्गी लावा. नगरसेविका सीमा ठाकरे : गणेश मंडळांना सर्व परवानग्या देऊन योग्य पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा. – अॅड. श्याम बडोदे, गटनेते
गणेश विसर्जनाची जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. मातीचे ढिगारे, ड्रेनेज या समस्या दूर कराव्यात. हायमास्ट रात्रीच्या वेळी लागत नाहीत. अग्निशमन दलाने त्यांची नावासह यादी उपलब्ध करून द्यावी. जीवरक्षक नेमावेत. पंचवटी कारंजावरून वाहने हटवून कार्यकर्त्यांना रामकुंडावर नेऊ द्यावे. – शाहू खैरे, नगरसेवक
ढोल-ताशा पथकातील महिलांसाठी कालिदास कलामंदिर व परिसरात स्वच्छतागृहांची सोय करावी. बी. डी. भालेकर येथील मातीचे ढिगारे हटविण्यात यावेत. – गणेश बर्वे
पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने त्यातच वेळ जात आहे. परवानगीसाठी ऑफलाइनचा पर्याय ठेवून रस्त्यांतील खड्डे त्वरित बुजवावेत. – मोहन ठाकरे
सोमेश्वर ते नांदूरपर्यंत दोन्ही बाजूंनी घाटांचे काम सुरू असून, गणेश विसर्जनावेळी मोठी गर्दी होते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. – महेश महानकाले
मिरवणुकीत महिलांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. – बबलू परदेशी
स्वच्छता विभागाने देखावा न करता स्वच्छता करावी. मनपाने गणेशमूर्ती संकलित केल्यानंतर मूर्तीर्ंचे व्हिडीओ काही समाजकंटक सोशल मीडियावर टाकतात, याकडे लक्ष द्यावे. – गणेश अवनकर
जेथे उत्सव होतो तेथे वाहणारे मल-मूत्र थांबवावे. चोर्या रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी. – हर्षद वाघ
सर्व मंडळांनी दररोज सायंकाळी सात वाजता आरती करावी.
– व्ही. व्ही. उदावंत
Permission fees waived for mandals; Mayor’s announcement.